महात्मा गांधींसारख्या देशातील महापुरूषांबद्दल करण्यात येणा-या आक्षेपार्ह आणि बदनामीकारक वक्तव्यांबाबत मुंबई उच्च न्यायालयात एक जनहित याचिका दाखल करण्यात आली आहे.
श्री शिवप्रतिष्ठान हिंदुस्तानचे संस्थापक अध्यक्ष मनोहर ऊर्फ संभाजी भिडे यांनी महात्मा गांधींबाबत केलेल्या अपमानास्पद वक्तव्यावर कुमार महर्षी यांनी जनहित याचिका केली असून त्यावर आज सकाळी मुख्य न्यायमूर्ती देवेंद्रकुमार उपाध्याय आणि न्यायमूर्ती आरिफ डॉक्टर यांच्या खंडपीठासमोर तातडीची सुनावणी पार पडणार आहे.
प्रसारमाध्यमे आणि समाजमाध्यमांतून प्रसिद्ध केल्या जाणा-या महापुरुषांबाबतच्या आक्षेपार्ह आणि बदनामीकारक वक्तव्यांबाबतचा प्रसार रोखण्यासाठी काही मार्गदर्शक तत्त्वे तयार करण्याची प्रमुख मागणी या याचिकेतून केली गेली आहे. तसेच महापुरूषांची बदनामी करणा-यांची यादी तयार करून त्यांना प्रसारमाध्यमे किंवा समाजमाध्यमांतून अपमानास्पद टिप्पणी करण्यापासून मनाई करण्याचे आदेश राज्य सरकारला देण्याचे मागणीही याचिकाकर्त्यांनी याचिकेत केली आहे.