प्लॅस्टिकचा कागद फाटला आणि तीन शाळकरी मित्रांचा दुर्देवी मृत्यू

गुरूवार, 31 मार्च 2022 (09:35 IST)
औरंगाबाद जिल्ह्यातील अजिंठा येथे एक हृदयद्रावक घटना घडली आहे ज्यात तीन शाळकरी मित्रांचा मृत्यू झाला आहे. तिघं मित्र दहावीचा पेपर देऊन जवळच्या शेततळ्यात पोहोयला गेले असताना हा अपघात झाला. पोहता येत नसल्याने तिघांचा भयावह अंत झाला आहे. या धक्कादायक घटनेमुळे परिसरात एकच खळबळ उडाली आहे.
 
उमेर खान नासेर खान (१६), शेख अनस शेख हाफीज (१६) आणि अक्रम खान अयुब खान (१६) अशी मृतांची नावे आहेत. तिघांवर एकाच दिवशी अंत्यसंस्कार करण्याची वेळ आली आहे. हे एकाच वर्गात शिकत असून बुधवारी त्यांचा दहावीचा पेपर होता नंतर दुपारी २ वाजेच्या सुमारास पेपर झाल्यानंतर ते तिघेही त्यांच्या इतर दोन मित्र फैजान खान आणि रायन खान यांच्यासह अजिंठा बसस्थानकामागील अनाड रोडजवळील शेततळ्यात पोहण्यासाठी गेले होते. येथे तिघांनी शेततळ्यात उडी घेतली मात्र कोणालाही पोहता येत नसल्याने स्वत:चा बचाव करण्यासाठी त्यांनी शेतात बांधलेली प्लॅस्टिक कागदाला पकडलं. पण त्याचवेळी पेपर फाटला आणि तिघेही पाण्यात बुडाले. 
 
यावेळी शेताजवळ उपस्थित अन्य दोन मित्रांनी तिघांनाही पाण्यातून बाहेर काढण्याचा प्रयत्न केला. मात्र यापैकी कोणालाही पोहता येत नसल्याने तिघांनाही वाचवण्यात यश आले नाही.
 
त्यामुळे फैजानने तत्काळ गावाकडे धाव घेत घटनेची माहिती गावकऱ्यांना दिली. घटनास्थळी पोहोचलेल्या ग्रामस्थांनी तिघांनाही अजिंठा ग्रामीण रुग्णालयात उपचारासाठी दाखल केले. पण तोपर्यंत खूप उशीर झाला होता. डॉक्टरांनी तिघांचीही प्राथमिक तपासणी करून त्यांना मृत घोषित केले. तीन वर्गमित्रांचा मृत्यू झाल्याने गावात शोककळा पसरली आहे. काचवेळी तिन्ही मित्रांवर दफनविधी करण्यात आला आहे.

वेबदुनिया वर वाचा

संबंधित माहिती