देवेंद्र फडणवीस एकनाथ खडसेंच्या घरी जाऊन काय साध्य करू पाहत आहेत?

मंगळवार, 1 जून 2021 (23:14 IST)
विरोधी पक्षनेते आणि माजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस हे मंगळवारी (1 जून) जळगावच्या मुक्ताईनगरमध्ये एकनाथ खडसे यांच्या घरी पोहोचले. फडणवीस यांनी भाजपच्या खासदार रक्षा खडसे यांची भेट घेतली.
 
देवेंद्र फडणवीस यांनी रक्षा खडसे यांची भेट घेऊन पक्षबांधणीबाबत चर्चा केल्याचं सांगण्यात आलं.
 
एकनाथ खडसे हे दोन दिवसांपूर्वीच मुंबईला गेले आहेत. त्यामुळे फडणवीस त्यांच्या घरी जाऊनही या दोन नेत्यांची भेट झाली नाही. मात्र, 'मला खूप त्रास दिला गेला. मी फक्त देवेंद्र फडणवीस यांच्यामुळे पक्ष सोडतोय,' असं म्हणत एकनाथ खडसेंनी भाजपला सोडचिठ्ठी दिल्यानंतर फडणवीस पहिल्यांदाच खडसेंच्या घरी गेल्यामुळे या भेटीबाबत राजकीय चर्चा सुरू झाल्या. देवेंद्र फडणवीस या भेटीतून काय साध्य करू पाहत आहेत? खडसेंच्या घरी जाऊन ते कोणता राजकीय मेसेज देत आहेत का? असे प्रश्नही त्यातून निर्माण झाले.
या प्रश्नांची उत्तरं पाहण्याआधी 2019 च्या विधानसभा निवडणुकीआधी आणि निवडणुकीनंतर म्हणजेच राज्यातील सत्ता गमावल्यानंतर भाजपमध्ये नेमकं काय घडलं होतं, हे थोडक्यात समजून घ्यायला हवं.
 
फडणवीसांवर पक्षातील ओबीसी नेत्यांना डावलल्याचा आरोप
2019 च्या विधानसभा निवडणुकीच्या वेळी एकनाथ खडसेंना उमेदवारी नाकारण्यात आली होती. त्यानंतर विधानपरिषदेच्या वेळीही खडसेंना उमेदवारी दिली गेली नाही. केवळ खडसेचं नाही तर विधानसभा निवडणुकीत पराभूत झालेल्या पंकजा मुंडे यांनाही विधानपरिषदेच्या वेळी डावललं गेलं. विनोद तावडे, चंद्रकांत बावनकुळे यांनाही विधानपरिषदेची उमेदवारी दिली गेली नाही.
 
या नेत्यांना डावलून रणजितसिंह मोहिते पाटील, गोपीचंद पडळकर, प्रवीण दटके, डॉ. अजित गोपछडे या नेत्यांना भाजपने उमेदवारी जाहीर केली. त्यावेळी देवेंद्र फडणवीस हे पक्षातील जुन्या आणि ओबीसी नेत्यांना डावलत आहेत का? त्याचबरोबर देवेंद्र फडणवीस हे एकनाथ खडसे यांच्या भागात गिरीश महाजन किंवा पंकजा मुंडे यांच्या भागात भागवत कराड यांच्यासारख्या नेत्यांना समोर आणून नवीन पर्याय तयार करत आहेत का, असे प्रश्न उपस्थित झाले होते.
अर्थात, फडणवीस आणि एकनाथ खडसे यांच्या संबंधांतील कटुतेला केवळ हीच पार्श्वभूमी नव्हती. एकनाथ खडसे आणि देवेंद्र फडणवीस यांच्यातील संबंधांमध्ये 2014 मध्ये भाजपने राज्यात सत्तास्थापन करायला सुरुवात केल्यानंतरच तणाव यायला सुरूवात झाली होती. 2019 मधील विधानसभा आणि विधानपरिषद निवडणुकांच्या निमित्ताने हे संबंध तुटेपर्यंत ताणले गेले एवढंच.
 
एकनाथ खडसे आणि देवेंद्र फडणवीस यांच्यात नेमके काय बिनसले?
2014 मध्ये केंद्रात आणि राज्यात भाजपची सत्ता आली. देवेंद्र फडणवीस यांची मुख्यमंत्रिपदी घोषणा झाल्यानंतर एकनाथ खडसे शपथविधी सोहळ्याला येण्यास तयार नव्हते. मुख्यमंत्रीपदासाठी त्यांची दखल न घेतल्याने ते नाराज होते, असं सांगितलं जात होतं.
 
