संभाजी भिडे सतत प्रक्षोभक आणि वादग्रस्त वक्तव्य कुणासाठी आणि का करत असतात?

सोमवार, 31 जुलै 2023 (15:28 IST)
पुण्यात प्र. बा. जोग नावाचे एक वादग्रस्त गृहस्थ होते. विक्षिप्त म्हणून ओळखले जात. वसंत व्याख्यानमालेत बोलू दिले नाही म्हणून स्वतःची पसंत व्याख्यानमाला चालवत. कधी लहर आली की शनिवारवाड्यावर एक सभा घेत. स्वतःच हिंडून त्याची जाहिरात करीत. 1980 च्या दशकात अशाच एका सभेला मी गेलो होतो.
 
अभिनेत्री भक्ती बर्वे यांनी काही दिवसांपूर्वी शफी इनामदार यांच्याशी लग्न केले होते. बर्वे या जन्माने ब्राह्मण होत्या आणि शफी हे मुस्लिम. ते दोघेही त्यावेळी नामांकित कलाकार होते. त्यांच्याविषयी जोग अत्यंत अश्लील रीतीने बोलत होते.
 
शफी यांच्या मुस्लिम असण्याचा उद्धार करीत होते. दैनिक सकाळचं कार्यालय बुधवार पेठेत आहे. ही पेठ वेश्यांच्या वस्तीमुळे अधिक ओळखली जाते. त्यावरून टवाळी करीत होते. इतरही अनेकांबाबत ते असंच बोलत होते. लोक दाद देत होते.
 
संभाजी भिडे यांचं महात्मा गांधी यांच्याबाबतचं वक्तव्य आणि लोक त्याला देत असलेली दाद याची बातमी शुक्रवारी मराठी वृत्तवाहिन्यांनी प्रसारित केली. ती पाहून जोग यांच्या सभेची आठवण आली.
 
जोग पुण्याचे नगरसेवक आणि एकदा उपमहापौरही झाले होते अशी नोंद इंटरनेटवरच्या माहितीत सापडते. ते थेटपणे कोण्या राजकीय पक्षाशी संबंधित नव्हते. पण विशिष्ट समुहातले लोक चेकाळतील अशी वक्तव्यं ते करीत. अशा चेकाळणाऱ्या लोकांना दलित, मुस्लिम आणि स्त्रिया यांच्याविरुध्द बोललेलं अतिशय आवडत असतं.
 
एसेम जोशींच्या आत्मचरित्रात (मी- एसेम) त्यांच्या तरुण वयातला एक प्रसंग आहे. ते पुण्यात शिकत होते. ‘भालाकार भोपटकर हे हिंदुत्ववादी पुढारी होते. लिहिण्याबोलण्यात भयंकर शिवराळपणा होता. बाबासाहेब आंबेडकरांशी त्यांचे कायम वाद झाले. अस्पृश्यता बाळगण्यात चुकीचं काय असं त्यांचं मत होतं. त्यासाठी त्यांनी एक सभा आयोजित केली. ‘असपृश्यांना तर सोडाच, आमच्या कुटुंबातल्याच बायकांना सुध्दा मासिक पाळीच्या काळात आम्ही शिवत नाही,’ असा दावा त्यांनी केला. त्यांच्या भक्तांनी त्यावर जबरदस्त दाद दिली. एसेम यांना राहवले नाही. ते उठून उभे राहिले. आणि, ‘तीन दिवसांनंतर जवळ किती घेता तेही सांगून टाका’, असं म्हणाले. साहजिकच सभेत गोंधळ झाला आणि एसेम यांना मारहाण करण्यासाठी सगळे धावून आले. ही घटना 1920च्या दशकातील आहे.
 
नेते आणि त्यांच्याभोवतीचे चेकाळणारे लोक हा समाजातला पुरातन आकृतिबंध आहे. बहुमताच्या आधुनिक लोकशाही राजकारणातही तो उपयोगी आहेच. बाळ ठाकरे यांचा दाखला आपल्यासमोर आहे. भिडे यांचा कळप हाही सध्याच्या काळातले एक उदाहरण आहे.
 
