क्रेडिट कार्डाच्या मदतीनं कोट्यवधी लुटणाऱ्या ठगाची कबुली; कसे लुटले आणि उधळले पैसे

रविवार, 16 जून 2024 (10:43 IST)
लोकांना ठगण्याच्या आरोपात अनेक वर्ष तुरुंगात राहिलेला इलियट आता, स्वतःच ठगांना आळा घालण्याचं काम करत आहे.इलियट कास्त्रो अवघ्या 16 वर्षांचा होता तेव्हा त्यानं पहिल्यांदा कुणाला तरी फसवलं होतं.
ग्लासगो कॉल सेंटरमध्ये मोबाइल विक्री करताना त्यानं गैरमार्गानं एका व्यक्तीच्या बँक खात्याची माहिती मिळवली होती.
 
लवकरच इलियट चैनीचं जीवन जगू लागला. विमानात फर्स्ट क्लासनं प्रवास, लक्झरी घड्याळं यांचा समावेश होता.
 
पाहता पाहता या तरुणानं अनेक मोठे घोटाळे केले. त्यात 25 दशलक्ष पौंडांच्या (जवळपास 25 कोटी रुपये) चोरीचाही समावेश होता. अखेर या तरुण ठगाला एडिनबरामधील एका डिपार्टमेंटल स्टोअरच्या टॉयलेटमध्ये पकडण्यात आलं.
पण आता कास्त्रो घोटाळे किंवा फसवणूक रोखणारा तज्ज्ञ म्हणून काम करतो. बीबीसीच्या "कन्फेशन्स ऑफ द टीनेजर फ्रॉडस्टर" या माहितीपटात त्याची कहाणी समोर आली.
 
शाळा सोडल्यानंतर इलियट कसा वेगानं गुन्हेगारी विश्वाच्या पायऱ्या चढत गेला, हे या माहितीपटात दाखवलं आहे. एक वेळ अशीही होती की, मित्रांना शॅम्पेन पाजण्यासाठी तो 80 हजार रुपयांची बाटली विकत घ्यायचा.
 
अशी केली पहिली फसवणूक
कास्त्रो आता 42 वर्षांचा झाला आहे. एका ग्राहकाला ऑर्डर दिल्यानंतर पहिल्यांदा त्यानं त्याची कशी फसवणूक केली होती, हे त्याला आजही आठवतं.
 
ऑर्डर देताना कास्त्रोनं क्रेडिट कार्डमध्ये अडचण आली आहे, असा बहाणा केला आणि त्यांच्या बँकेमध्ये बोलत असल्याचं फोनवर भासवलं.
 
काही सेकंदात कास्त्रोनं ग्राहकाच्या कार्डची माहिती मिळवली आणि इथूनच त्याच्या फसवणुकीच्या गुन्ह्यांची सुरूवात झाली.
 
कास्त्रो सांगतो की, मला ते क्षण व्यवस्थित आठवत नाहीत. मात्र हे असंच होतं की, जे मी पहिल्यांदा केलं होतं आणि त्याबद्दल विचार केला तर असं वाटतं की मी असं करू शकतो का?
 
सुरुवातीला कास्त्रोचा खर्च किरकोळ होता. मात्र गुन्ह्यांप्रमाणेच त्याचा खर्चही वेगाने वाढू लागला.
बीबीसी रेडिओ स्कॉटलंडच्या एका कार्यक्रमात त्याने सांगितलं की, सुरुवातीच्या पाच वर्षात म्हणजे वयाच्या 16 वर्षापासून ते 21-22 वर्षांपर्यतचा काळ तो वेड्यासारखं वागला.
 
सर्वात पहिलं कार्ड कसं घेतलं, केस कापले आणि टी-शर्ट विकत घेतल्याचं त्याला आठवतं.
 
कास्त्रो म्हणतो, "त्या वेळी मला माहिती नव्हतं की पुढे, हे माझ्यासाठी एवढं अडचणीचं ठरणार आहे."
 
फसवणूक करण्यात हातखंडा असलेल्या कास्त्रोचा जन्म 1982 मध्ये एबरडीनमध्ये झाला होता. 1998 मध्ये कुटुंबासोबत ग्लासगो जाण्याआधी इलियटनं आठ वेगवेगळ्या शाळांमध्ये शिक्षण घेतलं.
 
त्यानं सांगितलं की, त्याला स्वप्नं पाहायला आवडतात आणि जेव्हा पहिल्यांदा त्याने कॉल सेंटर मध्ये नोकरीसाठी अर्ज केला होता, तेव्हादेखील तो खोटं बोलल्याचं त्यानं मान्य केलं. कास्त्रोनं तेव्हा स्वत:चं वय 16 वर्षांऐवजी 18 वर्षे सांगितलं होतं.
 
मूळचा तो अर्धा चिलीयन वंशाचा आहे. "मला वाटायचं की माझं आयुष्य अद्भूत असेल," असं तो म्हणतो.
 
