"धर्मसंकट"

बुधवार, 13 जानेवारी 2021 (12:03 IST)
लेखिका- सौ. जया गाडगे, इंदूर (म.प्र.)
 
काही कौटुंबिक अडचणीमुळे वैदेहीने आज ऑफिसला दांडी मारली होती पण तिच्या ऑफिसमध्ये काम करणाऱ्या, नुसरतच्या मुलाच्या पहिल्या वाढदिवसाची पार्टी होती म्हणून तिला घराबाहेर पडणे भाग पडले. रिक्षा करुन ती अंजुमन कॉलनीत पोहोचली.
 
" नुसरत इमरोज खान कुठे रहातात ?" असे विचारताच, एका महिलेने, तिला इमरोज खान नावाची पाटी लिहिलेल्या घराजवळ आणून सोडले. डोअरबेल दाबताच, फिरोजी रंगाचा सलवार-कुर्ता घातलेल्या व त्याच रंगाची ओढणी डोक्यावरुन घेतलेल्या तरुणीने दार उघडले. क्षणभर दोघींची नजरा-नजर झाली आणि वैदेही जवळ-जवळ किंचाळत उद्गारली, " अरे ! गौरी तू ! "
" हो, हे माझेच घर आहे. पण तू रस्ता कसा चुकलीस ? गौरीने आश्चर्याने विचारताच वैदेही बोलली,
" अगं ! माझ्या ऑफिसमधल्या मैत्रीणीच्या, नुसरत खानच्या घरी आज तिच्या मुलाची बर्थ डे पार्टी आहे म्हणून आले. एका महिलेने हेच घर आहे म्हणून दाखविले."
" अगं ! हो, माझं पण आताचं नाव नुसरतच आहे म्हणून कनफ्यूज झाली असेल. चार घरं सोडून तिचं घर आहे. पण तू दारात उभी का ? ये ना आत."

गौरीच्या उत्तराने भांबावलेली वैदेही यंत्रवत आत आली. ड्राईंगरुममध्ये पसरवलेल्या जाजमवर दोन लहान मुले अभ्यास करत बसलेली होती. त्यांच्याकडे प्रश्नवाचक नजरेने पहाताच गौरी म्हणाली,
" हा माझा मुलगा सोहेल आणि मुलगी कायनात. बच्चों, यह है मेरी सहेली और आप की खालाजान वैदेही।"
वैदेहीचा चेहरा कसनुसा झाला. मनातल्या मनात ती पुटपुटली, "मावशी म्हणाली असती तर काय बिघडलं असतं !"
"सलाम अलैकुम खालाजान" म्हणत मुलांनी तिला सलाम केला आणि आत पळ काढला. 
वैदेही पुरती गांगरली होती.
" कशी आहेस वैदेही ? काका-काकू आणि सुयश काय म्हणतात ? आणि हो ! तुझ्या सासरी कोण-कोण आहे ? तू तर लग्नालाही बोलावलं नाहीस. वाळीतच टाकलं मला." क्षीण हसत गौरी बोलली.
" ते जाऊ दे गौरी, तू मात्र नखशिखांत बदलली आहेस." वैदेहीने असा शेरा मारताच, विषयाला कलाटणी देत गौरी म्हणाली, "बरं ! काय घेशील ? चहा, कॉफी की सरबत ?"
" नाही, काही नको, नुसरतकडे जायला उशीर होईल. सगळे वाट पहात असतील तिकडे."
" काहीतरी घ्यावंच लागेल. पहिल्यांदा आली आहेस घरी. जास्त वेळ नाही घेणार तुझा. पटकन् आणते." म्हणत गौरी स्वयंपाक घरात गेली.
 
वैदेहीची नजर, चौफेर भिरभिरु लागली. समोरच्या भिंतीवर, मक्का-मदिनेच्या मशीदीची मोठी फोटोफ्रेम टांगली होती. दुसऱ्या भिंतीवर उर्दूमध्ये काही लिहिलेली पाटी होती. जाजमवर Alif be pe te लिहिलेल्या कव्हरचे पुस्तक पडलेले होते. गोंधळलेल्या वैदैहीच्या डोळ्यासमोरुन गौरीचा भूतकाळ चित्रपटासारखा सरकू लागला.

