मुंबईतील काँग्रेस नेते मिलिंद देवरा यांनी काँग्रेस पक्षाचा 'हात' सोडत मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वात शिवसेनेत प्रवेश केला आहे.मिलिंद देवरा यांचा शिवसेनेच्या अरविंद सावंत यांच्याकडून 2014 आणि 2019 च्या सलग दोन लोकसभा निवडणुकांमध्ये दक्षिण मुंबई मतदारसंघातून पराभव झाला होता.
त्यामुळे यंदा मुंबई दक्षिण हा लोकसभा मतदारसंघाची जागा महाविकास आघाडीतील ठाकरे गटाला दिली जाणार असल्याचं म्हटलं जात होतं. म्हणून देवरा यांनी काँग्रेसला रामराम ठोकल्याच्या अटकली लावल्या जात आहे.
“आज माझ्या राजकीय प्रवासातील एका महत्त्वपूर्ण अध्यायाचा समारोप होतोय. मी काँग्रेसच्या प्राथमिक सदस्यत्वाचा राजीनामा दिला आहे. माझ्या कुटुंबाचे पक्षाशी असलेले 55 वर्षांचे नाते संपुष्टात आले आहे. मी सर्व नेते, सहकारी आणि कार्यकर्ता यांचा वर्षानुवर्षे पाठिंबा दिल्याबद्दल त्यांचा आभारी आहे," असं देवरा यांनी X या सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर लिहीलं आहे.
रविवारी (14 जानवारी) काँग्रेस सोडल्याची घोषणा केल्यानंतर देवरांनी आपण एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेत प्रवेश करत असल्याचं जाहीर केलं आहे.
याआधी देवरा यांनी महाविकास आघाडीच्या जागावाटपच्यावेळी मुंबई दक्षिणची जागा उद्धव ठाकरेंच्या नेतृत्वाखालील सेनेकडे जाण्याच्या शक्यतेवर नाराजी व्यक्त केली होती.
काही दिवसांपूर्वी कार्यकर्त्याशी संवाद साधताना देवरा यांनी कार्यकर्त्यांना शांत राहण्याचा सल्ला दिला होता. जागावाटपाच्या चर्चेत अंतिम निर्णय झाल्याशिवाय मुंबई दक्षिण लोकसभा मतदारसंघावर सेनेने दावा करू नये असं देवरांनी सांगितलं होतं. त्यांचे दिवंगत वडील मुरली देवरा यांच्यासह त्यांच्या कुटुंबाने 40 वर्षांपासून मतदारसंघाची सेवा केली असल्याचं त्यांनी म्हटलं होतं.
पण अरविंद सावंत यांनी मुंबई दक्षिणमध्ये येत्या लोकसभेसाठी मोर्चेबांधणी सुरू केली. याशिवाय संजय राऊत यांनी दक्षिण मुंबईवर आमचा (ठाकरे गट) दावा आहे आणि तिकडे उमेदवारही आमचाच असणार आहे म्हटलं होतं. त्यानंतर देवरांची नाराजी अधिक वाढली असल्यांचं सांगण्यात येत आहे.
काही महिन्यांपूर्वी, देवरा आणि राज्यसभा खासदार प्रफुल्ल पटेल यांच्यात भेट झाली होती. त्यानंतर ते अजित पवार गटात सामील होण्याची अफवा पसरली होती . पण देवरा यांनी ती शक्यता फेटाळली होती.
देवरांनी काँग्रेस सोडल्यानंतर 'हा' फोटो आला चर्चेत
काँग्रेस सोडल्याच्या घोषणेनंतर मिलिंद देवरा सोशल मीडियावर ट्रेंडिंगमध्ये आहेत. त्याशिवाय सचिन पायलटदेखिल ट्रेंडिंगमध्ये आहेत.
या दोघांची चर्चा सुरू होताच 11 वर्षे जुना एक फोटोही चर्चेत आला आहे.
या फोटोमध्ये तेव्हाचे पाच काँग्रेस तरुण नेते एकमेकांशी चर्चा करताना दिसत आहेत.
ऑक्टोबर 2012 च्या या फोटोमध्ये सचिन पायलट, ज्योतिरादित्य सिंधिया, आरपीएन सिंह आणि जितिन प्रसाद यांच्यासह मिलिंद देवरा आहेत.
हा फोटो मनमोहन सिंग यांच्या मंत्रिमंडळ विस्ताराच्या वेळी घेण्यात आला होता.
पत्रकार अनीश सिंह यांनी लिहिलं की, हे सगळे नेते सचिन पायलट यांना काँग्रेस सोडण्यासाठी समजावत तर नाहीत ना?
