नाशिकमध्ये २७ व्या राष्ट्रीय युवा महोत्सवाचे पंतप्रधानांच्या हस्ते उद्घाटन

शनिवार, 13 जानेवारी 2024 (09:56 IST)
२७ व्या राष्ट्रीय युवा महोत्सवाच्या उद्घाटनाच्या निमित्ताने शुक्रवारी पंतप्रधान नरेंद्र मोदी नाशिकमध्ये आले होते. यावेळी त्यांनी युवकांशी संवाद साधला. सोबतच त्यांचा रोड शो, गोदावरी नदीच्या तिरी पवित्र रामकुंडावर जलपूजन आणि ऐतिहासिक काळाराम मंदिरात भगवान श्री रामाचे दर्शन घेतले. अयोध्येत होत असलेल्या राम मंदिराच्या प्रतिष्ठानेच्या पाश्वर्भूमीवर नाशिकच्या काळा रामाचे त्यांनी घेतलेले दर्शन महत्वाचे मानले जात आहे. याशिवाय अयोध्येतील राम मंदिराच्या उद्घाटनापर्यंत त्यांनी नाशिकच्या काळाराम मंदिरात दर्शन घेत अकरा दिवसांच्या उपवासाला सुरुवात केली आहे. यासोबतच सामाजिक आणि ऐतिहासिक दृष्ट्या महत्व असलेल्या या मंदिराला भेट देत देशवासियांना संदेश देण्याचा प्रयत्नही केला आहे. इतिहासात पहिल्यांदाच नाशिकच्या काळाराम मंदिराला भेट देणारे ते पहिले पंतप्रधान ठरले आहेत.
 
घराणेशाहीच्या राजकारणाने देशाचे नुकसान केले : मोदी
भारत लोकशाहीची जननी आहे. लोकशाहीत तरूणांचा सहभाग जेवढा जास्त असेल, तेवढे देशाचे भविष्य चांगले असेल. तरूण सक्रिय राजकारणात आले, तर घराणेशाहीच्या राजकारण कमी होत जाईल. घराणेशाहीच्या राजकारणामुळे देशाचे मोठे नुकसान झाले आहे अस म्हणत  पंतप्रधान नरेंद्र मोदी विरोधकांवर निशाणा साधला आहे.
 
आधुनिक भारत घडविण्यासाठी तरुणांच्या मार्गात येणारे विविध अडथळे दूर करण्यात येत आहे. कौशल्यठ विकासावर आधारित राष्ट्रीय शिक्षण धोरण अंमलात येत आहे. त्यातून रोजगार निर्मितीला चालना मिळणार आहे. आयआयटी, एनआयटी महाविद्यालये सुरू करण्यात येत आहेत. युवकांमधील कौशल्य विकासासाठी पाश्चात्य देशांबरोबर सामंजस्य करार करण्यात आले असून त्यांचाही लाभ होत आहे. महामार्गांची निर्मिती, वंदे भारत रेल्वे, विमानतळांचाही विकास करण्यात येत आहे. चंद्रयान, आदित्य एल १ च्या यशाने जगाला भुरळ पडली आहे. गेल्या दहा वर्षांत केंद्र सरकारने युवकांना नवनवीन संधी दिली आहे असे सांगितले.
 
यावेळी व्यासपीठावर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, केंद्रीय माहिती व प्रसारण, युवक कल्याण व क्रीडा मंत्री अनुराग ठाकूर, केंद्रीय क्रीडा राज्यमंत्री निसिथ प्रामाणिक, केंद्रीय आरोग्य व कुटुंब कल्याण राज्यमंत्री डॉ. भारती पवार, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री अजित पवार, अन्न व नागरी पुरवठा मंत्री छगन भुजबळ, नाशिक जिल्ह्याचे पालकमंत्री तथा सार्वजनिक बांधकाम मंत्री (सार्वजनिक उपक्रम) दादाजी भुसे, महसूल मंत्री राधाकृष्ण विखे पाटील, ग्रामविकास व पर्यटन मंत्री गिरीश महाजन, क्रीडा व युवक कल्याण मंत्री संजय बनसोडे, विधानसभेचे उपाध्यक्ष नरहरी झिरवाळ, खासदार डॉ. सुभाष भामरे, खासदार हेमंत गोडसे, आमदार सर्वश्री चंद्रशेखर बावनकुळे, नरेंद्र दराडे, किशोर दराडे, माणिकराव कोकाटे, दिलीप बोरसे, दिलीपराव बनकर, प्रा. देवयानी फरांदे, सरोज अहिरे, डॉ. राहुल आहेर, सीमा हिरे,  नितीन पवार, ॲड. राहुल ढिकले आदी उपस्थित होते.
 
