#शेण खाणं... काडी टाकून...

मंगळवार, 19 जानेवारी 2021 (10:17 IST)
-आसावरी केळकर-वाईकर

‘बाबाचा राग सातवें आसमान पर आहे आज... शेण खाल्लंय वाटतं कुणीतरी... चांगलंच शेण खाल्लंय...’ जेवायला बसायची तयारी करताकरता मी वाक्य टाकलं. जवळपास दीडेक तासापासून नवऱ्याच्या ऑफिस कॉलमधल्या मधेमधे तडतडणाऱ्या लाह्यांमुळं मी हा निष्कर्ष काढला होता आणि हा चिडलाय म्हणजे नक्की काहीतरी तितकं गंभीर असणारच ह्याची मला खात्री वाटत होती. एरवी अत्यंत साखराळालेल्या आवाज आणि शब्दांमधे ‘तू अत्यंत गाढव आहेस’ असं हाताखालच्यांना अप्रत्यक्षरीत्या सांगून वर पुन्हा त्यांच्याकडूनच कामही करून घेण्याचं नवऱ्याचं कसब ह्या लॉकडाऊनमुळं मला चांगलंच अनुभवास येत होतं. खरंतर त्याच्या ह्या गुणवत्तेचं कौतुक वाटण्यापेक्षा समोरच्याकडं स्वत:चा अपमान कळण्याचं चातुर्य कसं नाही ह्या मुद्दा मला जास्त विचारात टाकायचा. न राहवून मी नवऱ्याला हा प्रश्न विचारलाही होता त्यावर मीही काहीतरी गाढवपणाच केल्याचा लुक मला देत तो हसून म्हणाला होता, ‘तेवढं चातुर्य असतं तर गाढवपणानं काम करण्याचा प्रश्नच उद्भवला नसता ना!’ त्याला म्हटलं ‘अरे, एवढी नावाजलेली कंपनी तुमची... सगळे स्कॉलर्सच असतात ना तिथं?... मग हा गाढवपणा शिरतोच कुठून?’ 
 
त्यावर तो सहसा नसतो त्या उसळत्या आवेशात म्हणाला होता, ‘बुद्धीमांद्य नाहीये गं हे... वृत्ती आहे ही! कुणीकडून तरी काहीतरी करून एकदा बॉसच्या तोंडावर काम फेकायचं ही नाठाळ वृत्ती असणारे जे महाभाग असतात ना त्यांच्याबाबतीत येतो हा प्रॉब्लेम! खरंतर तल्लख बुद्धी असते त्यांना, पण ती वापरायचीच नाही म्हटल्यावर काय होणार? मी बोललेलंही कळत नसेल असं नाही.. पण कशाचंच फार काही वाटून घ्यायचं नाही असा त्यांच्या भाषेत कूलपणा अंगी बाणलेला असतो त्यांनी!’ 
 
‘पण त्यांच्या त्या कूलपणावर निखारे ठेवत त्याला हवं तसं मोल्ड करायचं कसब असलेला तुझ्यासारखा आदरणीय बॉस त्यांना मिळाल्यानं त्यांच्यासाठी सगळा फ्लॉप शोच की!’ असं मी तोंडातल्या तोंडात पुटपुटलेलं नशीबानं त्याला ऐकू गेलं नाही. ‘काय म्हणालीस?’ असं त्यानं विचारल्यावर ‘कठीण आहे रे! सचोटीनं काम करायची संकल्पना पूर्णच धुळीस मिळतीये कि काय असंच वाटतंय रे’ असं म्हणत मी विषय वळवला होता. आज मात्र फारच ‘कूल’ कुणीतरी नवऱ्याच्या वाट्याला आलं होतं हे निश्चीत! थोड्या काळासाठी कॉलवर जॉईन झालेला नवऱ्याचा बॉस आणि नवरा दोघं संगनमतानंच घेतल्यासारखा, अगदी एकतानतेनं त्या कुण्या गाढवाचा समाचार घेत असल्याचंही मी थोड्या वेळापूर्वी ऐकलं होतं. 
 
आता हा वेळेत पानावर बसून गरम जेवेल कि सगळं गारढोण होऊन जाईल? ह्या विचारानं कावून मी माझं वाक्य टाकलं होतं. त्यावर कन्यका जोरात हसल्यावर चिरंजिवांनी ‘मा, काय म्हणालीस? मला सांग ना...’ असा घोशा लावल्यावर शेवटी एकदाचं म्हटलं, ‘शेण खाल्लंय रे आज कुणीतरी... म्हणून बाबा वैतागलेले दिसताहेत!’ तोवर कसं काय कोण जाणे, अचानकच कॉल संपून नवरा डायनिंग टेबलाशी आला आणि सुकन्या त्याच्या कानाशी लागून काहीतरी कुजबुजली. त्यावर नवरा उसळून म्हणाला, ‘गेले चार दिवस तरी मी दुपारचं काहीही खाल्लेलं नाही... भडंग कुणी खाल्लं, संपवलं मला काहीही माहीत नाही.. तुम्हीच खाता ते खाता आणि संपलं तर पिशव्या टाकून द्यायची, डबा धुवायला टाकायचीही तसदी घेत नाही... आणि नाव तेवढं माझं!’ मला काहीच टोटल न लागून मी त्याच्याकडं पाहात नेमकं काय घडतंय हे समजून घ्यायच्या प्रयत्नात होते तोवर कार्टी आता सरळ मोठ्या आवाजातच म्हणाली, ‘बाबा, भडंग नव्हे... काऊडंग हो... काऊडंग!’ 
 