जितेन गजारिया यांनी राहुल गांधींच्या नेतृत्वावर प्रश्न उपस्थित करत लिहिलं की, "2009 नंतर काँग्रेसच्या खासदारांचा एक गट 'राहुल गांधी टीम' आणि काँग्रेसचं भवितव्य म्हणून ओळखला जात होता. पण आज सचिन पायलट यांच्याशिवाय यातील सर्वांनी काँग्रेस सोडलं आहे."
मँडो नावाच्या एका यूझरनं हा फोटो ट्विट करत लिहिलं की, या सर्वांपैकी फक्त एकच असे आहेत, जे काँग्रेससाठी लढत आहेत.
दुसऱ्या एका यूझरनं लिहिलं की, इतर नेत्यांनी काँग्रेस सोडल्यानंतर पक्षात सचिन पायलट यांची शक्ती वाढत आहे. ते नक्कीच या नेत्यांमध्ये सर्वात शक्तीशाली आहेत.
या सर्व नेत्यांना राहुल गांधींचे नीकटवर्तीय समजलं जात होतं. पण पायलट सोडून इतर चारही नेत्यांनी काँग्रेस सोडून भाजपमध्ये प्रवेश केला आहे.
सर्वात आधी ज्योतिरादित्य सिंधिया यांनी मार्च 2020 मध्ये काँग्रेस सोडली. नंतर जितिन प्रसाद यांनी जून 2021 मध्ये आणि आरपीएन सिंह यांनी जानेवारी 2022 मध्ये पक्ष सोडला. आज मिलिंद देवरा यांनीही पक्ष सोडला आहे.
या पाचही नेत्यांमध्ये एक साम्य होतं. ते म्हणजे, यासर्वांचे वडील काँग्रेसचे दिग्गज नेते होते.
या पाचपैकी आता फक्त सचिन पायलट हे एकमेव असे नेते आहेत जे अजूनही काँग्रेसमध्ये आहेत. त्यामुळंच पायलट कायम चर्चेत असतात.
सोशल मीडियावर लोक आता याबाबत मीम्सदेखील शेअर करत आहेत.
देवरा भाजपऐवजी शिंदेंकडे का गेले?
सद्यस्थिती पाहता, भाजप मुंबईत आपली ताकद वाढवण्यासाठी मोठ्या प्रमाणात प्रयत्न करताना दिसत आहे.
तसंच भाजपची केंद्रात सत्ता आहे. तिथे प्रवेश करणं राजकीय पातळीवर अधिक फायद्याचं असताना देवरा यांनी शिंदेंसोबत जाण्याचा निर्णय का घेतला असावा? याविषयी विश्लेषण करताना ज्येष्ठ पत्रकार हेमंत देसाई म्हणाले की, शिंदेंकडे तिकीट मिळणं हे जास्त भरवशाचं आहे. तसंच तिथे सेना विरुद्ध सेना अशी लढत होईल. ज्यामध्ये देवरा यांना फायदा होऊ शकतो.
"भाजपपेक्षा शिंदे यांच्याकडे लोकसभेच तिकीट मिळणं हे जास्त भरवशाचं आहे. कारण भाजपचा एकंदर राजकीय पॅटर्न पाहता ते शेवटच्या क्षणी कुणाचंही तिकीट कापू शकतात. तसं शिंदे करणार नाहीत. त्यामुळे मुंबई दक्षिणमध्ये आता सेना विरुद्ध सेना अशी लढत होईल."
उच्चभ्रू लोकवस्ती असलेला हा मतदारसंघ जरी असला तर याठिकाणी मुस्लीम आणि कामगारवर्गही मोठ्या प्रमाणात आहे. याशिवाय मनसेचे बाळा नांदगावकर हेपण इथून निवडणूक लढवतील अशी चर्चा आहे. त्यामुळे ठाकरे गटाच्या अरविंद सावंत यांना जाणारी मराठी मते नांदगावकर यांना मिळू शकतात. त्यामुळे देवरांनाच फायदा होईल, असंही देसाई यांना वाटतं.
दरम्यान, देवरांच्या या निर्णयावर काँग्रेस नेत्यांनी नाराजी व्यक्ती केली आहे.
"मिलिंद देवरा तुम्ही हा निर्णय घेतला हे दुर्दैव आहे. वैयक्तिक पातळीवर आणि काँग्रेस कार्यकर्ता म्हणून याबद्दल मला वाईट वाटतंय. देवरा कुटुंबाचा काँग्रेस परिवाराशी दीर्घकाळ संबंध राहिला आहे. काँग्रेस पक्ष ऐतिहासिक भारत जोडो न्याय यात्रेला सुरुवात करत असताना त्याच दिवशी तुमची घोषणा झाली, हे देखील खेदजनक आहे," असं मुंबई काँग्रेसच्या अध्यक्ष वर्षा गायकवाड यांनी म्हटलं आहे.