शिव्या देऊन आपल्या शत्रूचा तेजोभंग करणं ही जगभरातली जुनी पद्धत आहे. गांधी हे त्यांच्या आईच्या लग्नाच्या नवऱ्याचे अपत्य नाहीत असा त्यांच्यावरचा हल्ला आहे. शिवाय, त्यांचे वडिल मुस्लिम होते हेही शिवी दिल्याप्रमाणे सांगितले जात आहे.
 
(शिव्या देण्याची ही पद्धत आजच्या तरुण पिढीतील काही जणांना कळणार नाही. एखाद्याचे आईबाप कोण हे ठाऊक नाहीत किंवा अमुक एकाचा खरा बाप मुस्लिम आहे असं म्हटलं तर ते ‘सो व्हॉट’, किंवा ‘मग काय झालं’ असा सवाल करू शकतील. पण अशांची संख्या थोडी आहे.)
 
पाश्चात्य जगात सरदार किंवा राजघराणी आणि बाकीचे लोक अशी दरी होती. भारतात जातिव्यवस्था आहे. वरच्यांनी खालच्यांना ठेचण्याच्या तत्वावरच ती उभारलेली आहे.
 
आपला अपमान होणे हे नैसर्गिक आहे अशी श्रध्दा खालच्या स्तरात खोलवर पेरणे हे या व्यवस्थेचं वैशिष्ट्य आहे. आणि ब्राह्मण सोडून इतर सर्व जण कोणा ना कोणाच्या खाली आहे. आपली याति वा कुळ हीन असल्याबद्दल मराठी संतांच्या अभंगात अनेकदा दिसणारा कसनुसेपणा हे त्याचे उदाहरण होय.
 
तुझी आई वेश्या आहे याबरोबरच तुझे आई वा बाप हीन जातीचे आहेत ही भारतीय समाजातली खास मर्मभेदी शिवी आहे.
 
आता यात थोडा बदल झाला आहे. हिंदुत्ववादाच्या (निदान तोंडदेखल्या) राजकारणात जातींच्या ऐक्याला महत्त्व आहे. त्यामुळे त्या शिवीमध्ये पालट केला गेला आहे. कथित हीन जातींच्या जागी आता मुसलमानांना टाकण्यात आलं आहे.
 
मुसलमानांशी संबंध जोडला की तिथं आपोआप द्वेष तयार करता येऊ शकतो हे हिंदुत्ववाद्यांनी गेल्या काही वर्षात दाखवून दिलं आहेच. तथाकथित लव्ह जिहाद, लँड जिहाद याबाबतची आंदोलने ही त्याची उदाहरणे आहेत.
 
जातिव्यवस्थेत वरच्या स्तरात तथाकथित उच्चवर्णीय होते. एकोणिसाव्या आणि विसाव्या शतकात या जातींनी आधुनिक शिक्षण घेतलं. सार्वजनिक काम सुरू केलं. वृत्तपत्रे काढली. राजकीय आंदोलनात भाग घेऊ लागले. डाव्या, उजव्या, सुधारणावादी, काँग्रेसी अशा सर्व राजकारणामध्ये ब्राह्मण आघाडीवर होते.
 
यातले काही जण लोकशाहीची भाषा शिकत गेले. आरंभी टिळक आणि आगरकरांनी एकमेकांवर जहरी टीका केली. माळावरचा महारोगी वगैरे. नंतरच्या काळात मध्यममार्गी पक्षातील पुढाऱ्यांची भाषा सुधारली. उजव्या आणि हिंदुत्ववादी गटातील राजकारणी हे संभावित झाले. पण त्यांच्या परिवारातील भिडे यांच्यासारख्या कळपांच्या शिव्या उच्चनीच, कुळ-शील, लैंगिक संबंध याभोवतीच घोटाळत राहिलेल्या दिसतात.
 
‘सोबत’ नावाच्या साप्ताहिकात बाळ गांगल यांनी महात्मा फुले यांच्यावर बीभत्स टीका केली होती.
 
शिवाजीमहाराजांबाबत विचित्र माहिती पसरवण्याचा प्रकार जेम्स लेन प्रकरणातून बाहेर आला होता.
 
