महिंद्रा समूह व उद्योग विभाग यांच्यात झालेल्या सामंजस्य करारावर उद्योग विभागाचे अपर मुख्य सचिव सुनील पोरवाल व महिंद्रा ॲण्ड महिंद्राचे व्यवस्थापकीय संचालक डॉ. पवन गोयंका यांनी स्वाक्षऱ्या केल्या. महिंद्रा अँड महिंद्रा कंपनी ही चाकण येथील प्रकल्पात वीजेवर चालणाऱ्या गाड्यांच्या उत्पादनासाठी उत्पादन क्षमतेत वाढ करणार आहे. तसेच या वाहनांसाठी लागणारे सुटे भाग तयार करणार आहे. महिंद्रा अँड महिंद्रा व परिवहन विभाग यांच्यात झालेल्या करारावर डॉ. गोयंका व प्रधान सचिव श्रीकांत सिंह यांनी स्वाक्षऱ्या केल्या. या करारानुसार विविध सार्वजनिक व खासगी वाहतूक व्यवस्थेसाठी इलेक्ट्रिक कार पुरविण्यासाठी महिंद्रा कंपनी शासनासोबत सहकार्य करणार आहे. परिवहन विभागाने टाटा मोटर्स बरोबर राज्य शासनाला एक हजार इलेक्ट्रिक वाहने पुरविण्यासंदर्भात आज करार केला. या करारानुसार टाटा मोटर्स ही टाटा पॉवरच्या सहकार्याने विजेवर चालणाऱ्या वाहनांसाठी राज्यामध्ये शंभर चार्जिंग केंद्रे उभारणार आहे. या करारावर टाटा मोटर्सचे व्यवस्थापकीय संचालक ग्युंटेर बुश्चेकव प्रधान सचिव श्रीकांत सिंह यांनी स्वाक्षऱ्या केल्या.
एनर्जी इफिशियन्सची सर्व्हिसेस लिमिटेड (इइएसएल) यांच्याबरोबर सार्वजनिक बांधकाम विभाग व सामान्य प्रशासन विभागाने सामंजस्य करार केला आहे. इइएसएल ही सार्वजनिक बांधकाम विभाग व सामान्य प्रशासन विभागाला विजेवर चालणाऱ्या कार तसेच या वाहनांसाठी चार्जिंग सुविधा पुरविणार आहे. या करारांवर इइएसएलतर्फे कंपनीचे व्यवस्थापकीय संचालक सौरभ कुमार व राज्य शासनामार्फत सार्वजनिक बांधकाम विभागाचे प्रधान सचिव आशिषकुमार सिंह व सामान्य प्रशासन विभागाचे प्रधान सचिव राजगोपाल देवरा यांनी स्वाक्षऱ्या केल्या.