औरंगाबादच्या या तरुणांना बनायचंय 'डॉन', दुर्लभ कश्यपच्या पावलावर पाऊल

सोमवार, 28 फेब्रुवारी 2022 (18:06 IST)
मध्यप्रदेशच्या उज्जैनमध्ये काही वर्षांपूर्वी दुर्लभ कश्यप नावाच्या गुंडानं अक्षरशः धुमाकूळ घातला होता. गँगवॉरमध्येच त्याचा अंत झाला. पण आता औरंगाबादमध्ये पुन्हा एकदा दुर्लभ कश्यपच्या नावाची चर्चा होऊ लागली आहे.
 
ही चर्चा होण्यामागचं कारण हे अत्यंत आश्चर्यकारक आणि त्याहीपेक्षा जास्त धक्कादायक असं आहे. ते म्हणजे औरंगाबादेत काही तरुण दुर्लभ कश्यपचा आदर्श डोळ्यासमोर ठेऊन डॉन बनण्याची स्वप्नं पाहत आहेत.
 
विशेष म्हणजे हे तरुण केवळ स्वप्नं पाहून थांबलेले नाहीत, तर त्यांनी शहरातील काही भागांमध्ये गुंडगिरी करायला सुरुवातही केल्याचं समोर येत आहे.
 
काही भागांमध्ये या गँगची दहशत पसरली असून लोक त्यांच्याबाबत बोलायलाही घाबरत असल्याचं चित्र पाहायला मिळालं आहे. त्यामुळं पोलिसांसमोर एक नवं आव्हान या माध्यमातून उभं झाल्याचं पाहायला मिळत आहे.
 
नेमकं काय घडलं?
औरंगबादच्या पुंडलिक नगर आणि त्याच्या आसपासच्या परिसरात गेल्या काही महिन्यांमध्ये गुन्हेगारी घटनांमध्ये वाढ झाल्याचं पाहायला मिळत होतं.
 
या परिसरातमध्ये काही तरुणांमध्ये वाद, हाणामारी किंवा गँगवॉर झाल्याच्या बातम्याही समोर येऊ लागल्या होत्या. पण याबाबत काही दिवसांनी समोर आलेली माहिती ही प्रचंड धक्कादायक होती.
 
या परिसरातील अगदीच तारुण्यात पाऊल ठेवलेले म्हणजे 19 ते 21 वयोगटातील तरुणांमध्ये एक भलतीच क्रेझ निर्माण झाल्याचं समोर आलं. ती क्रेझ होती डॉन बनण्याची.
 
बरं या तरुणांमध्ये केवळ डॉन बनण्याची क्रेझ होती एवढंच नाही तर त्यासाठी त्यांना अशाच एका डॉनकडून प्रेरणाही मिळाली होती. हा डॉन म्हणजे मध्य प्रदेशच्या उज्जैनमधील कुप्रसिद्ध दुर्लभ कश्यप.
 
दुर्लभ कश्यपला आदर्श मानून या परिसरातील तरुणांनी त्यांची टोळी तयार केली आणि त्या माध्यमातून दहशत पसरवत बेकायदेशीर कामंही सुरू केली.
 
कोण होता दुर्लभ कश्यप?
दुर्लभ कश्यप हा मध्य प्रदेशातील उज्जैनमधला रहिवासी होता. त्याचे वडील हे व्यावसायिक होते तर त्याची आई शिक्षिका होती. मात्र दुर्लभनं अगदी कमी वयामध्येच डॉन बनायचं असं ठरवलं होतं.
 
संपूर्ण उज्जैनवर राज्य करायचं हे स्वप्न त्यांनं अगदी कमी वयातच पाहिलं होतं. त्याचा परिणाम म्हणजे वयाची 18 वर्षे पूर्ण होण्याआधीच दुर्लभ कश्यपच्या नावावर अनेक गंभीर गुन्ह्यांची नोंद झाली होती.
 
दुर्लभ कश्यपनं उज्जैनमध्ये अत्यंत कमी कालावधीमध्ये त्याच्या गँगची दहशत निर्माण केली होती. त्याची आणि त्याच्या गँगची एक खास वेगळी अशी वेशभूषाही असायची.
 
