संभाजी भिडे ही विकृती आहे' - बाळासाहेब थोरात

शुक्रवार, 28 जुलै 2023 (15:33 IST)
शिवप्रतिष्ठानचे प्रमुख संभाजी भिडे यांनी पुन्हा एकदा वादग्रस्त विधान केलंय. यावेळी त्यांनी महात्मा गांधीजींबद्दल आक्षेपार्ह विधान केल्यानं वाद झालाय.
या वादाचे पडसाद महाराष्ट्राच्या विधिमंडळातही उमटल्याचे दिसले. काँग्रेस नेते आणि माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांनी संभाजी भिडेंच्या वक्तव्याचा मुद्दा उपस्थित करत त्यांच्यावर कारवाईची मागणी केली.
 
यानंतर काँग्रेसचे नेते बाळासाहेब थोरात आणि यशोमती ठाकूर यांनीही या मुद्द्यावर आक्रमक भूमिका घेतल्या.
 
काँग्रेस नेत्या आणि माजी मंत्री यशोमती ठाकूर म्हणाल्या की, "अमरावतीमध्ये शिवप्रतिष्ठानच्या मार्फत युवकांचे कान भरून अशांतता निर्माण करण्याचा कार्यक्रम संभाजी भिंडेंनी घेतलाय. संभाजी भिडेंना एवढी मुभा का आहे?"
 
"संभाजी भिडे म्हणतात की, महात्मा गांधींचे पूर्ण नाव मोहनदास करमचंद गांधी असे सांगितले जाते. ते पुढे म्हणतात की, हे करमचंद गांधी वेगळ्या समाजाचे होते. ते मुस्लिम समाजाचे होते. या दोन समाजात जाती तंटा वाढवण्याचे काम हे संभाजी भिडे करतायेत."
 
ठाकूर पुढे म्हणाल्या की, "देशाचे राष्ट्रपिता असलेल्या महात्मा गांधींबद्दल संभाजी भिडे असं बोलत असतील, तर आपलं सरकार, गृहमंत्री त्यांच्यावर कारवाई का करत नाही? पृथ्वीराज चव्हाणांनी हा विषय विधिमंडळात उपस्थित केल्यानंतरही सरकारनं त्यावर उत्तर दिले नाही," असं म्हणत यशोमती ठाकूर यांनी इशारा दिला की, "असला प्रकार पुन्हा अमरावती किंवा महाराष्ट्रात झाल्यास आम्हाला सहन होणार नाही. मग त्याचे परिणाम काय होतील, हे सरकारनं मोजावेत."
 
संभाजी भिडे हे दंगली पसरवण्यासाठी असे करतात आणि सरकारचा त्यांना पाठिंबा आहे, असंही यशोमती ठाकूर म्हणाल्या.
 
संभाजी भिडे ही विकृती आहे - बाळासाहेब थोरात
तर, काँग्रेस नेते बाळासाहेब थोरात म्हणाले की, "संभाजी भिडे नावाचा इसम राष्ट्रपित्यावर टीकाटिप्पणी करतो, संपूर्ण देशासाठी लाजिरवाणी गोष्ट आहे सरकारने त्याचा आजच बंदोबस्त करावा आणि त्या संदर्भात सभागृहात निवेदन करावे."
 
थोरात म्हणाले, "संभाजी भिडे ही विकृती आहे. त्यांनी देशाचे राष्ट्रपिता महात्मा गांधी यांच्या संदर्भात अत्यंत अवमानकारक विधान केलं आहे जे समग्र देशासाठी अत्यंत अस्वस्थ करणारे आहे.
 
संभाजी भिडे वारंवार असं बोलतो, त्याला पाठीशी नेमका कोण घालतो याचा शोध घेणे आवश्यक आहे. संभाजी भिडे यांचा हेतू महाराष्ट्राचे वातावरण अस्थिर करण्याचा आहे हे ओळखले पाहिजे. कोणाच्या राजकीय फायद्यासाठी तो वारंवार अशी विधाने करतो? आम्ही सभागृहात संभाजी भिडेवर कठोर कारवाई करण्याची मागणी केली आहे. सरकारने आजच या विषयावर कारवाई करावी आणि सभागृहाला सूचित करावे. अन्यथा आम्ही शांत बसणार नाही."
 
थोरात पुढे म्हणाले की, "पुरोगामी विचार संपवण्यासाठी एक यंत्रणा काम करते, असे आमचे स्पष्ट मत आहे. महापुरुष हे सर्वकालीन असतात, त्यांच्या विचारांचे आणि कृतीचे समाजाच्या उभारणीत मोठे योगदान असते.
 
असे असताना हा सततचा खोडसाळपणा सरकारने सहन करू नये. कालही आम्ही क्रांतिज्योती सावित्रीमाई फुले यांच्यासंदर्भात बदनामीकारक लिखाण करणाऱ्यावर कारवाईची मागणी केली होती."
 
थोरात यांनी सरकारवर आरोप करताना सांगितलं, "एकूणच या संपूर्ण प्रकरणात सरकार गंभीर दिसत नाही. भिडे सारख्या विकृतीवर वेळीच कारवाई केली तर सरकारचा हेतू शुद्ध आहे असे म्हटले जाईल."
 
कोण आहेत संभाजी भिडे?
मनोहर असं मूळ नाव असलेले भिडे सांगलीत राहतात. सातारा जिल्ह्यातील सबनीसवाडी हे त्यांच मूळ गाव.
 
राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे सांगलीतले तत्कालीन प्रमुख कार्यकर्ते बाबाराव भिडे यांचे ते पुतणे.
 
संभाजी भिडे 1980च्या दशकात 'राष्ट्रीय स्वयंसेवक संघा'त कार्यरत होते, असं सांगलीतले ज्येष्ठ पत्रकार गणेश जोशी सांगतात.
 
संघाशी वाद झाल्यानंतर त्यांनी सांगलीमध्ये प्रतिसंघाची स्थापना केली होती. 1984 मध्ये संभाजी भिडे यांनी श्री शिव प्रतिष्ठानची स्थापना केली.
 
"बाबरी मशीद आणि रामजन्मभूमी वाद उफाळला होता तेव्हा भिडे यांच्या 'श्री शिवप्रतिष्ठान हिंदुस्थान' या संघटनेला चांगला प्रतिसाद मिळू लागला. छत्रपती शिवाजी महाराज आणि छत्रपती संभाजी महाराज यांचा हिंदुत्ववादी संघटनांना अभिप्रेत असलेला इतिहास ते सांगतात," असंही जोशी सांगतात.
 
'हिंदू समाजाची उगवती तरुण पिढी शिवाजी, संभाजी रक्तगटाची बनवणे हेच श्री शिवप्रतिष्ठान हिंदुस्थानचे ध्येय आहे,' असं श्री शिवप्रतिष्ठान हिंदुस्थानच्या वेबसाईटवर म्हटलं आहे.
 
शिवप्रतिष्ठानने रायगडावर 32 मण वजनाचं सोन्याचं सिंहासन बसवण्याचा संकल्प केला आहे.
 
1 जानेवारी 2018 रोजी भीमा कोरेगावमध्ये झालेल्या हिंसाचार प्रकरणात भिडे यांच्याबरोबरच हिंदू एकता आघाडीचे मिलिंद एकबोटे, यांच्यावर पुण्यातल्या पिंपरी पोलिस स्टेशनमध्ये गुन्हा दाखल करण्यात आला होता. यामुळेच संभाजी भिडे यांचं नाव चर्चेत आलं.
 


Published By- Priya Dixit 
 
 
 

वेबदुनिया वर वाचा

संबंधित माहिती