फडणवीस, महाजनांच्या मनात नाथाभाऊंविषयी कटुता नाही : खा. रक्षा खडसे

गुरूवार, 3 जून 2021 (07:47 IST)
राजकारणात कोणीच कोणाचा वैयक्तिक शत्रू नसतो. राजकारणात केवळ वैचारिक विरोध केला जातो. त्यामुळे विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस आणि आमदार गिरीश महाजन यांच्या मनात राष्ट्रवादीचे नेते एकनाथ खडसे यांच्याविषयी कटुता नाही, असं सांगतानाच फडणवीस यांच्या भेटीचा कोणताही राजकीय अर्थ काढू नये, असं आवाहन भाजपच्या खासदार रक्षा खडसे यांनी केलं आहे.
 
विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी मुक्ताईनगरमध्ये रक्षा खडसे यांच्या घरी जाऊन त्यांची भेट घेतली होती. फडणवीस यांच्या या भेटीने अनेक तर्कवितर्क वर्तवण्यात येत होते. या पार्श्वभूमीवर रक्षा खडसे यांनी हा खुलासा केला आहे. राजकारणात वैचारिक विरोध केला जातो. पण कोणीच कुणाचा वैयक्तिक शत्रूही नसतो. नाथाभाऊंचे सर्वांशी चांगले संबंध आहेत. नाथाभाऊंनीही कधी कुणाच्या बद्दल मनात द्वेष ठेवला नाही. राजकीय प्रतिक्रिया द्यायची असते, ती दिली जाते. पण कुणाबद्दल कधीच वैयक्तिक द्वेष नसतो. त्यामुळे देवेंद्र फडणवीस आणि गिरीश महाजन यांच्या मनातही नाथाभाऊंबद्दल कोणताही कटुता नाही, असं रक्षा खडसे म्हणाल्या.
 
एखादा राजकीय नेता जेव्हा मुक्ताईनगरमध्ये येतो, तेव्हा नाथाभाऊ त्या नेत्याला चहापानासाठी घरी बोलवत असतात. पक्षनेते आपल्या मतदारसंघात आल्यानंतर त्यांना घरी येण्याचं आमंत्रण देणं हे आपलं कर्तव्य असतं. त्यामुळे फडणवीस आपल्या घरी आले. त्याविषयी नाहक तर्कवितर्क काढले जात आहेत, असं त्यांनी सांगितलं. काही वृत्तवाहिन्यांवर घरातील वैयक्तिक स्मृतीचिन्हे दाखवून राजकारण करण्याचा प्रयत्न केला जात आहे. ते चुकीचं आहे. राजकारणात अनेक श्रद्धास्थाने असतात. त्यामुळे घरातील अशा गोष्टी दाखवून विरोधाभास निर्माण करणं चुकीचं आहे, असंही त्या म्हणाल्या.
 
नाथाभाऊंनी भाजपमध्ये अनेक वर्षे काम केलं आहे. त्यामुळे त्यांच्या मनात भाजपविषयी आदरच आहे. फडणवीस आणि महाजनही अनेक वर्षे नाथाभाऊंसोबत होते. परंतु काही कारणास्तव नाथाभाऊंनी पक्ष सोडला. मात्र, माझ्या इच्छेनुसार त्यांनी मला भाजपमध्येच राहण्याचा सल्ला दिला आहे. त्यामुळे या भेटीविषयी नाहक राजकारण करणं चुकीचं आहे, असं त्यांनी स्पष्ट केलं.

वेबदुनिया वर वाचा

संबंधित माहिती