कपाळावर आडवे कुंकू, डोळ्यात काजळ आणि खांद्यावर काळा रुमाल अशा वेशामध्ये तो फिरायचा. त्याच्या गँगचे सदस्यही त्याच्यासारखीच वेशभूषा करायचे.
 
सोशल मीडियातून घ्यायचा सुपारी
दुर्लभच्या गँगमध्ये जवळपास 100 पेक्षा अधिक तरुण मुलं होती आणि ती हप्ता वसुली, लूटमार, अशी सर्व बेकायदेशीर कामं सुपारी घेऊन करायची असंही सांगितलं जातं.
 
काम मिळवण्यासाठी दुर्लभ कश्यप थेट सोशल मीडियावर जाहिरात देऊन, सुपारी द्या असं आवाहन करायचा. सोशल मीडियाच्या माध्यमातून त्यानं तरुणांत लोकप्रियता मिळवली होती.
 
दुर्लभ कश्यपला पोलिसांनी कारवाई करत अटक केली होती. पण कोरोना काळात इतर कैद्यांबरोबर तो बाहेर आला. त्यावेळी जुन्या शत्रुत्वातून दुसऱ्या एका गँगनं चाकूनं भोसकून अनेक वार करत त्याची हत्या केली होती.
 
दुर्लभ कश्यपच्या नावाने उज्जैनमध्ये अजूनही अनेक गँग सुरू असल्याचं सांगितलं जातं. गुन्हेगारी जगातला पोस्टरबॉय असं कश्यपबाबत म्हटलं जातं.
 
औरंगाबादेत तरुणांनी लावले बॅनर
दुर्लभ कश्यपचा आदर्श समोर ठेवून गुंडगिरीच्या मार्गावर निघालेल्या औरंगाबादच्या पुंडलिकनगरमधील तरुणांच्या या गँगमधले काहीजण त्याच्यासारखीच वेशभूषादेखील करायचे.
 
एवढंच नाही तर या तरुणांनी चौकामध्ये दुर्लभ कश्यपचा फोटो असलेला बॅनरही काही दिवसांपूर्वी लावला होता.
 
या गँगमधील तरुण परिसरामध्ये खुलेआम लूटमार, चोऱ्या असे प्रकार करू लागले होते. त्याचबरोबर मारहाणीसारख्या घटनांमुळं त्यांनी परिसरात दहशतही निर्माण केली होती.
 
हा सर्व प्रकार सुरू असताना त्यांच्यावर कठोर कारवाई झाली नाही, कदाचित त्यातून त्यांचं धाडस वाढत गेलं आणि अखेर एक मोठी घटना या परिसरात घडली आणि सगळ्यांचं लक्ष या प्रकाराकडं वेधलं गेलं.
 
तरुणावर चाकू, तलवारीनं जीवघेणा हल्ला
परिसरातील नागरिकांवर दहशत निर्माण करण्याच्या प्रयत्नातून या गँगमधील काही सदस्यांनी काही दिवसांपूर्वी पुंडलिकनगर परिसरातील एका तरुणावर चाकू, तलवारींनी जीवघेणा हल्ला केला.
 
शुभम मनगटे नावाच्या तरुणाचे कुटुंबीय या परिसरात छोटंसं किराणा दुकान चालवतात. त्या दुकानातून तंबाखू, गुटखा फुकट मिळवण्यासाठी या गँगमधील तरुणांनी गोंधळ घालत धमकी दिली होती.
 
कुटुंबीयांकडून याबाबत समजल्यानंतर शुभम या तरुणांना समजावून सांगण्यासाठी गेला. तेव्हा या गँगनं शुभमवर जीवघेणा हल्ला केला.
 
या गँगमधील सदस्यांनी फायटर, चाकू, तलवारी यांनी शुभमवर अनेक वार केलं. त्यात शुभम प्रचंड जखमी झाला आणि कोसळला. अनेक लोक घरातून पाहत राहिले त्यांनी मदत केली नाही.
 
शुभमच्या कुटुंबीयांनी जखमी अवस्थेत त्याला रुग्णालयात नेलं. त्याठिकाणी त्याला 50 पेक्षा अधिक टाके पडल्याचं समोर आलं. त्याच्यावर अजूनही उपचार सुरू आहेत.
 