गेल्या आठ-नऊ वर्षात पंडित नेहरू, सोनिया गांधी, राहुल गांधी इत्यादींच्या खासगी आयुष्याबाबत सोशल मीडियावरून अत्यंत खोट्या कहाण्या प्रसारित करण्यात आल्या. यासाठी अनेक गट कार्यरत आहेत.
 
हे गट आणि त्यांच्या या विशिष्ट शिव्या हे आपल्या देशातील राजकारणात हिंदुत्ववाद्यांच्या अशा गटांचं खास वैशिष्ट्य आहे.
 
हे कळप, त्यातले चेकाळणारे लोक आणि त्यांचे नेते प्रदीर्घ काळ मुख्य राजकारणाच्या परिघावर होते. सत्तेच्या संदर्भात बोलायचं तर विरोधात होते. संख्येच्या हिशेबात दुय्यम होते. आता मात्र ते सामाजिक आणि राजकीय सत्तेचे मुख्य कब्जेकरी (कब्जाधीश?) झाले आहेत.
 
चेकाळणारे लोक पूर्वी विखुरलेले होते. त्यांना अनुल्लेखाने मारले जाई व दुर्लक्ष केले जाई. आता परिस्थिती उलटली आहे. त्यांची एकगठ्ठा संख्या मोठी झाली आहे. त्यांना नेमका राजकीय आकार आला आहे. बांधणी घट्ट झाली आहे. सध्याच्या सत्तेचा ते मजबूत पाया ठरले आहेत.
 
वर दिलेल्या जोग वा भोपटकर यांच्या उदाहरणांमधील चेकाळणारे लोक हे नगण्य होते. आज ते म्हणजेच मुख्य प्रवाह, मध्यवर्ती सत्ता सारे काही आहेत. इतक्या गदारोळानंतरही भिडे यांच्या सुखाने चालू असलेल्या सभा हा त्याचा ढळढळीत पुरावा आहे.
 
भिडे हे राजकारणी नाहीत असे त्यांचे भक्त म्हणतात. पण वास्तवात ते पूर्णवेळ राजकीय काम करणारे इसम आहेत. भारतीय जनता पक्षाचं राजकारण आमदार-खासदारांपुरतं मर्यादित नाही.
 
समाजात सर्व थरात हिंदुत्ववादाची लागण झाली पाहिजे आणि ती सतत पसरली पाहिजे ही त्याची इर्षा आहे. त्यासाठी अनेक संस्था-संघटना आणि व्यक्ती काम करतात. महाराष्ट्रात भिडे हे त्यापैकी एक आहेत. या लागणीचा प्रभाव कमी होऊ न देणे ही भिडे यांच्यावरची जबाबदारी आहे. ते ती पार पाडत आहेत.
 
महात्मा गांधी हे स्वातंत्र्यलढ्याचे निर्विवाद नेते होते. बहुसंख्य भारतीय त्यांच्यामागे होते. या बहुसंख्यांमध्ये बहुसंख्य हिंदू हेही आलेच. विनायक दामोदर सावरकर आणि तत्सम नेत्यांना अनेक प्रयत्नांनंतरही या हिंदूंना फितवता आलं नाही. गांधीजींबाबत संघ परिवार आणि भाजपला अनेक कारणावरून राग आहे. मात्र तेव्हा हिंदूंना आपण आपल्याकडे ओढू शकलो नाही हे त्यांना विशेष खटकतं. तो इतिहास बदलण्याचा परिवाराचा प्रयत्न आहे. सावरकरांची प्रतिमा उजळणे हा त्याचा एक भाग आहे. गांधीजींची बदनामी हा दुसरा.
 
गांधीजी किंवा अन्य नेत्यांचे विचार आणि लोकप्रियता संघाच्या विचारव्यूहाला अनेक रीतीनं भोकं पाडतात. त्यांना लोकांच्या मनातून नेस्तनाबूत करणे हे संघ संप्रदायासाठी तातडीचे आणि महत्वाचं ठरतं. महात्मा फुले ते महात्मा गांधी ते नेहरू ते अगदी नरेंद्र दाभोलकर असे कोणीही नेते या संप्रदायाला धोकादायक वाटतात.
 
