दारू पिण्यासाठी अल्पवयीनांकडून ज्येष्ठ नागरिकाची हत्या, का वाढतोय गुन्ह्यांमध्ये मुलांचा सहभाग?

गुरूवार, 20 जून 2024 (09:21 IST)
पुण्यातील औंध परिसरातील रहिवासी असणारे समीर रॉयचौधरी 13 जून 2024 रोजी नेहमीप्रमाणेच फिरायला बाहेर पडले. त्यांचे मित्र त्यांना भेटणार होते त्यापासून काही अंतरावर असतानाच त्यांच्यावर काही मुलांनी हल्ला केला.
 
पुणे पोलिसांनी जी माहिती दिली त्यानुसार, दारू पिण्यासाठी या मुलांना पैसे हवे होते. ज्येष्ठ नागरिक असलेल्या चौधरींकडे त्यांनी पैशांची मागणी केली आणि त्यांनी पैसे द्यायला नकार दिल्यानंतर त्यांच्या डोक्यात रॉडने वार केले.
 
स्थानिक वर्तमानपत्र विक्रेत्याने त्यांना दवाखान्यात दाखल केले. त्यांच्यावर उपचार सुरू झाले पण हल्ला इतका गंभीर होता की 14 जूनला त्यांचा मृत्यू झाला.
 
या मुलांनी समीर रॉयचौधरींवर हल्ला केला त्याचप्रमाणे त्यांनी आणखी दोन जणांवरही असाच हल्ला केला होता. यात एक सायकल स्वार आणि एका सिक्युरिटी गार्डचा समावेश होता.
 
त्यांनी प्रतिकार केला आणि ते पळून गेले त्यामुळे यातून त्यांचा जीव वाचल्याचे नंतर कळले.
 
या प्रकरणात आता पोलिसांनी 4 जणांना अटक केली आहे ज्यातले 3 जण हे अल्पवयीन असल्याचं निष्पन्न झालं आहे.
 
शिक्षण अर्धवट सोडल्यानंतर ही मुलं असे प्रकार करायला लागल्याचं पोलीस सांगतात.
 
महत्त्वाची बाब म्हणजे यातल्या दोन अल्पवयीन मुलांवर यापूर्वीच गंभीर गुन्हा दाखल आहे.
 
पुण्यातील अल्पवयीन मुलांचा असा गंभीर गुन्ह्यात सहभाग असण्याची ही अर्थातच पहिली घटना नाही. 12 जूनला साडेसतरा नळी परिसरात चार जणांनी मिळून एका व्यक्तीचा खून करण्याचा प्रयत्न केला. यातल्या चार आरोपींपैकी तीन जण अल्पवयीन आहेत.
 
11 जानेवारीला 9 अल्पवयीन मुलांनी रामवाडी परिसरात गाड्यांची तोडफोड केली. 200 मीटर परिसरात लावलेल्या तब्बल 22 गाड्या या मुलांनी दगडांनी फोडल्या. यात हातगाड्या, रिक्षांसह 15 दुचाकी वाहनांचं त्यांनी नुकसान केलं. या परिसरात असणारा सीसीटिव्ही देखील त्यांनी फोडला होता.
 
नुकत्याच गाजलेल्या पोर्शे अपघातातील मुलगाही अल्पवयीन होता. या अपघातात 2 जणांचा मृत्यू झाला आहे. तसंच 17 जूनला आळंदी जवळच्या वडगाव घेनंदमध्ये एका अल्पवयीन मुलाने पूर्ववैमनस्यातून एका महिलेला अंगावर चारचाकी घालून मारण्याचा प्रयत्न केल्याचा आरोप आहे.
 
याशिवाय पुण्यात कोयत्याने हल्ला करण्याचे जे अनेक प्रकार गेल्या वर्षी झाले त्यातही बहुतांश अल्पवयीन मुलांचाच समावेश होता.
 
आकडेवारी काय सांगते?
पोलिसांच्या आकडेवारीनुसार अल्पवयीन मुलांचं गंभीर आणि अतिगंभीर गुन्ह्यांमध्ये सहभागी असण्याचं प्रमाण वाढत आहे.
 
पोलिसांच्या आकडेवारीनुसार 2021 मध्ये पुणे पोलिसांकडे अल्पवयीन मुलांच्या गुन्ह्यांमध्ये सहभाग असणाऱ्या एकूण 363 गुन्ह्यांची नोंद झाली. यामधल्या विधिसंघर्षित (Juvenile in conflict with law) बालकांची संख्या आहे 519.
 
