सोलापूर शहरात विविध खासगी रुग्णालयांमध्ये उपचार करून घेतलेल्या सुमारे आठ हजार करोना रुग्णांच्या वैद्यकीय देयकांची तपासणी महापालिका प्रशासनाने तपासली. यात वाढवून लावलेली एक कोटी ९४ लाख रुपयांएवढी रक्कम संबंधित रुग्णांना परत करण्यास रुग्णालयांना भाग पाडले गेले. गेल्या मार्चमध्ये करोनाची दुसरी लाट आल्यानंतर रुग्णांची संख्या झपाटय़ाने वाढली. त्यामुळे रुग्णांना उपचारासाठी रुग्णालयांमध्ये खाटा मिळणेही दुरापास्त झाले होते. अलीकडे करोना नियंत्रणाखाली आल्यामुळे रुग्णांना वैद्यकीय उपचाराकरिता रुग्णालयांमध्ये खाटा सहज उपलब्ध होत आहेत. मात्र गेल्या तीन महिन्यांमध्ये करोनाच्या दुसऱ्या लाटेत वैद्यकीय उपचारासाठी दाखल झालेल्या रुग्णांना काही रुग्णालयांनी भरमसाठ देयके लावून प्रचंड प्रमाणात आर्थिक लूट केल्याच्या तक्रारी होत्या.
दरम्यान, महापालिका प्रशासनाने केलेल्या तपासणीत संबंधित रुग्णालयांनी केलेली लूट निदर्शनास आली. शहरात करोना उपचारासाठी एकूण ६० रुग्णालये असून यात डॉ. कोटणीस रेल्वे रुग्णालयासह राज्य विमा कामगार आणि महापालिकेच्या बॉईस अशा तीन रुग्णालयांमध्ये मोफत उपचार केले जातात. उर्वरित रुग्णालयांमधील दाखल झालेल्या रुग्णांच्या वैद्यकीय देयकांचे महापालिका प्रशासनामार्फत लेखा परीक्षण केले जाते. आतापर्यंत सात हजार ८६८ रुग्णांच्या वैद्यकीय देयकांचे लेखा परीक्षण झाले असून त्यात एकूण ४८ कोटी ९० लाख ५४ हजार ४७८ रुपयांची देयके आकारण्यात आली होती. या देयकांचे लेखा परीक्षण झाल्यानंतर एक कोटी ९३ लाख ८८ हजार ९७७ रुपयांची जादा आकारणी झाल्याचे आढळून आले. ही रक्कम वसूल करून संबंधित रुग्णांना परत करण्यात आली आहे. यापूर्वी करोनाच्या पहिल्या लाटेत पालिका प्रशासनाने रुग्णांना आकारण्यात आलेली ८० लाखांची जादा देयके वाचविली होती. सध्या रुग्णांना उपचारानंतर घरी पाठविताना रुग्णालयांकडून आकारण्यात येणाऱ्या प्रत्येक देयकाचे पालिका प्रशासनाकडून लेखा परीक्षण केले जात आहे. जास्तीच्या देयकांबाबत आक्षेप असल्यास रुग्ण वा त्यांच्या नातेवाइकांनी पालिका प्रशासनाकडे तक्रारी नोंदवाव्यात, असे आवाहन करण्यात आले आहे.