मिळालेल्या माहितीनुसार बँक ऑफ बडोदाचे मॅनेजर शिवशंकर मित्रा (५२ वर्षे) हे मूळचे उत्तर प्रदेशातील प्रयागराज येथील रहिवासी होते. ते बारामतीच्या भिगवान रोड शाखेत काम करत होते. गुरुवारी रात्री त्यांनी शाखेतील त्यांच्या ऑफिसमध्ये गळफास घेऊन आत्महत्या केली. तसेच त्यांनी त्यांच्या सुसाईड नोटमध्ये लिहिले आहे की, “मी शिवशंकर, बँक ऑफ बडोदा, बारामती शाखेचा मुख्य व्यवस्थापक, आज बँकेच्या कामाच्या जास्त दबावामुळे आत्महत्या करत आहे. मी बँकेला कर्मचाऱ्यांवर अनावश्यक दबाव आणू नये अशी विनंती करतो. सर्व कर्मचारी त्यांची जबाबदारी समजून घेतात आणि खूप मेहनत करतात. ते त्यांचे १०० टक्के देतात.
पत्नी आणि मुलीची माफी मागितली आहे.
त्यांनी असेही स्पष्ट केले की ते स्वतःच्या इच्छेने आत्महत्या करत आहे. यात त्यांच्या कुटुंबाची चूक नाही. बँकेच्या जास्त दबावामुळेच ते हे पाऊल उचलत आहे. त्यांनी पुढे लिहिले की, “माझी पत्नी प्रिया आणि मुलगी माही कृपया मला माफ करा. "शक्य असल्यास माझे डोळे दान करा" अशी मागणी त्यांनी केली होती.
पोलिसांकडून मिळालेल्या माहितीनुसार, वाढत्या दबावामुळे मानसिकदृष्ट्या खचलेल्या शिवशंकर यांनी आत्महत्या करण्यापूर्वी पाच दिवस आधी बँक व्यवस्थापनाला पत्र लिहून स्वेच्छा निवृत्ती (VRS) मागितली होती. परंतु बँकेकडून त्यांना कोणताही प्रतिसाद मिळाला नाही, त्यामुळे नैराश्यात त्यांनी हे कठोर पाऊल उचलले. सध्या पुणे पोलिसांनी गुन्हा दाखल केला आहे आणि प्रकरणाची चौकशी करत आहे.