काँग्रेस नेते जयराम रमेश यांनी मुरली देवरा यांचा दाखला देत मिलिंद देवरा यांच्यावर अप्रत्यक्षरित्या टीका केली.
"मुरली देवरा यांच्यासोबतचा माझा प्रदीर्घ वर्षांचा सहवास राहिला आहे. सर्व राजकीय पक्षांमध्ये त्यांचे जिवलग मित्र होते. तरीही ते काँग्रेससोबत कायम खंबीरपणे उभे राहीले," असं जयराम रमेश यांनी म्हटलं.
देवरा कुटुंबीय आणि काँग्रेस यांच्यातील नातं
देवरा कुटुंबाचा आणि मुंबईच्या राजकारणाचा जुना संबंध आहे. मिलिंद देवरा यांचे वडील मुरली देवरा 1968 साली मुंबई महानगरपालिकेत निवडून गेले. त्यानंतर 1977 साली ते शहराचे महापौर झाले.
1984, 1989, 1991, 1998 साली झालेल्या लोकसभा निवडणुकांमध्ये मुरली देवरा मुंबई दक्षिण लोकसभा मतदारसंघातूनच विजय झाला होता. तसेच ते दीर्घकाळ मुंबई प्रदेश काँग्रेसच्या अध्यक्षपदी कार्यरत होते.
याशिवाय मिलिंद देवरा यांनी 2004मध्ये मुबंई दक्षिण मधून लोकसभेचे खासदार झाले होते. UPA सरकारच्या काळात ते केंद्रीय राज्यमंत्रीही होते.
ते त्यावेळी भारतातील सर्वात तरुण खासदारांपैकी एक होते. ज्योतिरादित्य सिंधिया , आरपीएन सिंग, जितिन प्रसाद आणि सचिन पायलट या तरुण नेत्यांच्या गटाचा म्हणजे 'टीम राहुल गांधी' यांचा ते एक भाग म्हणून ओळखले जात होते.
याशिवाय मिलिंद देवरा मुंबई काँग्रेसचे अध्यक्ष राहिले आहेत. पण 2019मध्ये काँग्रेसचा देशभरात दारूण पराभव झाला. त्यानंतर राहुल गांधींनी काँग्रेसचे राष्ट्रीय अध्यक्षपदाचा राजीनामा दिला. त्यानंतर केवळ तीनच दिवसांमध्ये देवरा यांनीही मुंबई प्रदेश काँग्रेस अध्यक्षपद सोडण्याचा निर्णय घेतला होता.
मुंबई दक्षिण - एक उच्चभ्रू मतदारसंघ
दक्षिण मुंबई हा आज देशातील श्रीमंत लोकसभा मतदारसंघांपैकी एक आहे.
यात कुलाबा, शिवडी, भायखळा, मुंबादेवी, वरळी, मलबार हिल हे विधानसभेचे मतदारसंघ येतात.
अनेक उद्योगांची मुख्यालयं, पोर्ट, रिझर्व्ह बँक तसंच फोर्टमधील अनेक जुन्या वास्तू या मतदारसंघामध्ये येतात.
इथल्या उच्चभ्रूंमुळे तयार झालेल्या संस्कृतीला आणि या परिसराला 'सोबो' (साऊथ बॉम्बेचे लघुरूप) म्हटलं जातं.
या मतदारसंघाचं आणि उद्योगांचं नाते सांगताना लोकसत्ता दैनिकाचे संपादक गिरीश कुबेर म्हणाले, "हा मतदारसंघ धनाढ्यांचा आहे. अनेक बँकांची मुख्यालयं इथं आहेत. देवरा कुटुंबाचे आणि अंबानी कुटुंबांचे जवळचे संबंध होते. अंबांनीवरील अनेक पुस्तकांमध्ये याचा उल्लेखही आला आहे."
दक्षिण मुंबईत सहा विधानसभा मतदारसंघ आहेत. यापैकी दोन ठाकरे गटाकडे, एक शिंदेंच्या शिवसेनेकडे, दोन भाजप आणि एक काँग्रेसकडे आहे.
वरळीतून शिवसेना ठाकरे गटाचे आमदार आदित्य ठाकरे, शिवडी विधानसभा मतदारसंघात अजय चौधरी, मुंबादेवी विधानसभा मतदारसंघातून अमिन पटेल, भायखळ्यातून यामिनी जाधव, मलबार हिल मतदारसंघातून मंगलप्रभात लोढा आणि कुलाब्यातून राहुल नार्वेकर सध्या प्रतिनिधित्व करत आहेत.