अनुग्रहाची AMC

शुक्रवार, 15 जानेवारी 2021 (13:43 IST)
आमच्या सोसायटीत दर वर्षी दोन वेळा पाण्याच्या टाक्या स्वच्छ करण्याचा कार्यक्रम असतो. साधारण ज्या दिवशी टाकी स्वच्छ होणार असते त्या दिवसापूर्वी दोन दिवस आमचा वॉचमन सोसायटीमधल्या सगळ्या घरात येऊन "कल टाकी साफ होनेवाला है. पुरा दिन पानी बंद रहेगा. घर में पानी भर के रखना. परसो भी सफाई के कारण थोडा गंदा पानी आ सकता है. थोडा ध्यान रखना" अशी सूचना देऊन जातो. आणि ठरलेल्या दिवशी ती टाकी सफाईची प्रक्रिया सुरु होते. 
 
एकदा मला ती टाकी साफ होत असताना बघण्याचा योग आला होता. सगळीच प्रक्रिया एकदम डोळे उघडणारी होती. अगोदर टाकीमधील सर्व पाणी काढून ती रिकामी केली गेली आणि नंतर टाकीचं झाकण उघडलं. त्यात तळाशी इतका गाळ होता की माझा विश्वासच बसला नाही. आमच्या टाकीचं झाकण नेहेमी कुलूप लावून बंद असतं त्यामुळे त्यात वरून कचरा, माती पडणं शक्यच नाही. म्हणजे दररोजच्या पाणी पुरवठ्यामधून जे पाणी गाळून स्वच्छ होऊन येतं त्यातसुद्धा इतकी माती आणि सूक्ष्म कचरा असतो. जे पाणी टाकीत पडत असतं ते शुद्ध आणि स्वच्छच आहे असं दिसतं खरं पण थोडी अशुद्धी त्यात नकळत येतच असते. हीच अशुद्धी तळाशी गाळ होऊन साठत असणार टाकीच्या. तर असा हा जमा झालेला टाकीतला गाळ काढून टाकला की टाकी पुन्हा स्वच्छ धुतली जाते आणि नंतर थोडावेळ कोरडी होण्यासाठी ठेऊन मग संध्याकाळी पाणी आलं की पुन्हा पूर्ण भरली जाते. ही प्रक्रिया झाली कि साधारण एक दिवसभर पाणी गढूळ येतं पण मग पुन्हा स्वच्छ पाणी येऊ लागतं. या सगळ्या कामासाठी सोसायटीने एका कंपनीला AMC म्हणजेच ऍन्युअल मेन्टेनन्स कॉन्ट्रॅक्ट (Annual Maintenance Contract) दिलं आहे. 
 
जी गोष्ट पाण्याची तीच हवेची सुद्धा. आमच्या घरच्या एअर कंडिशनरसाठी अशीच AMC एका कंपनीला दिली आहे. तो माणूस नियमित येतो. आल्यावर AC उघडतो आणि पहिली गोष्ट करतो ती म्हणजे तो एअर फिल्टर साफ करतो. साफ करण्यासाठी तो फिल्टर काढल्यावर त्यावरची धूळ जमलेली बघून आपल्याला विश्वासच बसत नाही आणि वाटतं की आपल्या घरातच हवेत इतकी धूळ असते? इतक्या प्रदूषित हवेत राहतो आपण? 
 
सहज मनात आलं की पाण्याच्या टाकीच्या किंवा एअर कंडिशनरच्या बाबतीत जे घडतं ते मनाच्या बाबतीत होत असेल का ? दिवसभरात इतके विचार माझ्या मनात येतात आणि ते सगळेच विचार खूप चांगले, शुद्ध, स्वच्छ असतात असं जरी मला वाटत असलं तरी बरेचवेळा माझ्या नकळत होत असलेल्या नकारात्मक विचारांचा गाळ माझ्या मनाच्या तळाशी जाऊन पडत नसेल का ? षड्विकारयुक्त विचारांची धूळ आपल्या विचारात आणि आजूबाजूला इतकी उडत असताना ती माझ्या मनापर्यंत पोहोचत नसेल का ? 
 
थोडं अधिक खोलात शिरलं तर लक्षात येत कि आपल्या मनाच्या तळात तसा गाळ, तशी धूळ नक्कीच साठत असणार कारण त्याशिवाय असमाधान, अशांती, अस्वस्थता मनाला का सतावते कधी कधी ? आणि मग तसा गाळ किंवा धूळ साचत असेल, आणि मनाच्या या अथांग टाकीचा तळ साफ करायचा असेल, मनावरची धूळ झटकायची असेल तर मनाची स्वच्छता करण्याची AMC मी कुणाला देऊ शकेन ?  
 