गौरीचे घर वैदेहीच्या घराशेजारीच होते. गौरीचे बाबा अनिकेत साठे, पेशाने नामांकीत वकील व वृत्तीने आधुनिक विचारांचे नेते होते. त्यांच्या सडेतोड बोलण्याचा कोर्टातही बराच दरारा होता. गौरीची आई स्मिताकाकू, जितकी पापभिरु व देवभोळी, बाबा तेवढेच नास्तिक. गौरी अगदी आपल्या बाबांवर गेली होती. देव-धर्म, सणवार, उपास-तापास यावर मुळीच विश्वास न ठेवणाऱ्या गौरीचे, भविष्यात काय होणार याची चिंता स्मिताकाकूंना सतत सलत रहायची. पत्नीच्या देवभक्तीवर चिडून एक दिवस, वकील साहेबांनी देवघरातील देवांच्या मूर्ती उचलून नेल्या. त्यांना विहिरीत टाकले, मंदिरात नेवून ठेवले की लपवून ठेवले याचा थांगपत्ताही लागू दिला नाही.
 स्मिताकाकू, वैदेहीच्या आईजवळ कधी-कधी मन मोकळं करायच्या. त्यांच्या देवघरातील देवांसमोर भक्तीभावाने माथा टेकवायच्या. वैदेहीच्या आईने कपाळावर हळद-कुंकवाची बोटे टेकविली की त्या गहिवरुन जायच्या. वडिलांच्या प्रखर बुद्धीचा व  स्पष्टवक्तेपणाचा वारसा गौरीकडे अनुवंशाने आलाच होता. दोघे मिळून स्मिताकाकूंच्या धार्मिक भावनांची टर उडवायचे. गौरीच्या बिनधास्त वृत्तीचे वैदेहीला मनातून कौतुक वाटायचे पण तिच्या जास्त नादी लागू नको, म्हणून आई-बाबा वैदेहीला सतत दटावत रहायचे. कॉलेजमध्ये गेल्यावर, ओजस्वी वाणीचा, आधुनिक विचारांचा व आकर्षक व्यक्तीमत्वाचा, कॉलेजचा जी.एस्., इमरोज खान गौरीच्या संपर्कात आला. गोऱ्यापान, रेखीव व बांधेसूद गौरीच्या प्रेमात पडून, दोघांनी लग्नाच्या आणाभाकाही घेतल्या. तिचे प्रेम प्रकरण कानी पडल्यावर वैदेहीला तिच्या घरी जाण्यास मज्जाव घातला गेला. हे ऐकून स्मिताकाकूंचे तर धाबे दणाणले. काही अघटीत घडण्याच्या भीतीने त्या गौरीला म्हणाल्या," आपले व त्यांचे संस्कार वेगळे, धर्म वेगळा. हे सबंध जुळविण्याचा विचार मनातून काढून टाक गौरी ! एवढ्या मोठ्या धर्मसंकटात पाडू नकोस गं ! हात जोडते तुझ्यापुढे." 
" धर्मसंकट कसले आई ! मी आणि इमरोज, दोघेही देवधर्माच्या थोतांडाला मानत नाही. आमचे विचार आणि मने जुळली आहेत. मी आपल्या मनपसंत जोडीदाराबरोबर, सुखाचा संसार करावा असं तुला वाटत नाही का ?"
"अगं ! तुम्ही नसाल मानत पण त्याच्या घरचे लोक तर मानत असतील ना ! "
"का ! तू ही इतकी धार्मिक आहेस ! मी मानते का तुझे ? बाबा आणि तू तर, मनाने दोन टोकांवरील बेटावर रहाता, तरीही संसार करतच आहात ना ! कमीतकमी आमचे तर असे नाही. आम्ही फक्त भारतीय आहोत आणि मानवता हाच आपचा धर्म मानतो."

स्मिताकाकूंनी तिला समजविण्याचा आटोकाट प्रयत्न केला पण पालथ्या घड्यावर पाणी ! आपले बाबा जात-पात व धर्मास मानत नाहीत, त्यामुळे ते या संबंधास मान्यता देतील हा विश्वास गौरीला होता. 
वरवर पुरोगामी विचारांचे चिलखत घातलेले वकीलसाहेब, मुलीच्या या निर्णयाने मात्र पुरते हादरले. बाबांचे दुटप्पी धोरण न आवडून ती त्यांच्याशी वाद घालू लागली. 

" तुम्ही परवानगी दिली तर तुमच्या आशीर्वादाने नाहीतर त्याविना, पण लग्न तर मी इमरोजशीच करणार." 
असे तिने ठणकावून सांगताच वकील साहेबांच्या रागाचा पारा अनावर झाला. " चालती हो घरातून, आणि आयुष्यात पुन्हा हे काळं तोंड कधी दाखवू नकोस आम्हाला." असे म्हणून त्यांनी गौरीला घराबाहेर काढले, ते कायमचेच.

" गौरी माझा गर्व आहे." म्हणून अभिमान मिरविणाऱ्या, कणखर वकील साहेबांच्या स्वाभिमानास तडा गेला आणि काही दिवसांनी, ह्यदयविकाराचा तीव्र धक्का सहन न होऊन, त्यांनी परलोक गाठला. संसाराची वाताहत झालेल्या स्मिताकाकू, आपल्या भावाकडे निघून गेल्या. जाण्यापूर्वी, दुःखद अंतःकरणाने त्यांनी हा सर्व घटनाक्रम, वैदेहीच्या आईस कथन केला होता. काही काळाने त्यांच्याही निधनाची बातमी उडत-उडत कानावर पडली होती.

चहाचा ट्रे घेऊन येणाऱ्या गौरीच्या चाहूलीने, वैदैहीच्या विचारांची तंद्री तुटली. नेहमी जीन्स आणि टी शर्ट मध्येच वावरणाऱ्या, बेदरकार गौरीला, या पेहराव्यात  पाहून तिला मनोमन हसू आले. काही क्षणांसाठी, स्थिर झालेल्या वातावरणाची शांतता भंग करत, ओठांवर अवसान गोळा करुन, रडवेली गौरी बोलू लागली, " आई-बाबांचे समजले गं ! पण त्या घराचे दरवाजे माझ्यासाठी कायमचे बंद झाल्याने... " आवंढा गिळत गौरी पुढे काही बोलणार तोच आतल्या खोलीतून गंभीर स्वरात हाक आली, " नुसरत बी, चलो ! नमाज़ का वक्त हो गया है ।"
 
" अभी आई, अम्मीजान !" म्हणून, माथ्यावरची ओढणी सारखी करत गौरी लगबगीने उठली. डाव्या हाताच्या पाचही बोटांनी "आत्ता येते" असे खुणावत ती आतल्या दिशेने वळाली आणि वैदेही घराबाहेर !

वेबदुनिया वर वाचा

संबंधित माहिती