तारसप्तकात पोहोचत नवरा ओरडला, ‘काऊडंग खायला गाढव आहे का मी?’
 
चिरंजीव तलवारीला धार लावण्यात मागं न राहाता म्हणाले, ‘बाबा... आय हॅव नेव्हर हर्ड ऑफ डॉन्की ईटिंग अ काऊडंग... गाढव कुठं खातं काऊडंग?’ 
’ओके... म्हणजे मी गाढव आहे हे गृहीत आहे...’ 
’बाबा... तुमच्याबद्दल नाही, तुमच्या स्टेटमेंटबद्दल सांगतोय मी...’ चिरंजीव मागं हटायला तयार नव्हते. 
’अक्कल नको तिथं पाजळण्यातच वाया घालवा तुम्ही लोक... बोला काहीही...’
 
ह्यावर ‘बाबा... तो काही नाही म्हणाला... आई म्हणाली कि तुम्ही काऊडंग खाल्लं!’ ह्या कार्टीच्या वाक्यानं अचानकपणे तलवारीचं पातं माझ्या गळ्याशी आलं आणि मी तोफेच्या तोंडी उभी असून कुठल्याही क्षणी आता बत्ती पेटून माझ्या ठिकऱ्या होऊ शकण्याची साक्षात अनुभूती घेत असल्यासारखं मला वाटलं. तरीही हिम्मत न हारता जमेल तेवढ्या धिटाईनं मी म्हटलं, ‘मी कधी म्हणाले असं?’ 
 
त्यावर कन्यका एकदमच न्यायाची बाजू घेतल्यासारखी छद्मी हास्य करत म्हणाली, ‘डोन्ट लाय मा... शेण खाल्लं म्हणालीस कि तू... मागं एकदा मे महिन्यात आजीनं आम्हाला गाय दाखवायला नेलं होतं. तेव्हां कळलं मला कि काऊडंगलाच शेण म्हणतात.’ 
 
आत्ता कुठं माझ्या मेंदूला उमज पडली आणि मग मात्र मी व्यवस्थित कमरेची तलवार उपसत जोरदार हल्ला केल्याच्या आवेशात म्हटलं, ‘माझे आई... समोरचा माणूस काय बोलतो ते आधी नीट ऐकून घ्यावं आणि मग बोलावं... तू पाजळलेलं अगाध ज्ञान बरोबर आहे... काऊडंग म्हणजेच गाईचं शेण हेही बरोबरच आहे... मीही `शेण खाल्लं’ असंच म्हटलं होतं... पण कुणीतरी शेण खाल्लं असं म्हटलं... बाबांनी खाल्लं, असं म्हटलं नव्हतं!’ 

‘सॉरी मा सॉरी... कन्फ्युजन झालं गं थोडं... ते तू म्हणतीस ना तसं इंग्लिश मेडियममुळं परफेक्टली कळलं नाही कि प्रॉब्लेम होतो गं...’
’एवढी अक्कल आहे ना... मग खात्री करून घ्यावी आधी... त्याशिवाय पिल्लू सोडू नये वाट्टेल ते...’ 
‘मा... मी ना परवा पालीची दोन पिल्लू बघितली आपल्या बेडजवळच्या खिडकीत’ इति चिरंजीव! 
‘अरे, एक असेल तर पिल्लू... अनेक असतील म्हणजे प्लुरल असेल तर पिल्लं म्हणायचं’ असं मी त्याला सुधरवतेय तोवर, ‘ईsssssssssss..... मी नाही झोपणार आता तिथं...’ असं कन्यका किंचाळली. 
 
‘आज काय सगळीजणं पिल्लं सोडत बसणार आहात कि जेवायलाही घालणार आहात?’ ह्या नवऱ्याच्या खोचक वाक्यावर क्षणार्धात माझीच विकेट जात संतापून मी म्हटलं, ‘एक्सक्यूज मी... सगळं तयार आहे... उलट आम्हाला थांबावं लागलं, तू तणतणत होतास कॉलवर म्हणून...’ 
 