हा विचार आल्यावर असं लक्षात आलं की प्रत्येक संत हे अशी माणसांच्या मनाची स्वछता करण्याची AMC घेण्यासाठीच अवतारीत झालेले असतात. प्रत्येक संतांना जोडले गेलेले जीव त्या संतांपाशीच येत असतात असं म्हणतात. म्हणजे प्रत्येक जीवाची AMC विशिष्ट संतांकडेच असते. याचाच अर्थ असा की संतांचा अनुग्रह हे, मनाच्या साफसफाईसाठी सद्गुरूंवर आपण जी जबाबदारी सोपवतो त्यासाठी झालेलं, अध्यात्मिक स्वरूपाचं का होईना पण कॉन्ट्रॅक्टच नाही का ? 
 
या विचारातून मला कल्पना सुचली की जेव्हा संतांचा अनुग्रह होत असलेलं त्यावेळी सूक्ष्म रूपात सद्गुरू आपल्या मनाच्या टाकीत उतरत असतील. विचारांनी भरलेली टाकी आधी पूर्ण रिकामी करत असतील, षड्विकारांचा, नकारात्मक विचारांचा गाळ काढून टाकत असतील. एखाद्या यज्ञ, पूजा  इत्यादी सत्कर्मयोगे ती टाकी पुन्हा एकदा स्वच्छ धुवून घेत असतील. उपवास, व्रतवैकल्य करवून घेऊन ती टाकी कोरडी करत असतील आणि पुन्हा गाळ निर्माण होऊ नये म्हणून नामस्मरणाचा फिल्टर लावून त्या टाकीच्या झाकणाला पुन्हा कुलूप लावून टाकत असतील. 
 
पाण्याची टाकी स्वच्छ केल्यावर एक दोन दिवस गढूळ पाणी येतं पण पाणी स्थिरावलं की तो गाळ तळाशी बसून पुन्हा स्वच्छ पाणी येऊ लागत तसं अनुग्रह घेतल्यावर नामस्मरण सुरु झालं की मनात खोलवर साचलेले नाही नाही ते विचार वर येऊन मन गढूळतं. काही काळ पण त्यावर शांत राहून त्या गाळाला तळात जाऊ दिलं की मनही शांतावतं आणि नामस्मरणात स्थिरावतं असं मी अनुभवी व्यंक्तींकडून ऐकलं आहे. 
 
हीच कल्पना मी अधिक ताणली आणि मनात आलं की AMC घेणारी कंपनी जरी टाकी साफ करून गेली तरी दररोज टाकी साफ ठेवायची जबाबदारी त्या सोसायटीच्या रहिवाश्यांची असते तशीच एकदा सद्गुरूंचा अनुग्रह मिळाल्यानंतर दररोज माझ्या मनाच्या टाकीला सतत साफ ठेवण्याची जबाबदारी माझीच असते. त्यासाठी संतग्रंथ, मनाचे श्लोक, प्रवचनं इत्यादींसारखी साधनंही संतांनी हाती दिली आहेत. तीच साधन वापरून साधना करणे आणि दररोज मनाला शुचिर्भूत करण्याचा प्रयत्न करणे ही प्रक्रिया मलाच करायची असते. बरं इतकं करूनही काही काळानंतर गाळ पुन्हा सांठतोच, मग त्यासाठी दर सहा महिन्यांनी सद्गुरूस्थानाचं दर्शन किंवा तीर्थाटन करून मनाची टाकी साफ करून घ्यायची. 
 
सद्गुरु देहात असतील तर त्यांच्या सान्निध्यात, आणि ते देहात नसतील तर सद्गुरूस्थानी राहून सत्संग, सत्समागम करून, पुन्हा ती मनाची टाकी मुळापासून साफ करून घेणे हेही माझ्या मनाच्या स्वच्छता अभियानाचा आणि सद्गुरूंबरोबर झालेल्या AMC चा भाग म्हणून मी करणं माझ्यासाठीच हिताचं असतं. 
 
हाच विचार थोडा अधिक पुढे नेला आणि अजून एक गम्मत लक्षात आली.  सोसायटीच्या पाण्याच्या टाकीची किंवा एअर कंडिशनरची AMC आणि सद्गुरूंची अनुग्रहाची AMC यात एक मुख्य फरक असा की,  पाण्याच्या टाकीची काय किंवा एअर कंडिशनरची काय, त्या प्रकारच्या AMC मला दर वर्षी नवीन (Renew) कराव्या लागतात. पण सद्गुरुंच्या अनुग्रहाची AMC मात्र एकदाच करायची, तीसुद्धा कायमची आणि अगदी जन्मोजन्मींसाठी...
 
- सोशल मीडिया

वेबदुनिया वर वाचा

संबंधित माहिती