अखेर एसटी कर्मचाऱ्यांच्या वेतनात ३२ ते ४८ टक्के वाढ, १ लाख ५ हजार ६७९ कर्मचाऱ्यांना लाभ

सर्वांची जिव्हाळा असलेली राज्य परिवहन बस सेवेत मोठे बदल होत आहे. याचाच एक भाग म्हणून सरकारने अनेक वर्षपासून प्रलंबित असलेली वेतन वाढ केली आहे. तुटपुंज्या पगारावर काम करणाऱ्या एस टी कर्मचारी वर्गाला याचा मोठा फायदा होणार आहे. त्यामुळे परिवहन सेवा अजून चांगली होणार आहे. ही वेतनवाढ व्हावी यासाठी कर्मचारी आग्रही होते. पाहूयात काय आहे वेतन वाढ.
 
 एसटी कर्मचाऱ्यांसाठी परिवहन मंत्री तथा एसटी महामंडळाचे अध्यक्ष दिवाकर रावते यांनी आज भरघोस वेतनवाढ जाहीर केली. ही वेतनवाढ ४ हजार ८४९ कोटी रुपयांची असून यामुळे कर्मचाऱ्यांच्या वेतनात साधारण ३२ ते ४८ टक्के इतकी वाढ होणार आहे. राज्यातील १ लाख ५ हजार ६७९ एसटी कर्मचाऱ्यांना याचा लाभ होणार आहे, अशी माहिती मंत्री दिवाकर रावते यांनी आज येथे घेतलेल्या पत्रकार परिषदेत दिली.
 
मंत्री श्री.रावते यांनी यावेळी कनिष्ठ कर्मचाऱ्यांच्या वेतनाच्या समानीकरणाच्या दृष्टीनेही महत्वाचे निर्णय जाहीर केले. याशिवाय एसटी कर्मचाऱ्यांच्या मुलांना शिक्षणासाठी सावित्रीबाई जोतिबा फुले शिष्यवृत्ती योजना तसेच कर्मवीर भाऊराव पाटील शिक्षण अग्रीम योजनाही यावेळी जाहीर करण्यात आली.
मंत्री श्री.रावते यांनी ही वेतनवाढ जाहीर करण्यापूर्वी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि शिवसेना पक्ष प्रमुख उद्धव ठाकरे यांची भेट घेतली. ही वेतनवाढ त्यांच्या निदर्शनास आणून आपण ती जाहीर करीत असल्याचे त्यांनी सांगितले.सह्याद्री राज्य अतिथीगृहात झालेल्या या पत्रकार परिषदेस खासदार अरविंद सावंत, आमदार भाई जगताप, एसटी महामंडळाचे उपाध्यक्ष व व्यवस्थापकीय संचालक रणजीत सिंह देओल उपस्थित होते.
 
मंत्री श्री.रावते म्हणाले की, वेतन करार करण्याबाबत एसटी कर्मचाऱ्यांच्या मान्यताप्राप्त संघटनेशी आपण मागील कित्येक दिवसांपासून वाटाघाटी करीत आहोत. पण महामंडळाने सुचविलेल्या चांगल्या प्रस्तावांनाही संघटनांनी नकार दिला. मागील सरकारच्या काळात १५ वर्षात वेतन करार करताना एसटी कर्मचाऱ्यांवर मोठा अन्याय झाला आहे. त्या अन्यायाचे निराकरण करण्याचा प्रयत्न आपण केला. आतापर्यंत झालेल्या सगळ्या करारांपेक्षाही जास्त रकमेच्या वेतनवाढीची आज आपण घोषणा करीत आहोत, असे ते म्हणाले.मान्यताप्राप्त कर्मचाऱ्यांसमवेत करावयाचा करार सध्या न्यायालयीन प्रक्रियेत आहे. याचा निकाल लागण्यास किती दिवस लागतील याची माहिती नाही. तोपर्यंत कर्मचाऱ्यांची वेतनवाढ रोखणे हा त्यांच्यावर मोठा अन्याय असेल. त्यामुळे वेतन कराराची प्रतिक्षा न करता आज आपण ही वेतनवाढ जाहीर करीत आहोत, असे त्यांनी सांगितले.
 
२.५ हजार ते १२ हजार इतकी वेतनवाढ
 
मंत्री श्री.रावते म्हणाले की, एसटी महामंडळामध्ये कनिष्ठ कर्मचाऱ्यांचा प्रश्न गंभीर होता. समान काम करुनही त्यांना असमान वेतन मिळत होते. आपण कनिष्ठ कर्मचाऱ्यांवरील अन्याय दूर करुन त्यांचा कनिष्ठ वेतनश्रेणीचा कालावधी ३ वर्षावरुन १ वर्षावर आणला, आणि आता तोही रद्द करण्यात आला आहे. आजच्या वेतनवाढीत कनिष्ठ वेतनश्रेणीवर अनुक्रमे ३ व ५ वर्षे काम केलेल्या कर्मचाऱ्यांसाठी भरघोस वेतनवाढ जाहीर करण्यात आली आहे. त्यानुसार या कर्मचाऱ्यांच्या वेतनात आता किमान २, ५८१ रुपये ते कमाल ९,१०५ रुपये इतकी वाढ होणार आहे.आज रोजी नियमित वेतनश्रेणीतील कर्मचाऱ्यांच्या वेतनात आता ३,६९२ रुपये ते १२,०७१ रुपये इतकी वाढ होईल, अशी माहिती त्यांनी यावेळी दिली. 
 
