"गोडवा"

©ऋचा दीपक कर्पे

बुधवार, 26 मे 2021 (13:27 IST)
सुमेधाच्या लेखणीने गती धरली होती. तिचे लेखन दर्जेदार होते आणि खूप कमी वयातच होतकरू लेखिका म्हणून तिला प्रसिद्धी मिळू लागली होती. पण ते म्हणतात न "घर की मुर्गी दाल बराबर" सासूबाईंचा नेहमीचाच सूर की "आजकलच्या मुली सर्व कामाला बाया लावतात, म्हणून हे लिखाण वगैरे जमतंय ह्यांना. आमच्यासारखी धुणीभांडी केली असती, पाहुणचार, सणवार, कुळाचार सांभाळावे लागले असते तेव्हा कळलं असतं!"
 
सध्या कोरोना काळात कामवाल्या मावशी सुट्टीवर. आता घरातील सर्व कामांची जबाबदारी सुमेधावरच. सकाळपासून आवराआवर, न्याहारी, धुणीभांडी, स्वयंपाक सर्वच कामं आली! हे सर्व उरकून दमायला व्हायचे पण तरी ती लेखनासाठी वेळ काढतंच होती. आजही तिचा एक लेख प्रसिद्ध वर्तमान पत्रात प्रकाशित झाला होता. सकाळपासून शुभेच्छांचे फोन यायला सुरुवात झाली. हातात कधी केरसुणी तर कधी लाटणं आणि फोनवर बोलण्यासाठी कानात हेडफोन लावून ती खिंड लढवत होती. सासूबाई सर्व बघत होत्या. तश्या त्यापण खूप मदत करायच्या. सुमेधाची साहित्य क्षेत्रात झालेली प्रगती त्यांना आवडत नसे असेही नाही पण एकदा लग्न झालं की बायकांनी संसारातंच लक्ष द्यायला हवे, अशी काही त्यांची विचारसरणी होती.
 
घरची सर्व कामं उरकून, मुलांचा ऑनलाईन अभ्यास सांभाळून सुमेधा रात्री एक वाजता लॅपटॉप घेऊन साप्ताहिक सदर टाईप करायला बसली. तेवढ्यात तिला स्वयंपाक घरात काही आवाज आला. जाऊन बघते तर सासूबाई चहा करत होत्या. तिने विचारले, "आई एवढ्या रात्री काय करत आहात?" 
"आता थकल्यावर चहा प्यायची इच्छा झाली तर करणार कोण अन् सांगणार कोणाला?" सासुबाई म्हणाल्या.
 
सुमेधाला जरा वाईटच वाटलं, पण तरी स्वतःला सावरत म्हणाली, "आई चहा प्यायचा असेल तर सांगा न, मी करून देते. त्यात काय?" 
 
"अगं मला नको. मी तुझ्या बद्दल बोलतेय! रात्रीची लिहायला बसलीस, चहा घे. जरा तरतरी येईल. तुम्ही आजकालच्या मुली न! फार जिद्दी..पण खरंच हुशार हं.... घर सांभाळून ही आपले अस्तित्व निर्माण करणे, ते टिकवून ठेवणे आणि स्वतःसाठी वेळ काढणे तुम्हालाच जमतं बाई..! 
घे अन् जास्त जागू नको." हातात चहाचा कप देऊन त्या खोलीत निघून गेल्या.
 
सुमेधाला हा अनपेक्षित हवाहवासा आयता चहा अधिकच गोड लागत होता....

वेबदुनिया वर वाचा

संबंधित माहिती