यापैकी किरकोळ गुन्ह्यांमध्ये सहभाग असणारी मुले आहेत 179, तर गंभीर गुन्ह्यांमध्ये ज्यात 3 ते 7 वर्षांपर्यंत शिक्षा होऊ शकते अशा मुलांची संख्या आहे 259.
 
तर 2021 मध्ये तब्बल 91 मुलांवर अतिगंभीर म्हणजे ज्या गुन्ह्यांमध्ये 7 वर्षांहून अधिक शिक्षा होऊ शकते असे गुन्हे दाखल आहेत.
 
2022 मध्ये एकूण गुन्ह्यांची संख्या वाढली आहे. या वर्षात अल्पवयीन आरोपींचा सहभाग असलेले एकूण 342 गुन्हे नोंद झाले आहेत.
 
तर यातल्या विधिसंघर्षित बालकांची संख्या आहे 544. यापैकी किरकोळ गुन्ह्यांमध्ये सहभाग असणारे 235 तर गंभीर गुन्ह्यांमध्ये सहभागी असणारे 254 आणि अतिगंभीर गुन्ह्यांमध्ये सहभाग असणारी 33 मुलं आहेत.
 
2023 मध्ये हे प्रमाण काहीसं कमी झालेलं दिसतं. 2023 मध्ये एकूण गुन्ह्यांची संख्या 288 असून त्यामध्ये 449 अल्पवयीन मुलांवर गुन्हे दाखल आहेत.
 
यापैकी 198 जणांवर किरकोळ गुन्हे दाखल आहेत, तर 204 अल्पवयीन मुलांवर गंभीर गुन्हे दाखल आहेत. 2023 मध्ये अतिगंभीर गुन्हे नोंद असलेल्या मुलांचे प्रमाण मात्र वाढलेले दिसते. यात 47 जणांवर अतिगंभीर गुन्हे नोंद आहेत.
 
यावर्षी मे महिन्यापर्यंतच्या आकडेवारीनुसार आत्तापर्यंतच अल्पवयीन मुलांचा सहभाग असलेले एकूण 95 गुन्हे नोंद आहेत ज्यात सहभागी असलेल्या अल्पवयीन मुलांची संख्या आहे 169. यापैकी 82 मुलं किरकोळ तर 73 मुलं गंभीर गुन्ह्यांमध्ये सहभागी आहेत. मे 2024 पर्यंत अतिगंभीर गुन्ह्यांमध्ये सहभागी असलेल्या मुलांची संख्या आहे 14.
 
यातली बहुतांश मुलं ही शिक्षण सोडलेली आणि सामाजिकदृष्ट्या अल्पउत्पन्न गटातील असल्याचं निरीक्षण पोलीस नोंदवतात. महत्त्वाची बाब म्हणजे यापैकी अनेक जण हे गेल्या काही काळापासून थेट गुन्हेगारी टोळ्यांमध्येही सहभागी असल्याचं तपासात निष्पन्न झालं आहे.
 
यातल्या अनेक मुलांकडून समाजमाध्यमांचा वापर किंवा केलेल्या गुन्ह्याचे व्हीडिओ समाजमाध्यमांवर टाकून दहशत पसरवण्याचा प्रकार होत असल्याचं देखील दिसलं आहे.
 
अल्पवयीन मुलांचा गुन्ह्यातला वाढता सहभाग लक्षात घेता पोलिसांनी अल्पवयीन आरोपींच्या पालकांवर देखील कारवाई करणार असल्याचं घोषित केलं होतं.
 
गुन्हेगारी जगताची ओढ कशामुळे ?
अल्पवयीन असल्याने कायद्याच्या कचाट्यात जास्त काळ अडकण्याची शक्यता कमी होत असल्याने गुन्हेगारी टोळ्यांकडूनही त्यांचा वापर केला जात असल्याचं निरीक्षण तज्ज्ञ नोंदवतात.
 
या विषयी बीबीसी मराठीशी बोलताना बालहक्क संरक्षण कार्यकर्त्या डॉ. यामिनी आडबे म्हणाल्या, "आमच्याकडे येणाऱ्या किंवा गुन्ह्यांमध्ये सहभाग असणाऱ्या बहुतांश मुलांचा वयोगट हा 16 ते 18 वर्षांचा आहे. वैद्यकीयदृष्ट्या 14 वर्षांच्या वरच्या मुलांना सज्ञान म्हणूनच किंवा त्यांच्या शरीराची वाढ झालेली आहे अशा दृष्टीनेच त्यांच्यावर उपचार केले जातात. बालरोगतज्ज्ञ त्यांच्यावर उपचार करत नाहीत. ही मुले शारीरिकदृष्ट्या आणि मानसिकदृष्ट्या ताकदवान झालेली असतात.”
 
