दोन वर्षाच्या कालावधीनंतर अर्थात सर्वीकडे कोवीड आजाराने मंदिर तसेच सर्व कार्यक्रमांवर निर्बंध घालण्यात आले होते. त्यामुळे दोन वर्षांपासून अनेक ठिकाणाहून निघणाऱ्या श्री साईबाबा यांचे पालखीचे आगमन दुरापास्त झालेले दिसत होते. पण यावर्षी सर्व निर्बंध मुक्त झाल्याने श्री साईबाबांच्या दर्शनासाठी सिन्नर व नाशिकचे रस्ते श्री साईबाबांच्या पालखीने दुमदुमून गेले आहेत.
शिर्डी माझे पंढरपुर या वाक्याप्रमाणे अनेक वर्षांपासून भक्तजन साईबाबांच्या दर्शनासाठी विशेष करून श्रीराम नवमी या सणाला अनेक दरमजल पायीपायी अनवानी पायांनी साईंच्या दर्शनासाठी येत असतात. या भाविकांच्या आनंदाला उधाण आलेले असते. अशा रणरणत्या उन्हात हे भाविक मुंबई, गुजरात वरून तसेच अनेक राज्यातून शिर्डी कडे येत असतात. अशा भक्तांसाठी अनेक भाविक आपापल्या परीने त्यांचे स्वागत करीत असतात. अनेक गावे शहरे त्यांच्या या आगमनासाठी आतुरतेने वाट पाहत असता. गेल्या दोन वर्षांपासून कोरोनाच्या सावटाखाली अनेक दिवस पायी दिंड्या बंद होत्या ,पण यावर्षी सर्व निर्बंध खुले असल्याने यावर्षी शिर्डीच्या साईबाबांच्या दर्शनासाठी अनेक पालख्यांचे आगमन रस्त्यांनी फुलून गेले आहे. पारंपरिक रामनवमी उत्सवासाठी यंदा जोरदार तयारी सुरू आहे. या उत्सवासाठी देशभरातील भाविक व विशेष करून मुंबई परिसरातून येणारे पदयात्री मोठी गर्दी करतात. यंदादेखील अंगाची लाही करणाऱ्या उन्हाचा सामना करत लाखो साईभक्त शिर्डीच्या दिशेने मार्गक्रमण करत असून घोटी-सिन्नर व नाशिक मार्गे हे पदयात्री सिन्नर तालुक्यात दाखल झाले आहेत.
भक्तांमध्ये अभूतपूर्व उत्साह संचारल्याचे चित्र आहे.साधारणपणे गुढीपाडव्याच्या दिवशी प्रस्थान केल्यावर रामनवमीच्या पूर्वसंध्येला हे साईभक्त शिर्डीत दाखल होत असतात. यावर्षी मुंबईहून येणाऱ्या साईभक्तांच्या संख्येत वाढ झाली असून जवळपास 75 ते 80 हजार पदयात्री सुमारे तीस पालखी मंडळांच्या माध्यमातून साईदर्शनासाठी येत आहेत, या सोबतच मुरबाड, पालघर, डहाणू, जव्हार, मोखाडा, नाशिक, वापी, सुरत येथून येणाऱ्या पालख्यांची संख्या देखील लक्षणीय आहे. मुंबईहून घोटीमार्गे सिन्नर तर काही पालख्या नाशिकमार्गे सिन्नरला येतात. सिन्नरपासून पुढे शिर्डी महामार्गावरून या पालख्या एकत्र प्रवास करत असल्याने रामनवमीच्या अगोदरचे चार दिवस शिर्डी महामार्ग फुललेला असतो.
पालखीची पूजाअर्चासिन्नर शहरातील रस्त्यांवर साईंच्या पालखीने रस्ते अगदी फुलून गेले असून बोलो साई राम जय जय साईराम अशा नामघोषाने रस्ते व भाविक हे दुमदुमुन गेले आहे. शहरातील अनेक ठिकाणी साई भक्तांच्या सुखसुविधासाठी व त्यांना राहण्यासाठी त्यांचे स्वागत करण्यात आले. सायंकाळी साईंच्या आरती नंतर अनेक साई सेवक व भाविक भजन करून त्यांच्या मंडळात सिन्नरकर यांनीही हजेरी लावून साईबाबांचा नाम घोष घेत पूजाअर्चा केली. श्री भैरवनाथ मंदिर एस टी कॉलनी वावी वेस वृंदावन नगर मुसळगाव एमआयडीसी अशा अनेक उपनगरात साई पालखीचा मुक्काम करण्यात आलेला आहे. एसटी कॉलनी येथील योगेश वाजे यांच्या निवास्थानी साईंची पालखी मुक्कामी ठेवण्यात आलेली असतात. येथे साईंच्या पालखीची पूजाअर्चा व भजन संध्या करून साईंना नैवेद्य दाखवून प्रसादाचा लाभ अनेक भक्तांनी घेतला. यावेळी वाजे कुटुंबीय तसेच एसटी कॉलनीतील अनेक कुटुंबीयांनी पालखी सोहळ्यासाठी अथक परिश्रम घेऊन पालखीची पूजाअर्चा केली.