कार्यक्रमामध्ये  विविध राज्यांच्या संघांनी पथसंचलन केले. तसेच ‘विकसित भारत @2047- युवा के लिए- युवा का द्वारा’ या संकल्पनेवर विविध सांस्कृतिक कार्यक्रम सादर करण्यात आले.
 
युवकांना दिले हे तीन मंत्र  
सभेत बोलताना पंमोदींनी देशातील युवकांना तीन मंत्र दिले. यात मेड इन इंडिया उत्पादनाचा उपयोग करा, मद्यपान किंवा कुठल्याही व्यसनापासून दूर राहा, ड्रग्जच्या आहारी जाऊ नका आणि आई बहिणींवरून अपशब्द वापरणे बंद करा असे सांगितले.
 
तीर्थक्षेत्रात स्वच्छता अभियान राबवा, श्रमदान करा 
पुढे त्यांनी सांगितले की, नाशिक पंचवटी भूमीत प्रभू श्रीरामाने अनेक काळ व्यतीत केला. मी या भूमीला श्रद्धापूर्वक प्रणाम करतो. मी आवाहन केलं होतं जानेवारीपर्यंत आपण सर्व २२ जानेवारीपर्यंत देशातील सर्व मंदिराची साफसफाई करावी. आज मला काळाराम मंदिरात दर्शन करण्याचा, मंदिर परिसरात सफाई करण्याचं सौभाग्य मिळालं. मी देशवासियांना आग्रह करेन, राम मंदिरात प्राणप्रतिष्ठाच्या पावन दिवशी देशातील सर्व मंदिरं, सर्व तीर्थक्षेत्रात स्वच्छता अभियान राबवा, श्रमदान करा, असे आवाहन केले.

यावेळी मोदी यांच्या नेतृत्वाखाली नव्या भारताची जडणघडण होत आहे. त्यासाठी राष्ट्रीय युवा महोत्सव तरुणांसाठी प्रेरणास्रोत ठरेल असल्याचे शिंदे यांनी सांगितले. मोदी यांच्या नेतृत्वाखालील भारताचे नाव जगात आदराने घेतले जात आहे. भारताची वाटचाल महासत्तेकडे सुरू आहे. त्यामुळे भारताचे भवितव्य उज्ज्वल आहे. स्टार्ट अप, स्टँड अप इंडिया यांसारख्या उपक्रमांमुळे भारताची आत्मनिर्भरतेकडे वाटचाल सुरू आहे. राज्यातील तरुणांच्या सबलीकरणासाठी आणि त्यांचे कौशल्य विकसित करून त्यांना रोजगार उपलब्ध व्हावा यासाठी विविध उपाययोजना करण्यात येत असल्याची माहिती शिंदे यांनी दिली. तर आशियाई क्रीडा स्पर्धेत भारताने प्रथमच शंभरावर पदके पटकावली आहेत. भारताने आता ऑलिम्पिक स्पर्धेच्या आयोजनाची तयारी सुरू केली आहे. भारताला २०४७ पर्यंत विकसित राष्ट्र आणि वैभवशाली, समृध्द भारत घडविण्याचे स्वप्न प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी पाहिले. त्यासाठी युवकांनी सहकार्याचा संकल्प सोडावा, असेही आवाहन मंत्री ठाकूर यांनी केले.
 
ऐतिहासिक काळाराम मंदिरात घेतले भगवान दर्शन
प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी येथील ऐतिहासिक श्री काळाराम मंदिरात जावून भगवान श्रीरामाचे दर्शन घेतले. यावेळी त्यांनी काळाराम मंदिरात विधीवत पूजा व आरती करण्यात आली. यावेळी मोदी यांच्या समोर अभंग आणि भावार्थ रामायणातील ८ व्या अध्यायाचे (श्लोकांचे) ज्यामध्ये प्रभू श्रीराम यांचा नाशिकमधील वास्तव्याचा उल्लेख आहे, त्याचे वाचन करण्यात आले. यावेळी मंदिर परिसरात उपस्थित महंत, वारकरी आणि संत कुटुंबातील वंशज यांच्याशी संवाद साधला.

Edited By -  Ratnadeep ranshoor
 

वेबदुनिया वर वाचा

संबंधित माहिती