आडबे पुढे सांगतात, "यातले अनेक जण हे अनेकदा पुन्हा पुन्हा देखील त्याच प्रकारचे गुन्हे करताना आढळले आहेत. अशी मुलं गंभीर गुन्ह्यामध्ये सहभागी असतात. बहुतांश वेळा या मुलांमध्ये भिती, धाक असं काहीच दिसत नाही. कायद्याचा धाक नसल्याने साहजिक गुन्ह्यांमधला सहभाग दिसतो."
 
आडबे यांनी सांगितलं की, "मी पूर्वी माहिती अधिकार कायद्याखाली माहिती मागवली होती तेव्हा हे निदर्शनास आलं होतं की बालसुधारगृहातून अनेक मुलं पळून जातात. मात्र ती अल्पवयीन असल्याने त्यांची माहिती, फोटो प्रसिद्ध करता येत नाही. अल्पवयीन आरोपी म्हणून त्यांच्यावर खटले चालवले जातात. आणि त्यातल्याच कायदेशीर पळवाटा शोधून ही मुलं गुन्ह्यात सहभागी होतात. तसंच गँग्सबरोबर देखील कनेक्टेड आहेत. अल्पवयीन मुलांवर खटले चालवताना त्यांना सुधारण्याची संधी हा आपल्या कायद्यातील प्राथमिक भाग आहे. याचा पुनर्विचार होणं आवश्यक आहे.”
 
अल्पवयीनांचा वाढता सहभाग लक्षात घेता पुणे पोलिसांनी देखील आता यासाठी पावलं टाकायला सुरुवात केली आहे.
 
पुणे पोलीस दलातील एका वरिष्ठ अधिकाऱ्यांनी बीबीसी मराठीशी बोलताना सांगितलं, "यातली बहुतांश मुलं ही कुटुंबापासून तुटलेली असतात असं दिसतं आहे. त्यामुळे आम्ही आता त्यांचं समुपदेशन करण्याचा आणि त्यातून त्यांना सुधारण्याचा प्रयत्न करत आहोत.
 
काहीवेळा पालकांचे देखील समुपदेशन केले जात आहे. तसेच समाज माध्यमांवर लक्ष ठेवून अशा मुलांना ट्रॅक देखील केले जात आहे. यातील जी मुले 18 वर्षांची होती त्यांना मुख्य प्रवाहात आणण्यासाठी नोकरी देखील लावून देत आहोत. यासाठी सामाजिक संस्थांची मदत घेतली जात आहे.”
 
अॅडव्होकेट रमा सरोदे यांच्या मते मात्र पोलिसांकडून पुरेसे प्रयत्न होताना दिसत नाहीत. त्यांच्या मते सामाजिक आणि आर्थिक परिस्थीती सोबतच सध्या मिळणारं समाज माध्यमांचं एक्सपोजर यामुळे देखील अल्पवयीन मुलांचं गुन्हेगारी विश्वाचं आकर्षण वाढत आहे.
 
बीबीसी मराठीशी बोलताना सरोदे यांनी म्हटलं की, "अल्पवयीन मुलांचा वापर हा सज्ञान गुन्हेगारांकडून केला जातो आहे हे खरं आहे. कारण अल्पवयीन मुलांना जास्तीत जास्त 3 वर्षांचे डिटेन्शन आहे. ही मुलं त्यांच्या सामाजिक आर्थिक पार्श्वभूमीमुळे गुन्ह्यांकडे ओढली जातात. पण यावर समाजमाध्यमांचाही प्रभाव दिसतो. लहान मुलांच्या शोषणाच्या केसेसमध्ये सुद्धा अल्पवयीन मुलांचा सहभाग दिसतो आहे."
 
"हे थांबवण्यासाठी आणि अल्पवयीन गुन्हेगारांना कसे वागवायचे यासाठी प्रत्येक पोलीस स्टेशन मध्ये खरं तर बालगुन्हेगारी युनिट असणं अपेक्षित आहे. पण मुळातच पोलिसांकडे पुरेशी यंत्रणा नाही. त्यामुळे हे झालेले नाही. एकच पोलीस विविध प्रकारचे गुन्हे हाताळताना दिसतात. त्यामुळे अल्पवयीन आरोपींना देखील गुन्हेगारासारखंच वागवलं जातं. जेव्हा ही मुलं बाल न्याय मंडळात जातात तेव्हा त्यांना सामाजिक संस्थांकडून समुपदेशन केलं जातं. पोलिसांमध्ये रिफॅार्म व्हावे ही मागणी खूप जुनी आहे. पण ते होताना दिसत नाहीत," असं सरोदे सांगतात.
 
Published By- Dhanashri Naik 

वेबदुनिया वर वाचा

संबंधित माहिती