एसटी कर्मचारी आणि त्यांचे कुटुंबीय यांच्या भल्यासाठी शासन नेहमीच त्यांच्याबरोबर राहील. मात्र, या कर्मचाऱ्यांच्या संसाराच्या राखेवर कुणी आपल्या पोळ्या भाजू नयेत असा इशारा मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी दिला आहे.
एसटी कर्मचारी त्यांच्या मागण्यांसंदर्भात आंदोलन करीत आहे. मात्र, राज्य शासनाने कधीही त्यांच्या मागण्यांकडे दुर्लक्ष केले नाही. महामंडळाचा कर्मचारी आमचाच आहे या भावनेतून जितके जास्तीत जास्त आर्थिक व सेवाविषयक लाभ देता येतील ते आम्ही दिले आहेत.
कर्मचाऱ्यांनीही या निर्णयाचे स्वागत केल्याच्या बातम्या पोहचत असतानाच दुपारी ज्येष्ठ नेते शरद पवार यांच्या निवासस्थानी एक जमाव पोहोचतो. घोषणाबाजी करतो. दगडफेक, चप्पलफेक करतो ही कृती अतिशय अनुचित व कुणालाही न पटणारी आहे.
अशा प्रकारे हिंसेला उद्युक्त किंवा प्रक्षोभ निर्माण करणाऱ्यांवर तसेच चिथावणी देणाऱ्यांवर कायद्याने कडक कारवाई झाली पाहिजे अशा सूचना गृहमंत्र्यांना दिल्या आहेत. नेत्यांच्या किंवा त्यांच्या कुटुंबियांच्या घरांवर हल्ले करणे हा पायंडा महाराष्ट्राने कधीही पाडलेला नाही, असेही मुख्यमंत्री म्हणाले.