औंध : तमाम कुस्तीशौकिनांचे लक्ष लागून राहिलेल्या छत्रपती शिवराय केसरी कुस्ती स्पर्धेत माती गटातील अंतिम फेरीत सोलापूरच्या महेंद्र गायकवाड पुढे महान भारत केसरी सिकंदर शेख ची डाळ शिजली नाही. प्रतिष्ठेची ही लढत जिंकून महेंद्र गायकवाड बाहुबली ठरला. त्याच्या विजयानंतर कुस्तीशौकिनांनी मोठा जल्लोष केला.
अहमदनगर येथील वाडिया पार्क येथे छबु लांडगे क्रीडा नगरीत सुरू असलेल्या छत्रपती शिवराय केसरी कुस्ती स्पर्धेत महेंद्र गायकवाड विरुद्ध सिकंदर शेख अशी रंगली. पुणे येथे महाराष्ट्र केसरी कुस्ती स्पर्धेत या कुस्तीला वादाची किनार असल्यामुळे तमाम कुस्ती शौकिनांचे डोळे आजच्या लढतीकडे लागले होते. सायंकाळी सहा वाजून 15 मिनिटांनी या लढतीला सुरुवात झाली सुरुवातीला दोन्हीही मल्ल सावध पवित्र्यात लढत होते. नकारात्मक कुस्ती करत असल्याबद्दल पंचांनी महेंद्र समज देऊन गुण घेण्यासाठी निर्धारित वेळ दिला मात्र निर्धारित वेळेत त्याला गुण न घेता आल्याने पंचांनी सिकंदरला एक गुण बहाल दिला.
पहिली फेरी एक विरुद्ध 0 गुणांनी जिंकून सिंकदरने महेंद्र वर दबाव वाढला होता. गुणाची पाटी कोरी असल्याने दुसऱ्या फेरीत मात्र महेंद्र आक्रमक झाला. याच संधीचा फायदा घेऊन सिकंदरने एकेरी पट काढीत दोन गुणांची कमाई करत गुणांची बढत वाढवली. मात्र हप्ते डाव आणि साईड साल्तो सारख्या अस्त्रांचा वापर करत महेंद्रने सलग दोनदा दोन दोन गुणांची कमाई करीत एक गुणाची आघाडी घेतली. शेवटच्या 27 सेकंदात ही निर्णायक आघाडी तोडण्यात सिकंदर अपयशी ठरल्याने महेंद्रने ही प्रतिष्ठेची लढत 4 विरुद्ध 3 गुणांनी खिशात टाकून या स्पर्धेतील अंतिम फेरी गाठली.