पकडलं जाण्याआधी महागडे पंचतारांकित हॉटेल, बड्या पार्ट्या आणि आलिशान गाड्या कास्त्रोच्या आयुष्याचा भाग होत्या.
 
महागडे हॉटेल, घड्याळं आणि गाड्या
1999 मध्ये लंडनच्या एक दिवसाच्या प्रवासादरम्यान कास्त्रोनं 300 पौंड किंमतीचा गुचीचा (GUCCI) एक बेल्ट विकत घेतला होता. आजच्या काळात त्याची भारतीय रुपयांतील किंमत जवळपास 30,000 रुपये होईल. कास्त्रो 1999 मधील हा प्रकार सांगत होता.
 
कास्त्रोनं सांगितलं की, ते 300 पौंड कॉल सेंटरमधील त्याच्या एक आठवड्याच्या कमाईपेक्षा जास्त होते.
 
इतकंच नाही तर न्यूयॉर्कला जाण्यासाठी विमानाच्या प्रथम श्रेणीच्या तिकिटावर 8 हजार पौंडापेक्षा (जवळपास 8 लाख रुपये) अधिक रक्कम त्यानं खर्च केली होती.
 
कास्त्रो न्यूयॉर्कला पोहोचला तेव्हा राहण्यासाठी त्यानं न्यूयॉर्कमधील त्यावेळेचं सर्वात प्रसिद्ध हॉटेल प्लाझा निवडलं. एका चित्रपटात हे हॉटेल दाखवलं गेलं होतं. तीन दिवसांच्या या ट्रीपमध्ये कास्त्रोनं 11 लाख रुपयांपेक्षा अधिक रक्कम खर्च केली.
 
"त्या वेळी माझा दिनक्रम सकाळी उठायचं, शॉपिंगसाठी जायचं, वस्तू विकत घ्यायच्या, दारू प्यायची आणि हॉटेलमध्ये परत येऊन झोपी जायचं, असा होता. परत दुसऱ्या दिवशी तेच,"असं कास्त्रो म्हणाला.
 
"मात्र, या काळात मला या गोष्टीची खबरदारी घ्यावी लागायची की, कोणी माझा पाठलाग तर करत नाही किंवा माझ्यावर पाळत तर ठेवली जात नाही."
2001 मध्ये कास्त्रो जर्मनी, फ्रान्स आणि स्पेन मध्ये गेला होता. पुढच्याच वर्षी तो फिरण्यासाठी आयर्लंडला गेला. तिथं त्यानं क्लेरेंस हॉटेल मध्ये मुक्काम ठोकला होता.
 
कास्त्रोनं सांगितलं की, "हे हॉटेल बोनो आणि एज यांचं आहे आणि एका रात्री आमचं बोलणं झालं होतं. त्यामध्ये मी त्यांना सांगितलं होतं की मी संरक्षण मंत्रालय आणि हॉटेल व्यवसायाशी संबंधित व्यक्तीसाठी काम करतो आहे."
 
इलियटची अनेकदा कायद्याशी गाठ पडली. याची सुरुवात 2001 मध्ये झाली होती. तेव्हा इलियटनं लेनकास्टर मध्ये तरुण गुन्हेगारांसाठीच्या एका संस्थेत चार महिने घालवले होते.
 
अनेक महिन्यांनी त्याला एडिनबराच्या बालमोरल हॉटेलमध्ये अटक करण्यात आली होती. यानंतर त्याला मॅंचेस्टरला नेण्यात आलं. तिथं त्याला 18 महिन्यांच्या तुरुंगवासाची शिक्षा सुनावण्यात आली.
 
या दरम्यान त्याला तुरुगांतील वाचनालयात नोकरी मिळाली आणि रिकाम्या वेळेत त्यानं इंटरनेटविषयी अभ्यास केला.
 
या अभ्यासातून त्याच्यात विश्वास निर्माण झाला की, तुरुंगातून बाहेर पडल्यानंतर तो इंटरनेटच्या मदतीनं पुन्हा फसवणूक करू शकतो. चोरण्यात आलेल्या क्रेडिट कार्डच्या मदतीनं अधिकृतपणे नाव न नोंदवता विमान प्रवासाचं बुकिंग करू शकतो.
 
2002 मध्ये कास्त्रोला कॅनाडाच्या टोरंटो शहरातून अटक करण्यात आली आणि 87 दिवस तुरुंगात ठेवण्यात आलं. त्यानंतर 2003 मध्ये त्याला हद्दपार करण्यात आलं होतं.
 
कसा पकडला गेला?
पुढील वर्षी एडिनबरा मधील हार्वे निकोल्स डिपार्टमेंट स्टोअरमध्ये त्याच्या आंतरराष्ट्रीय गुन्ह्यांना पूर्णविराम मिळाला.
 
कास्त्रो म्हणतो, "मला वाटू लागलं होतं की आता मला या कामाचा उबग आला आहे. माझ्या आयुष्यात पहिल्यांदा मी मित्र जोडण्यास सुरुवात केली."
 