एसटी कर्मचाऱ्यांच्या भत्त्यांमध्येही भरघोस वाढ
 
मंत्री श्री.रावते यांनी यावेळी एसटी कर्मचाऱ्यांना मिळणाऱ्या विविध भत्त्यांमध्येही भरघोस वाढ जाहीर केली. त्याचा आर्थिक भार प्रतिवर्षी 250 कोटी रुपये इतका आहे. हजेरी प्रोत्साहन भत्ता (४२ दिवसांसाठी) आता १८० रुपयांवरुन १ हजार २०० रुपये इतका वाढविण्यात आला आहे. पूर्वी असलेला १४ ते ५० रुपयांपर्यंतचा धुलाई भत्ता आता सरसकट १०० रुपये करण्यात आला आहे. पूर्वी असलेला ११ व १३ रुपयांचा रात्र पाळी भत्ता आता अनुक्रमे ३५ व ४५ रुपये इतका करण्यात आला आहे. सध्या साधारण ठिकाणी रात्रवस्ती भत्ता हा फक्त ४ रुपये इतका आहे. तो आता ७५ रुपये इतका करण्यात आला आहे. याशिवाय जिल्हा ठिकाणी असलेला रात्र वस्ती भत्ता हा ११ रुपयांवरुन ८० रुपये तर विनिर्दिष्ठ ठिकाणी असलेला १५ रुपयांचा रात्रवस्ती भत्ता आता १०० रुपये करण्यात येत असल्याची घोषणाही मंत्री श्री.रावते यांनी यावेळी केली.
 
सुधारित वेतननिश्चिती प्रशासकीय कामांच्या अधिन राहून तात्काळ लागू करण्यात येईल. परंतु, दि. 1 एप्रिल 2016 ते 30 जून 2018 या 26 महिन्यांच्या थकबाकीची रक्कम 1 हजार 197 कोटी रुपये ही 48 समान हफ्त्यांमध्ये अदा करण्यात येईल. कर्मचाऱ्यांना सुधारित वेतनवाढ अमान्य असल्यास प्रशासनाकडे तसे पत्र 07 जून, 2018 पर्यंत देणे आवश्यक आहे. ज्यांना ही वेतनवाढ मान्य नाही त्यांच्यासाठी महामंडळाने अन्य पर्याय उपलब्ध करुन दिला आहे. अशा कर्मचाऱ्यांनी राजीनामा दिल्यास चालकाकरिता 20 हजार रुपये व वाहकाकरिता 19 हजार रुपये इतक्या ठोक वेतनावर 5 वर्षासाठी त्वरीत कंत्राटी पद्धतीने नोकरी दिली जाईल. प्रति वर्षी 200 रुपये वेतनवाढ करण्यात येईल, असेही मंत्री श्री.रावते यांनी यावेळी जाहीर केले. मान्यताप्राप्त संघटनेस ही वेतनवाढ मान्य असल्यास महामंडळाच्या प्रशासनाशी करार करण्यासाठी मुभा राहील, असे ते म्हणाले.
 
एसटी कर्मचाऱ्यांच्या पाल्यांसाठी विविध योजनांची घोषणा
 
एसटी महामंडळातील कामगारांच्या महाविद्यालयात शिक्षण घेत असलेल्या पाल्यांसाठी ‘सावित्रीबाई जोतिबा फुले शिष्यवृत्ती योजना’ सुरु करण्यात येत असून, त्यांच्या शिक्षणासाठी प्रति महिना 750 रुपये रक्कम देण्याचे निश्चित केले आहे.एसटी महामंडळातील कामगारांच्या पाल्यांचा शैक्षणिक खर्चाचा बोजा कामगारांवर येऊ नये यासाठी कामगारांची जे पाल्य महाविद्यालयात शिक्षण घेत आहेत त्यांच्या महाविद्यालयाचे शैक्षणिक शुल्क भरण्यासाठी ‘कर्मवीर भाऊराव पाटील शिक्षण अग्रीम योजना’ चालू करण्यात येत असून, त्यासाठी कामगारांना वार्षिक शुल्काची रक्कम अग्रीम म्हणून देण्यात येवून त्याची प्रतिपूर्ती ठराविक कालावधीमध्ये दरमहा वेतनातून कपात करण्याचे निश्चित केले आहे.
 
शहीद सन्मान योजनेअंतर्गत दिले नेमणूकपत्र
 
शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे शहीद सन्मान योजनेअंतर्गत मातृभूमीच्या संरक्षणार्थ शत्रूशी लढतांना शहीद झालेल्या संरक्षण दलातील जवानांच्या वारसास एसटी महामंडळामध्ये नोकरी देण्याबाबतची घोषणा केल्यानुसार आज इंद्रजित सुधाकर भट यांना प्रभारक या पदावर नेमणूक देण्यात आली. मंत्री श्री.रावते, खा.श्री. सावंत, आ.भाई जगताप यांच्या हस्ते हे नेमणूकपत्र देण्यात आले. 

वेबदुनिया वर वाचा

संबंधित माहिती