शरद पवार यांच्या घरावरील हल्ल्याप्रकरणी गुणरत्न सदावर्तेंना पोलिसांनी घेतले ताब्यात

शनिवार, 9 एप्रिल 2022 (07:47 IST)
राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांच्या निवासस्थानी झालेल्या हल्ल्याप्रकरणी मुंबई पोलिसांनी अॅड गुणरत्न सदावर्ते यांना चौकशीसाठी ताब्यात घेतले आहे. गेल्या चार महिन्यांपासून एसटी कर्मचाऱ्यांचा संप सुरू आहे. संपकरी कर्मचाऱ्यांना येत्या 22 एप्रिलपर्यंत कामावर येण्याचे आदेश मुंबई उच्च न्यायालयाने दिले आहेत. त्यातच संपकरी कर्मचाऱ्यांचा संताप अनावर झाला. त्यांनी पवार यांच्या सिल्व्हर ओक या निवासस्थानी हल्ला केला. काही आंदोलकांनी चप्पल भिरकावली, काहींनी घरात जाण्याचा प्रयत्न केला. अशा प्रकारे एखाद्या नेत्याच्या निवासस्थानी प्रथमच असा हल्ला झाल्याने ही बाब राज्यभरात चर्चेची आणि चिंतेची ठरत आहे. याची गंभीर दखल मुख्यमंत्री व गृहमंत्र्यांनी घेतली आहे.
 
याप्रकरणी आता मुंबई पोलिसांनी परळ येथील निवासस्थानातून अॅड सदावर्ते यांना ताब्यात घेतले आहे. हल्लेखोरांना सदावर्ते यांनी चिथावणी दिली का, या आंदलनामागे सदावर्ते यांचा हात आहे का याची चौकशी पोलिसांकडून केली जात आहे. सदावर्ते यांनीच एशटी कर्मचाऱ्यांची बाजू मुंबई उच्च न्यायालयात मांडली. त्यांच्या नेतृत्वातच आंदोलन लढले जात आहे. आजच्या आंदोलनात त्यांचे नेमके काय कनेक्शन आहे, याचा तपास पोलिस करीत असून सदावर्ते यांच्यावर गुन्हा दाखल करुन त्यांना अटक केली जाण्याची शक्यता वर्तविली जात आहे.

वेबदुनिया वर वाचा

संबंधित माहिती