खडसेंनी शपथविधीला हजेरी लावावी यासाठी त्यांची नाराजी दूर करण्यात आली. पण ते महसूल मंत्री झाल्यानंतर अगदी दोनच वर्षांत त्यांना राजीनामा द्यावा लागला.
भोसरी जमीन घोटाळा प्रकरणी त्यांच्यावर आरोप झाले आणि गुन्हा दाखल करण्याचे आदेश उच्च न्यायालयाने दिल्याने त्यांना राजीनामा द्यावा लागला, असं स्पष्टीकरण देवेंद्र फडणवीस यांनी दिलं होतं.
 
राजीनाम्यानंतर एकनाथ खडसे यांची भाजपमध्ये होत असलेली कोंडी त्यांनी अनेकवेळा जाहीरपणे बोलून दाखवली. एकनाथ खडसे यांच्यावर जाहीर टीका करताना त्यांनी म्हटलं, "आमचे मुख्यमंत्री ड्राय क्लिनर होते. आरोप झाला की क्लिनचिट द्यायचे. पण नाथाभाऊंना दिली नाही. माझ्यावर एवढा राग का आहे?"
 
देवेंद्र फडणवीस यांनी या विधानावर प्रतिक्रिया देताना म्हटलं होतं की, "माझ्यामध्ये फार संयम आहे. मी घरची धुणी रस्त्यावर कधीच धुत नाही. खडसे आमचे ज्येष्ठ नेते आहेत. त्यामुळे मी त्यांच्यावर टीका करणार नाही."
 
खडसे आणि फडणवीसांमधील आरोप-प्रत्यारोप
विधानसभा, विधानपरिषदेची नाकारलेली उमेदवारी तसंच पक्षांतर्गत राजकारण यावर मौन सोडून एकनाथ खडसेंनी गेल्यावर्षी ऑक्टोबर महिन्यात भाजपतून बाहेर पडण्याची घोषणा केली. यावेळी घेतलेल्या पत्रकार परिषदेत खडसे यांनी देवेंद्र फडणवीसांवर आरोप केले. फडणवीसांनीही 'खडसेंनी मला व्हिलन बनवलं,' असं म्हणत आपली बाजू मांडली.
 
'माझी नाराजी देवेंद्र फडणवीस यांच्यावर आहे. मला खूप त्रास दिला गेला. मी फक्त देवेंद्र फडणवीस यांच्यामुळे पक्ष सोडतोय,' असं म्हणत एकनाथ खडसे यांनी भाजप सोडत असल्याची घोषणा केली होती.
 
"माझ्यावर विनयभंगाचे आरोप करण्यात आले, जर मी त्यातून बाहेर पडलो नसतो तर ३ वर्षं जेलमध्ये गेलो असतो. किती आरोप सहन करायचे? मला खूप त्रास दिला गेला. गेली चार वर्षं मानसिक तणावाखाली जगलो," आपली सर्व सहनशक्ती संपल्याच खडसे यांनी म्हटलं होतं.
"मी लाचार, कोणाचे पाय चाटत बसणाऱ्यांपैकी मी नाही. मला पद मिळालं, मी मेहनत केली. तुमच्या उपकारांमुळे पद नाही मिळालं," असंही खडसेंनी म्हटलं होतं.
 
देवेंद्र फडणवीसांनीही खडसे यांनी केलेल्या आरोपांवर प्रत्युत्तर दिलं होतं. फडणवीसांनी म्हटलं होतं, "एकनाथ खडसे जे सांगत आहेत, ते अर्धसत्य आहे. त्यावेळी मी आता बोलणार नाही. त्यांच्या माझ्याबद्दल काही तक्रारी होत्या, त्या त्यांनी वरिष्ठांकडे मांडायला हव्या होत्या. असो... अशावेळी कोणाला तरी व्हिलन ठरवावं लागतं, त्यांनी मला ठरवलं."
 
