गेल्या अडीच वर्षांत महाविकास आघाडी सरकारमधील तीन मंत्र्यांना राजीनामे द्यावे लागले. दोन मंत्री तुरूंगात आहेत. बाकीचे तुरूंगात जाण्याच्या रांगेत आहेत. महाराष्ट्राच्या साठ वर्षांच्या इतिहासात असे कधी पाहायला मिळाले नाही, ते सध्या राज्यातील जनता अनुभवत आहे. कोल्हापूर उत्तरची पोटनिवडणूक एका मतदार संघाची नसून ती जनतेच्या मनातील रोष दर्शविणारी ठरेल, अशा शब्दात भाजपचे प्रदेश उपाध्यक्ष, अभ्यासू नेते माधव भांडारी यांनी ठाकरे सरकारच्या कारभारावर कोरडे ओढले.
कोल्हापूर प्रेस क्लबमध्ये भांडारी यांनी शुक्रवारी पत्रकारांशी संवाद साधला. ते म्हणाले, ठाकरे सरकारचा गेल्या अडीच वर्षातील कारभार राज्यातील जनता पाहत आहे. भ्रष्टाचारामुळे तीन मंत्र्यांवर राजीनामा देण्याची वेळ आली. त्यातील संजय राठोड हे तर महिला अत्याचाराच्या गुन्हय़ातील आहेत. अनिल देशमुख आणि नबाव मलिक या मंत्र्यांना तुरूंगात जावे लागले आहे. महाराष्ट्राच्या इतिहासात असे कधीही घडले नव्हते. ठाकरे सरकारने देशमुख, राठोड यांचा राजीनामा घेतला पण नवाब मलिक यांच्या मंत्रीपदाचा राजीनामा अजूनही घेतलेला नाही. मलिक यांच्यावर कारवाई करू नये, यासाठी कुणाचे दडपण आहे, हे सर्व जण जाणतात, असेही भांडारी यांनी सांगितले.
महाविकास आघाडी सरकार शेतकरी विरोधी
एफआरपीच्या तुकडय़ाबाबत छेडले असताना माधव भांडारी म्हणाले, एकरकमी एफआरपी मिळावी, हे भाजपचे धोरण आहे. केंद्र सरकारने या संदर्भात त्या त्या राज्य सरकारांनी निर्णय घ्यावा, असे स्पष्ट केले आहे. राज्यातील महाविकास आघाडी सरकारला शेतकऱयांपेक्षा साखर कारखानदारांची चिंता आहे. त्यामुळे शेतकरी विरोध असलेल्या या सरकारने एफआरपीचे तुकडे करण्यास मान्यता दिली, असा आरोपही भांडारी यांनी केला.
कर लादल्याने राज्यात पेट्रोल महाग
राज्यात पेट्रोलवर प्रति लिटर 52 रूपये 50 पैसे कर आकारला जातो. त्यात व्हॅटचाही समावेश आहे. हा कर कमी केल्यास राज्यातील पेट्रोल, डिझेल स्वस्त होऊ शकते. कर्नाटक, मध्यप्रदेश, गुजरात या राज्यात पेट्रोल, डिझेल स्वस्त असल्याचे माधव भांडारी यांनी सांगितले.