HSC बोर्डाच्या बारावीच्या परीक्षा रद्द करण्याचे वर्षा गायकवाड यांचे संकेत
मंगळवार, 1 जून 2021 (21:11 IST)
सीबीएसई बोर्डाची बारावीची परीक्षा रद्द केल्याची घोषणा केंद्र सरकारने केल्यानंतर राज्य सरकारने या निर्णयाचं स्वागत केलं आहे. राज्य उच्च माध्यमिक शिक्षण मंडळ म्हणचे एचएससी बोर्डाच्या परीक्षांबाबत लवकरात लवकर निर्णय घेऊ, असं शालेय शिक्षणमंत्री वर्षा गायकवाड यांनी म्हटलं.
राज्य सरकारची प्राथमिकता ही विद्यार्थ्यांची सुरक्षा आणि आरोग्य असल्याचंही वर्षा गायकवाड यांनी स्पष्ट केलं आहे.
त्या म्हणाल्या, "सीबीएसई बोर्डाने बारावीची परीक्षा रद्द करण्याचा निर्णय घेतला आहे त्याचं आम्ही स्वागत करतो. बारावीचं वर्ष प्रत्येक विद्यार्थ्यासाठी महत्त्वाचं आहे. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे आणि आम्ही परीक्षा न घेता समांतर पर्याय देण्याची विनंती केली होती. आम्ही यासंदर्भात लवकरात लवकर निर्णय घेऊ."
सीबीएसई बोर्डाच्या बारावीच्या परीक्षा रद्द झाल्याने एचएससी बोर्डाच्या परीक्षाही रद्द होण्याची शक्यता नाकारता येत नाही. कारण यापूर्वीही राज्य सरकारने 'नो एक्झामिनेशन रुट' म्हणजेच परीक्षा न घेता त्याला समांतर पर्याय द्यावा अशी मागणी केंद्र सरकारकडे केली होती. पण परीक्षा न घेता बारावीच्या विद्यार्थ्यांचे मूल्यांकन कसं करणार हे पाहाणं महत्त्वाचं ठरणार आहे.
कोरोनाच्या पार्श्वभूमीवर बारावीची परीक्षा रद्द करावी अशी मागणी अनेक राज्यांनी केंद्र सरकारकडे केली होती. तसंच विद्यार्थी आणि पालक संघटनांनीही परीक्षा घेण्याऐवजी अंतर्गत मूल्यमापन करून निकाल जाहीर करावा अशी भूमिका घेतली होती. त्यानुसार केंद्र सरकारने आज सीबीएसई बोर्डच्या बारावीच्या परीक्षा रद्द केल्या आहेत.
बारावीच्या विद्यार्थ्यांचा निकाल वस्तुनिष्ठ निकषांच्या आधारे जाहीर करावा अशी सूचना केंद्र सरकारने सीबीएसई बोर्डाकडे केली आहे. तेव्हा वर्षभरात पार पडलेल्या अंतर्गत परीक्षांच्या आधारावर किंवा असाईनमेंट्सच्या माध्यमातून विद्यार्थ्यांना गुण दिले जाऊ शकतात.
HSC बोर्डाच्या परीक्षाही रद्द होणार?
सीबीएसई बोर्डाच्या या निर्णयानंतर महाराष्ट्र सरकार एचएससी बोर्डाच्या परीक्षा सुद्धा रद्द करणार का? हे पहावं लागणार आहे. कारण नीट, जेईई, सीईटी यांसारख्या प्रवेश परीक्षा विद्यार्थ्यांना द्याव्या लागणार आहेत. यात बारावीत किमान गुण असणे अनिवार्य आहे.
दहावी आणि बारावीच्या परीक्षांबाबत मुंबई उच्च न्यायालयात सुनावणी सुरू आहे. यावेळी राज्य सरकारने प्रतिज्ञापत्र सादर करत असताना एचएससी बोर्डाच्या बारावीच्या परीक्षांबाबत केंद्र सरकारच्या निर्णयानंतर भूमिका ठरवू असं सांगितलं होतं. त्यामुळे आता केंद्र सरकारने सीबीएसई बोर्डाची बारावीची परीक्षा रद्द केल्यानंतर राज्य सरकार एचएससी बोर्डाची परीक्षाही रद्द करण्याची शक्यता आहे.
एचएससी बोर्डाची परीक्षा रद्द झाल्यास विद्यार्थ्यांचे मूल्यमापन कशाच्या आधारावर करणार हा महत्त्वाचा प्रश्न उपस्थित होणार आहे. कारण सीबीएसई बोर्डाच्या अभ्यासक्रमानुसार विद्यार्थ्यांचे वेळोवेळी वस्तुनिष्ठ परीक्षा पद्धतीनुसार मूल्यांकन होत असतं. पण एचएससी बोर्डाची परीक्षा पद्धती याहून वेगळी आहे.
