केंद्रीय गृहमंत्री अमित शहा 16 रोजी गोवा दौऱ्यावर

मंगळवार, 11 एप्रिल 2023 (21:08 IST)
पणजी : केंद्रीय गृहमंत्री अमित शहा हे येत्या रविवारी 16 एप्रिल रोजी गोवा दौऱ्यावर येणार असून फर्मागुढी-फोंडा येथे जाहीर सभा घेऊन लोकसभा निवडणुकीचे रणशिंग फुंकणार आहेत. भाजपच्या गाभा समितीची (कोअर कमिटी) बैठक झाल्यानंतर गोवा प्रदेश भाजप अध्यक्ष सदानंद तानावडे व मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत यांनी ही माहिती दिली. लोकसभा निवडणुकीची भाजप तयारी करीत असून त्यानिमित्ताने शहा यांचा प्रवास सुरू आहे. ते महाराष्ट्रातून गोव्यात येणार असून फोंडा फर्मागुढी येथे जाहीर सभा निश्चित करण्यात आली आहे.

दक्षिण गोवा लोकसभा मतदारसंघात पुन्हा भाजपचा उमेदवार विजयी होण्यासाठी ते विशेष स्वतंत्र बैठक घेणार असल्याचे सांगण्यात आले. फोंडा व सांखळी नगरपालिका निवडणुकीवर गाभा समितीत चर्चा झाल्याची माहिती तानावडे यांनी दिली. दोन्ही ठिकाणी भाजपचे आमदार असल्याने पालिका निवडणूक भाजप स्वबळावर लढणार असून तेथे भाजपचे उमेदवार निवडून येतील असा ठाम विश्वास तानावडे यांनी प्रकट केला. निवडणूक पक्षीय पातळीवर नसली तरी भाजपने उतरवलेले उमेदवारच विजयी होणार असल्याची खात्री त्यांनी वर्तवली. फोंड्याची जबाबदारी विनय तेंडुलकरकडे देण्यात आली असून सांखळीची जबाबदारी आपल्याकडे आहे असे तानावडे म्हणाले.
 
Edited By-Ratnadeep Ranshoor

वेबदुनिया वर वाचा

संबंधित माहिती