"मात्र असं करण्यात एक अडचण अशी होती की मी कोण आहे हे मी माझ्या मित्रांना सांगू शकत नव्हतो. ही माझ्यासाठी अडचणीची स्थिती होती."
 
तो सांगतो, "मला आश्चर्य वाटतं. माझ्या मनात अशी काही भावना होती का ज्यामुळे मी ते काम सोडू इच्छित होतो."
 
त्या दिवशी त्याने दोन हजार पौंडाचे व्हाउचर एका कार्डवरून विकत घेतले. ते कार्ड त्याच्या नावावर नव्हतं.
 
ज्या कंपनीनं या खरेदीला मंजूरी दिली होती त्या कार्ड कंपनीला रिसेप्शनिस्टनं फोन केला. मात्र कास्त्रो गेल्यानंतर रिसेप्शनिस्टनं पुन्हा एकदा त्या कार्ड कंपनीला फोन केला.
 
कास्त्रो म्हणतो, "ज्या व्यक्तीचं ते कार्ड होतं, त्यांनी त्या व्यक्तीला संपर्क केला. त्या व्यक्तीनं सांगितलं होतं की त्याची फसवणूक करण्यात आली आहे."
 
मात्र, कास्त्रो एक तासाच्या आतच जेव्हा त्याच स्टोअरमध्ये पुन्हा आला तेव्हा या प्रकरणाला वेगळं वळण लागलं.
 
तो म्हणतो, "मी चटकन टॉयलेटमध्ये गेलो आणि जेव्हा मी दरवाजा उघडला तेव्हा साध्या कपड्यांमध्ये एक पोलिस अधिकारी उभा होता. इथूनच शेवटाची सुरुवात झाली."
 
पुढील वर्षी मिडलसेक्सच्या आइलवर्थ क्राउन कोर्ट मध्ये कास्त्रोनं हे मान्य केलं की त्याने 73 हजार पौंडापेक्षा (जवळपास 73 लाख रुपये) अधिक पैशांची फसवणूक केली होती. यानंतर त्याला दोन वर्षांची शिक्षा ठोठावण्यात आली.
 
आता करतो तपास यंत्रणांची मदत
कास्त्रोनं हे मान्य केलं की कायदा लागू करणाऱ्या यंत्रणा आणि कार्ड कंपन्यांमध्ये ताळमेळाच्या अभावामुळे त्याचा फायदा झाला.
 
तो म्हणाला की, जर तपास यंत्रणा आणि कार्ड कंपन्यांनी एकत्र येऊन चांगलं काम केलं असतं तर या पाच वर्षांच्या काळात ते लवकरच मला पकडू शकले असते.
 
आज कास्त्रो एक वेगळी व्यक्ती आहे. फसवणूक केल्याबद्दल कास्त्रोला पश्चाताप झाला आहे आणि आता तो चोरीला किंवा फसवणुकीला प्रोत्साहन देत नाही, उलट त्यावर आळा घालण्यासाठी काम करतो.
 
तो क्रेडिट कार्डशी निगडीत फसवणुकीच्या प्रकरणांमध्ये तपास यंत्रणांना मदत करतो.
 
कास्त्रोनं सांगितलं, "जेव्हा मी हे काम करण्यास सुरूवात केली होती तेव्हा मी कधीही लोकांबद्दल विचार केला नव्हता. मी त्या लोकांना कधीच भेटलो नव्हतो, मात्र याचा अर्थ असा नाही की हे काम योग्य आहे."
 
तो म्हणतो, "मला वाटतं की त्या काळी ज्या प्रकारे क्रेडिट कार्ड काम करायचे त्यामुळे फसवणूक झाल्यानंतर देखील कार्डच्या खऱ्या मालकाचं नुकसान व्हायचं नाही."
कास्त्रो म्हणतो की, देवाणघेवाणीच्या वेळेस जर कार्डधारकानं मंजुरी दिली नसेल तर त्याचं नुकसान व्हायचं नाही आणि माझ्या प्रकरणात असंच व्हायचं.
 
20 वर्षांपेक्षाही अधिक काळानंतर कास्त्रोला असं वाटतं की तरुणपणी केलेल्या कृत्यांबद्दल तो आजदेखील पश्चाताप करतो आहे.
 
तो म्हणाला, "मी सबबी सांगत नाही, मात्र ही खूप जुनी गोष्ट आहे आणि मला वाटतं की तेव्हापासून आजपर्यत मी नुकसान कमी करण्यासाठी काम केलं."
 
कास्त्रो म्हणतो, "माझं नशीब चांगलं आहे की मी वित्तीय कंपन्या, पर्यटन कंपन्या आणि इतर कंपन्याबरोबर काम करतो आहे."
"मी नशीबवान आहे की, आज व्यवसायात मला एक विश्वासू सल्लागार म्हणून ओळखलं जातं.
ही खूप चांगली गोष्ट आहे."
"हा एक रंजक प्रवास ठरला," असं कास्त्रो म्हणतो.

Published By- Priya Dixit 
 
 
 
 
 
 

वेबदुनिया वर वाचा

संबंधित माहिती