मध्यवर्ती सत्तेतील भाजपचे नेते थेटपणे या नेत्यांवर हल्ले करू शकत नाहीत. भिडे आणि त्यांचा कळप हे काम करतात. हिंदुत्ववादी रचनेत एकदम तळाला राहून ते भाजपला अनुकूल अशी मतं आणि मतदार घडवतात.
 
भाजपचे वरच्या स्तरावरचे नेते आज गांधीजींचे नाव आदराने घेतात. उदाहरणार्थ नरेंद्र मोदी. यामुळे खालच्या मतदारांमध्ये गोंधळ निर्माण होण्याची शक्यता असते. आपण ज्यांचा द्वेष करतो त्यांनाच हे नमस्कार कसा करतात, यात काही दुटप्पीपणा आहे की काय असे त्यांना वाटू शकतं.
 
त्यासाठी भिडे उपयोगी पडतात.
 
भिडे हे चप्पल न घालता सर्वत्र फिरतात. ब्रह्मचारी आहेत. राजकीय पक्षात नाहीत. कोणत्याही पदाची इच्छा नाही. त्यामुळे त्यांच्या कोणत्याही बोलण्याला तत्वाचं वलय प्राप्त होतं. ते जर गांधी वा फुल्यांचा द्वेष करायला सांगत असतील तर तो बरोबरच असणार असं वातावरण तयार होतं.
 
मोदींसारखी आपली नेतेमंडळी गांधींना वरवरचा नमस्कार करतात ती लबाडी नसून नाइलाजाने करावी लागणारी राजकीय तडजोड आहे, अशी खात्री पटवण्यासाठी ‘शुध्द चारित्र्या’च्या भिडे यांचा आधार महत्त्वाचा ठरतो.
 
अलिकडेच भिडे यांनी पंधरा ऑगस्टला काळा दिवस पाळा वगैरे आवाहन केलं. त्या दिवशी भगवा ध्वज फडकवा असेही ते म्हणाले. तिरंगाही छोटासा कुठेतरी असू दे कोपऱ्यात नावापुरता, अशी पुस्ती त्यांनी जोडली. हे एक प्रकारे राजकीय तडजोडींचं प्रशिक्षणच म्हणता येतं.
 
भिडे यांच्यासारखे लोक भाजप आणि सामान्य मतदार यांच्यातला कळीचा दुवा असतात.
 
नोटबंदीतील फरफट, रफालचे आरोप, अदानींचा कथित घोटाळा, कोरोनातील मृत्यू अशी अनेक संकटं गेल्या सात-आठ वर्षात उभी राहिली. तरीही नरेंद्र मोदींची लोकप्रियता हललेली नाही. त्याचे रहस्य भिडे यांच्यासारख्या दुव्यांमध्ये आहे. ते अतूट निष्ठेचा मतदार घडवतात.
 
भिडे यांचं भाजप व्यवस्थेतलं हे स्थान लक्षात घेतलं की त्यांच्यावर कारवाई होणं का कठीण आहे हे समजू शकतं. विरोधकांच्या दडपणामुळे उद्या ती समजा झालीच तरीही त्यात अनेक पळवाटा ठेवल्या जातील. केस कच्ची ठेवली जाईल. शिवाय, ही राजकीय तडजोड असल्याचे भाजपच्या मतदारांना आधीच ठाऊक असेल. त्यामुळे त्यांच्यावर या सर्वांचा फार परिणाम होणार नाही.
 
केस कच्ची राहण्यासाठी भिडे यांनीही खबरदारी घेतली आहेच. आता त्या सभेचा व्हीडिओ समोर आला आहे. त्यात गांधीजींच्या बदनामीचा मजकूर एका पुस्तकातील आहे. भिडे एका कार्यकर्त्याला पुढे करून तो वाचून घेत आहेत. मधून मधून ते फक्त त्यावर मल्लिनाथी करीत आहेत. म्हणजे गांधीजींचा बाप मुस्लिम वगैरे गोष्टी भिडे यांनी स्वतः कोठेही उच्चारलेल्या दिसत नाहीत. हा व्हीडिओ जर खरा असेल तर या सर्वांचं नियोजन किती बारकाईने केलं जातं हे लक्षात यावं.
 
Published By- Priya Dixit 
 
 

वेबदुनिया वर वाचा

संबंधित माहिती