शुभम हा स्पर्धा परीक्षेची तयारी करत होता. पण या घटनेनंतर त्याला एका परीक्षेलाही मुकावं लागलं. शुभमच्या आईनं झी 24 तास वाहिनीशी बोलताना या गुन्हेगारांचा प्रचंड मनस्ताप होत असून त्यांना फाशी व्हायला हवी, अशा शब्दांत संताप व्यक्त केला आहे.
 
पत्रकारांनीही अनुभवली दहशत
या गँगची परिसरामध्ये प्रचंड दहशत होती. या दहशतीपोटीच शुभमला मारहाण झाली तेव्हा परिसरातील नागरिक त्याच्या मदतीला न येता खिडक्या आणि घरांमधून बघ्यासारखं सर्व पाहत होते.
 
औरंगाबादच्या काही स्थानिक पत्रकारांनी या घटनेनंतर परिसरात जाऊन वार्तांकनाचा, माहिती घेण्याचा प्रयत्न केला तेव्हा त्यांनाही या दहशतीचा अनुभव आल्याचं त्यांनी सांगितलं.
 
पत्रकार या परिसरात जेव्हा विचारपूस करत होते तेव्हा 13 वर्षांच्या आसपास वय असेल असा किशोरवयीन मुलगा मोबाईलनं त्यांचं शुटिंग करत होता.
 
"शुटिंग करणाऱ्या या मुलाच्या कपाळावर कश्यपसारखाच टिळा, डोळ्यात कश्यपसारखंच काजळ भरलेलं होतं, गळ्यात जाड साखळी होती. आम्ही त्याला शुटींग करायचं कारण विचारताच त्यानं मोबाईल दुसऱ्या मुलाकडं दिला आणि आम्हाला धमकावू लागला," असं त्यांनी सांगितलं.
 
या गुंडाच्या दहशतीपोटी पत्रकारांना काहीही माहिती देण्यास कोणीही पुढं आलं नाही.
 
पोलिस म्हणाले, 'शिक्षेपर्यंत पोहोचवणार'
शुभम मनगटे या तरुणावर हल्ला झाल्याच्या प्रकारानंतर गुन्ह्यातील सर्व आरोपींना पोलिसांनी अटक केली आहे, अशी माहिती पोलीस उपायुक्त दीपक गिऱ्हे यांनी बीबीसी मराठीशी बोलताना दिली.
 
या गँगमधील बहुतांश सदस्य हे 19 ते 21 वयोगटातील असल्याचं त्यांनी सांगितलं. या सर्वांवर आधीचे देखील काही गुन्हे दाखल, आहेत अशी माहिती त्यांनी दिली.
 
या आरोपींपैकी बहुतांश सदस्यांचे सोशल मीडियावरील अकाऊंट पाहता त्यावरून दुर्लभ कश्यपशी त्यांचा संबंध जोडला जात असल्याचं त्यांनी सांगितलं.
 
अशा भरकटलेल्या तरुणांना पुन्हा चांगल्या मार्गावर आणण्यासाठी पोलीस कारवाईशिवाय इतर काही प्रयत्न करणार आहे का? अशी विचारणा बीबीसीनं केली.
 
"या गुन्ह्यातील सर्व आरोपींना अटक करण्यात आली आहे. त्यांच्यावर कारवाई करून न्यायालयाच्या माध्यमातून दोष सिद्ध करून त्यांना जास्तीत जास्त शिक्षेपर्यंत पोहोचवण्याचा पोलीस प्रयत्न करतील.
 
अशा मार्गावर गेल्यास कशा कठोर कायदेशीर कारवाईला सामोरं जावं लागतं, हाच संदेश पोहोचवून तरुणांना या पासून परावृत्त करण्याचा प्रयत्न करू," असं उपायुक्त गिऱ्हे म्हणाले.
 
पोलिसांचं असं मत असलं तरी, "या मुलांना डॉन बनायचं आहे. तुरुंगात जाणं म्हणजे त्यांच्यासाठी अभिमानाची गोष्ट आहे," असं मत स्थानिक पत्रकारांनी मांडलं आहे.
 
त्यामुळंच दुर्लभ कश्यपसारखा डॉन बनण्याचं स्वप्न असलं तरी, त्याच दुर्लभ कश्यपचा अंत किती वाईट पद्धतीनं झाला हेही या तरुणांना लक्षात येणं गरजेचं आहे.

वेबदुनिया वर वाचा

संबंधित माहिती