एसटी कर्मचाऱ्यांच्या तक्रारीची मानवी हक्क आयोगाकडून दखल

गुरूवार, 2 मार्च 2023 (08:22 IST)
पुणे :संपूर्ण महाराष्ट्रासह देशातील सात राज्यातील प्रवाशांचा प्रवास सुखकर करणारे एसटी कर्मचारी मुलभूत सुविधांपासून वंचित असून त्यांच्या मानवी हक्कांचे तसेच संविधानिक अधिकारांचे उल्लंघन होत असल्याबाबतची तक्रार महाराष्ट्रातील 92 हजार एसटी कर्मचाऱ्यांच्या वतीने ऍड. विकास शिंदे व सहकाऱ्यांनी राष्ट्रीय मानवी हक्क आयोगाकडे दाखल केली असून, या तक्रारीची दखल मानवी हक्क आयोगाने घेतली आहे.
 
महाराष्ट्रात 92 हजारपेक्षा जास्त राज्य परिवहन महामंडळाच्या कर्मचाऱ्यांनी सन 2021 मध्ये संप केला होता. एसटी महामंडळ बरखास्त करून त्याचे विलिनीकरण सरकारमध्ये करण्यात यावे, एसटी कर्मचाऱ्यांना सरकारी कर्मचाऱ्यांचा दर्जा मिळावा, तसेच पगारवाढ व्हावी, या त्यांच्या प्रमुख मागण्या केल्या होत्या. संपादरम्यान, एसटीचे कर्मचारी, ड्रायव्हर, कंडक्टर यांच्यासोबत चर्चा करताना तसेच आगारातील मूलभूत सोयी सुविधांची पाहणी केली असता एसटी कर्मचारी दयनीय अवस्थेत काम करत असल्याचे दिसून आले होते. एसटी कर्मचाऱ्यांसोबत केलेल्या चर्चेनंतर त्यांच्या कामाची पद्धत, त्यांना दिल्या जाणाऱ्या सोयी सुविधा यांचा अभ्यास केल्यानंतर त्यांच्या मानवी हक्कांचे उल्लंघन होत असल्याचे निदर्शनास आल्यामुळे सदरची तक्रार आयोगाकडे दाखल करण्यात आली होती.
Edited by : Ratnadeep Ranshoor

वेबदुनिया वर वाचा

संबंधित माहिती