शिवराज्याभिषेक महोत्सव भव्य आणि अधिक देखणा करण्यासाठी सूचना पाठवा-सुधीर मुनगंटीवार
शनिवार, 4 मार्च 2023 (07:49 IST)
सांस्कृतिक कार्य मंत्री सुधीर मुनगंटीवार यांचे आवाहन
मुंबई, : पारतंत्र्याच्या अंधकारातून स्वराज्याच्या प्रकाशाकडे महाराष्ट्राला आणि देशाला घेवून जाणाऱ्या ऐतिहासिक आणि तेजोमय शिवराज्याभिषेक सोहळ्याला 2024 या वर्षी ३५० वर्षे पूर्ण होत आहेत अर्थात या वर्षी हा सोहळा 350 वर्षात पदार्पण करत आहे. देशाच्या स्वातंत्र्याच्या अमृतकाळात येणारा शिवराज्याभिषेकाचा ३५० वा वर्धापनकाळ राज्याचा सांस्कृतिक विभाग शिवराज्यभिषेक महोत्सव म्हणून साजरा करणार असून हा महोत्सव अधिकाधिक चांगल्या प्रकारे साजरा व्हावा यादृष्टीने राज्यातील सर्वच लोकप्रतिनिधी, प्रशासकीय अधिकारी आणि समाजातील मान्यवरांनी कल्पक सूचना कळवाव्यात असे आवाहन राज्याचे सांस्कृतिक कार्य मंत्री ना. सुधीर मुनगंटीवार यांनी केले आहे.
यासंदर्भात ना. सुधीर मुनगंटीवार यांनी भावनिक आवाहन करणारे एक पत्र राज्यातील खासदार, आमदार, मंत्री, जिल्हा परिषद अध्यक्ष, पंचायत समिती सभापती, महापौर, नगराध्यक्ष, विभागीय आयुक्त, जिल्हाधिकारी, मनपा आयुक्त, पोलिस आयुक्त, जिल्हा परिषद मुख्य कार्यकारी अधिकारी, पोलिस अधीक्षक, उप विभागीय अधिकारी, तहसीलदार, गट विकास अधिकारी व इतर अधिकारी पदाधिकारी आदींना पाठविले आहे.
या पत्रात ना. मुनगंटीवार यांनी आर्त साद घालताना म्हटले आहे की, छत्रपती शिवाजी महाराज म्हणजे महाराष्ट्राचा पराक्रम,महाराष्ट्राचा स्वाभिमान, महाराष्ट्राची दुर्दम्य आकांक्षा,महाराष्ट्राच्या शौर्याचे तेजस्वी प्रतिक आहेत.
बलाढ्य मोगल सत्तेशी युक्ती आणि बुद्धीने लढत महाराजांनी अक्षरशः शून्यातून विश्व निर्माण करीत स्वराज्याची स्थापना केली.हा सगळा संघर्षपूर्ण कालखंड म्हणजे महाराजांच्या अद्भुत प्रतिभेचा,दिव्यत्वाचा,अफाट सामर्थ्याचा साक्षात्कार होय.सर्वसामान्य मावळ्यांच्या बळावर आणि विश्वासावर झालेली ही वाटचाल म्हणजे भावी पिढ्यांसाठी कोरल्या गेलेली प्रेरणागाथाच होय.ज्येष्ठ शुद्ध त्रयोदशी शालिवाहन शके १५९६ म्हणजे ६ जून १६७४ या दिवशी महाराजांचा राज्याभिषेक झाला.केवळ महाराष्ट्राच्याच नव्हे तर साऱ्या देशाच्या दृष्टीने ही एक असाधारण गोष्ट होती,एक सुवर्णक्षण होता .या क्षणाने मराठी माणसाच्या आयुष्यात नवीन पहाट उगवली,सामान्य माणसांच्या शक्तीने मदांध सतेला आव्हान दिल्या जावू शकते हा विश्वास महाराष्ट्रीयांच्या मनात रुजवल्या गेला,अनेक शतकांचे दास्य निखळून पडले आणि महाराष्ट्र धर्माची पुनःस्थापना झाली.या क्षणाने महाराज छत्रपती झाले,शिवराज्यभिषेक शकाचा प्रारंभ झाला,महाराजांच्या दिग्विजयाची आणि मराठा साम्राज्याची ख्याती सर्वत्र निनादू लागली.
सन २०२३-२०२४ या वर्षात शिवराज्याभिषेक शक ३५० हा येत आहे. ज्येष्ठ शुद्ध त्रयोदशी ही तिथी चालू वर्षात २ जून रोजी येत असून २०२४ मध्ये ही तिथी २० जून रोजी येत आहे. तेंव्हा दिनांक २ जून २०२३ पासून २० जून २०२४ या काळात शिवराज्यभिषेक महोत्सव साजरा करण्यात येईल.
या महोत्सवाच्या आयोजनाने महाराजांचे कृतज्ञ स्मरण करणे ,त्यांच्या असाधारण कर्तुत्वाचा जागर करणे,त्यातून निर्माण होणार्या उर्जेतून सत्कार्याची वाट उजळणे हा दैवी योग तर साध्य होईलच पण यासह नव्या पिढीपर्यंत महाराजांचा हा पराक्रमी वारसा पोहोचेल आणि त्यातून प्रेरणा घेत नवी पिढी सर्वच क्षेत्रात आपल्या प्रतिभेने अग्रेसर राहिल असा विश्वास वाटतो. शिवराज्यभिषेक महोत्सवाच्या अनुषंगाने महाराष्ट्र शासन या संपूर्ण वर्षामध्ये विविध प्रकारचे उपक्रम हाती घेत आहे.
नवनवीन कल्पनांना साकार करून समाजाला गतिशील राखण्यात आपण सतत कार्यरत राहिला आहात. शिवराज्यभिषेक महोत्सव हा अधिकाधिक चांगल्या प्रकारे साजरा करण्याच्या दृष्टीने आपण सूचना कळविल्यास त्या बहुमोल ठरतील असेही ना. मुनगंटीवार यांनी या पत्रात म्हटले आहे.
[email protected] यावर सूचना पाठविल्यास शासनातर्फे त्यांचा अवश्य विचार करण्यात येईल असेही आवाहन त्यांनी केले आहे.
Edited by : Ratnadeep Ranshoor