‘हो... ते शेण खाल्ल्यामुळं तेच ना मा...’ ह्या लेकीच्या वाक्यावर माझ्याही नकळत अगदी वसकलेच मी, ‘बाबांनी नाही... कुणीतरी असं म्हटलं होतं मी...’
‘तेच... तेच गं... काय मिनिंग सांग ना त्याचं...’ 
‘गाढवपणानं वागणं म्हणजे शेण खाणं... कळलं?’ असं मी ओरडले तर त्यावर तत्ववेत्त्याचा आव आणत गंभीर चेहऱ्यानं ती म्हणाली, ‘व्हेरी स्ट्रेंज... शेण इज रिलेटेड टु गाय... हाऊ कॅन अ गाढव एन्टर्स इन?’ 
आता मी पुरती संपत करवादले, ‘आता तू जास्त शेण खाऊ नकोस... मुकाट जेवायला चल...’ 
‘मॉम... डोन्ट इन्सल्ट... आय ऍम अ रिस्पॉनसिबल सिटिझन... आय डोंट ईट शेण ऍन्ड ऑल... ओके?’ तिच्यातलं ‘टीन एज’ उफाळून आलं. 
 
‘सारखे अपमान एक बरे होतात ह्यांचे... आम्हाला कोण काळं कुत्रं पण विचारत नव्हतं ह्या वयात..’ ह्या माझ्या वाक्यावर मात्र मूळ स्वभावात परतत नवरा खळाळून हसला. 
‘आई... कुत्र्याचं काय आता? वुई वेअर टॉकिंग अबाऊट गाय ऍन्ड गाढव ना?’ सुपुत्राची जिज्ञासा!
’काही नाही... मीच गाढव आहे म्हणून कुत्रं म्हणाले असेन...’
‘नो मा... यू आर गेटिंग कन्फ्युज्ड नाऊ... यू सेड सम फ्रेजलाइक थिंग...’ तो विषय सोडत नव्हता.
‘हो... काळं कुत्रंही न विचारणे असा वाक्प्रचार आहे आमच्याकडं... महत्वाचं म्हणजे आमच्या आधीच्या आणि नंतरच्या, दोन्ही पिढ्यांच्या राज्यात आमची अवस्था तशीच आहे...’
‘मा... ब्लॅक डॉग्ज लुक सो गॉर्जियस... आपण आणूया एक मा?’
‘तिघांना सांभाळतेय ते कमी आहे म्हणून आता चौथं एक डोक्यावर घेऊ का?’ 
‘मा... वुई आर नॉट डॉग्ज... वुई कॅन हॅन्डल आवर ओन थिंग्ज...’ चिरंजीव!
‘पण करता का हॅन्डल? शेवटी मलाच धारातीर्थी पडावं लागतं ना तुमचे पसारे आवरत?’ 
‘ऐक मा... तू फक्त त्याचं शी-शू बघशील का? बाकी सगळं आम्ही दोघं हँडल करू...’ सुकन्या!
‘दोन बाळंतपणांत कंबरडं मोडलं... तिसरा व्याप मी मुळीच डोक्यावर घेणार नाही... मुकाट जेवा आता...’ पानं वाढून खुर्चीत बसत मी म्हटलं. 
‘आणि तसंही मा... ही म्हणाली तरी काही मदत करेल असं नाही... मला तेवढं गोड बोलून काम करून घेत असते आणि मी काही सांगितलं तर तुझं तू कर असं म्हणते मला..’ सुपुत्र!
 
‘लुक मा... ही इज पॉइझनिंग युवर माईंड...’ कन्यका!
मला असह्य होत मी म्हटलं, ‘विषप्रयोग..???? कसले शब्द वापरता रे एकमेकांसाठी? भावंडं आहात ना सख्खी?"
यावर मला दुजोरा द्यायचा सोडून नवरा खोखो हसत म्हणाला, ‘आता तू घोळ करतीहेस... मराठी मेडियममुळं... शब्दश: अर्थ घेऊ नको गं पॉइझनिंगचा... आपण काडी टाकणं किंवा कळ लावणं म्हणतो ना तितपत लाईटली घे!’
‘बाबा, काडी टाकणं म्हणजे?’ चिरंजीवांची जिज्ञासा सदैवच शिखरावर असते. 
यावर नवऱ्यानं अक्षरही बोलायच्या आत कन्यका वदली, ‘ओह.. यू डोन्ट नो? काडी इज काडी.. ते काडेपेटीमधे नसते का? ती टाकणे.. आई नाही का उदबत्ती, निरांजन असं लावल्यावर फूफू करून मग ती काडी टाकून देत?’
‘त्याचं इथं काय लॉजिक?’ अशा लेकाच्या प्रश्नाचा अर्थही डोक्यात शिरला नाही... कारण माझ्या मेंदूलाच आता कुणीतरी काडी लावल्यासारखं किंवा त्यावर शेण थापल्यासारखं वाटत होतं. 
नवरा मात्र प्रचंड पेशंन्स ठेवून पोरांना कायकाय समजावून देत होता... मला बोचत होतं ते मधेच त्याचं गालातल्या गालात माझ्याकडं बघून मिश्कील हसणं!

वेबदुनिया वर वाचा

संबंधित माहिती