वादाच्या याच पार्श्वभूमीमुळे फडणवीस यांनी खडसे यांच्या घरी जाऊन रक्षा खडसेंची भेट घेणं बुचकळ्यात पाडणारं ठरतं. त्यातच फडणवीस यांनी सोमवारी (31 मे) शरद पवारांच्या सिलव्हर ओक या निवासस्थानी जात त्यांची भेट घेतली होती. एकनाथ खडसे हे सध्या राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये आहेत. त्यामुळे दोन्ही भेटींचं टाइमिंगही फडणवीसांच्या भूमिकेबद्दल विचार करायला लावणारं ठरलं.
 
अर्थात, राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते नवाब मलिक यांनी फडणवीस खडसेंच्या घरी जाऊन हे वितुष्ट मिटवण्याचा प्रयत्न करत असतील तर ते महाराष्ट्राच्या परंपरेला साजेसं आहे, अशी प्रतिक्रिया व्यक्त केली.
 
त्यांनी म्हटलं की, "महाराष्ट्राची विविध पक्षांच्या नेत्यांशी राजकारणापलिकडे संबंध जपण्याची परंपरा आहे. देवेंद्र फडणवीस आणि एकनाथ खडसे यांच्यात व्यक्तिगत वितुष्ट वाढलं होतं. जर फडणवीस खडसेंच्या घरी जाऊन हे वितुष्ट मिटवण्याचा प्रयत्न करत असतील तर ते महाराष्ट्राच्या परंपरेला धरून ते चालले आहेत."
 
भाजपच्या बाजूने मतं वळवण्याचा प्रयत्न?
याबाबत ज्येष्ठ पत्रकार दीपक भातुसे यांनी बीबीसी मराठीशी बोलताना म्हटलं की, "देवेंद्र फडणवीसांच्या भेटीमुळे खडसेंच्या कार्यकर्त्यांमध्ये संभ्रम निर्माण होऊ शकतो. ज्या देवेंद्र फडणवीसांबरोबर झालेल्या टोकाच्या संघर्षामुळे एकनाथ खडसेंनी पक्ष सोडला; त्यांच्या घरी फडणवीस जातात, त्यांच्या सुनेला भेटतात निश्चित यामागे राजकीय खेळी आहे.
"एकनाथ खडसेंचा राष्ट्रवादीत प्रवेश होऊन बरेच दिवस झाले. त्यांची आमदारकी प्रलंबित आहे. त्यांना अद्याप मोठं पद दिलेलं नाही. यामुळे कार्यकर्त्यांमध्ये कोणाच्या बाजूने जायचं, हा प्रश्न निर्माण झाला आहे. फडणवीसांच्या या भेटीमुळे खडसेंचे कार्यकर्ते अजून संभ्रमित होतील. त्यामुळे जळगावमध्ये विशेष करून खडसेंच्या मतदारसंघात भाजप पक्षाच्या बाजूने मतं वळवण्याचा हा प्रयत्न वाटतो," असं दीपक भातुसे यांनी म्हटलं.
 
'पक्ष मजबूत करण्याचा प्रयत्न'
लोकमतचे सहायक संपादक संदीप प्रधान यांना देवेंद्र फडणवीस यांच्या भेटीमागे इतर काही राजकारण असेल असं वाटत नाही.
 
देवेंद्र फडणवीसांच्या भेटीबद्दल बोलताना त्यांनी म्हटलं, "रक्षा खडसे या भाजपच्या खासदार आहेत. फडणवीस त्यांच्या घरी गेले. पक्षाच्या खासदाराकडे जाणं ही नेहमीची प्रक्रिया आहे.
 
ज्या भागातील एक नेता सोडून गेला तिथे पक्ष मजबूत करण्याचा फडणवीस यांचा प्रयत्न आहे. खडसे यांचं पुर्नवसन अद्याप झालेलं नाही. रक्षा खडसे यांचं एकनाथ खडसेंशी असलेलं नातं पाहता त्यांचाही भाजप पक्ष मजबूत करण्याचा कल आहे. त्यामुळे निश्चितपणे रक्षा खडसे अद्याप भाजप सोडून राष्ट्रवादीत येण्याच्या मनस्थितीत असल्याचं दिसत नाही."
 
याव्यतिरिक्त एकनाथ खडसेंशी जुळवून घेणं हे या भेटीमागचं कारण असेल असं वाटत नसल्याचं संदीप प्रधान यांनी स्पष्ट केलं.

वेबदुनिया वर वाचा

संबंधित माहिती