अकरावी प्रवेशासाठी ज्याप्रमाणे राज्य सरकारने स्वतंत्र सामाईक प्रवेश परीक्षेचा पर्याय विद्यार्थ्यांना दिला. त्याचप्रमाणे पदवी प्रवेशासाठीही राज्य सरकार एचएससीच्या विद्यार्थ्यांसाठी स्वतंत्र प्रवेश परीक्षा घेण्याचा निर्णय घेऊ शकतं.
'आमच्यावर अन्याय करू नका'
सीबीएसई बोर्डाने परीक्षा रद्द केल्याने आता एचएससीच्याही परीक्षा रद्द करा अशी मागणी काही विद्यार्थी आणि पालकांनी केली आहे.
एचएससी बोर्डाच्या विद्यार्थ्यांना बारावीच्या परीक्षेचा अभ्यास करायचा की नीट, जेईई, सीईटी यांसारख्या प्रवेश परीक्षांचा अभ्यास करायचा याबाबत संभ्रम आहे. कारण एचएससीचा अभ्यासक्रमआणि इतर प्रवेश परीक्षांचा अभ्यासक्रम वेगळा आहे.
दरवर्षी बारावीची परीक्षा साधारण मार्च-एप्रिल या महिन्यात होते आणि त्यानंतर प्रवेश परीक्षांचे वेळापत्रक जाहीर होते. पण यंदा मे महिना उलटला तरी बारावीच्या परीक्षा होणार की नाही याचाच निर्णय अजून झालेला नाही.
नीट, जेईई अॅडव्हान्स, सीईटी या प्रवेश परीक्षा पुढ ढकलल्या आहेत. त्यामुळे बारावीची परीक्षा आणि प्रवेश परीक्षा कधी होणार? त्यांचे निकाल कधी जाहीर होणार? असे प्रश्न आहेत. त्यामुळे महाविद्यालयीन प्रवेश प्रक्रिया प्रत्यक्षात सुरू होण्यासही प्रचंड विलंब होणार आहे.
बारावी विज्ञान शाखेत शिकणारी विद्यार्थिनी सूजाता अंगारखे बीबीसी मराठीशी बोलताना म्हणाली, "एकतर विज्ञान शाखेचे शिक्षण ऑनलाईन माध्यमातून शक्य नाही हे आमच्या लक्षात आलं आहे. फिजिक्स, केमिस्ट्री, बायोलॉजी यांचं प्रात्यक्षिक प्रयोग शाळेत शिकवलं तरच आम्हाला कळेल.
आता परीक्षा घेतली आणि आम्हाला प्रयोगशाळेत प्रात्यक्षिक द्यायला सांगितलं तर आमच्या निकालावर त्याचा मोठा परिणाम होईल. त्यामुळे जरी परीक्षा घेतली तरी आमच्यासोबत अन्याय होईल असं मला वाटतं. तसंही आता जून महिना सुरू झालाय. एवढ्या सगळ्या परीक्षा,निकाल आणि प्रवेश प्रक्रिया पूर्ण करण्यातच अर्धे वर्ष निघून जाईल असं वाटतं. आम्ही किती महिने तणावात रहायचं?"
कोणत्याही प्रवेश परीक्षांची तयारी न करणाऱ्या विद्यार्थ्यांनाही पदवीच्या प्रवेशाचं दडपण आहे. आम्ही गेल्या 14 महिन्यांपासून बारावीतच आहोत, असं कला शाखेत शिकणारी अफशा शेख सांगते.
बीबीसी मराठीशी बोलताना अफशाने सांगितलं, "परीक्षा होणार की नाही हे सांगत नाहीत. त्यामुळे तणाव वाढत आहे. आम्ही अभ्यास करत आहोत. पण निर्णयाची किती प्रतीक्षा करणार? आमची मागणी आहे की परीक्षा रद्द करावी किंवा ऑनलाईन परीक्षा घ्यावी.
आमचं शिक्षण ऑनलाईन माध्यमातून झालं मग परीक्षा लेखी कशी देणार? लेखी परीक्षा देण्यासाठी त्यादृष्टीने वर्षभर अभ्यासच झालेला नाही. त्यामुळे आत्मविश्वास कमी आहे. लेखी परीक्षेचा सराव नाही. शिक्षणाच्या गुणवत्तेवरही परिणाम झालाय. 14 महिन्यांपासून आम्ही बारावीतच आहोत."
मुंबईतील नामांकित महाविद्यालयात प्रवेश घेण्यासाठी प्रचंड स्पर्धा असते. कला शाखेसाठी काही मोजक्या महाविद्यालयांना विद्यार्थ्यांची पसंती असते, असंही अफशा सांगते.
"मला बीएसाठी महाविद्यालयात प्रवेश घ्यायचा आहे. आता लेखी परीक्षा घेतली तर निकालावर परिणाम होईल. प्रत्येक विद्यार्थी वेगवेगळ्या परिस्थितीत अभ्यास करत आहे. तेव्हा प्रचलित पद्धतीनुसार आता परीक्षा घेतली तर आमच्यावर अन्याय केल्यासारखे होईल."