करमचंद गांधी हे मोहनदास यांचे वडील नसून एक मुस्लीम जमीनदार त्यांचे खरे वडील होते, असं वादग्रस्त वक्तव्य शिवप्रतिष्ठान हिंदुस्थान संस्थेचे प्रमुख मनोहर ऊर्फ संभाजी भिडे यांनी केलं आहे. संभाजी भिडेंच्या या वक्तव्यावरून राज्यातलं वातावरण तापलं आहे. भिडेंच्या वक्तव्यामुळे शुक्रवारी (२८ जुलै) विधानसभेत विरोधी पक्षातील नेते आक्रमक झाल्याचं पाहायला मिळालं. माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांनी संभाजी भिडे यांच्या अटकेची मागणी केली आहे.
दरम्यान, काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी संभाजी भिडे हे भाजपाचं पिल्लू असल्याचं म्हटलं आहे. यावर आता भाजपा प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांनी प्रतिक्रिया दिली आहे. बावनकुळे म्हणाले, संभाजी भिंडे यांचं जे काही वादग्रस्त वक्तव्य असेल ते सरकार तपासून बघेल. संभांजी भिडेंचा आणि आमचा संबंध नाही. संभाजी भिडे हे स्वतंत्र व्यक्तिमत्व आहे. ते आमच्या पक्षाचे कार्यकर्ते थोडी आहेत. त्यांनी काही आक्षेपार्ह वक्तव्य केलं असेल तर ते सरकार तपासेल. त्यावर सरकारला वाटेल तो निर्णय घेतला जाईल.