देवेंद्र फडणवीसांनी घेतली शरद पवारांची भेट, भेटीचं नेमकं कारण काय?
सोमवार, 31 मे 2021 (16:03 IST)
राज्याचे विरोधी पक्षनेते आणि माजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सोमवारी (31 मे) सकाळी राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांची मुंबई येथील 'सिल्व्हर ओक' या त्यांच्या निवासस्थानी भेट घेतली आहे.
या दोन्ही नेत्यांमध्ये काही काळ चर्चा देखील झाल्याचे समोर आले आहे. यामुळे आता राजकीय वर्तुळात विविध चर्चा सुरू झाल्या आहेत. स्वतः फडणवीसांनी मात्र ही केवळ सदिच्छा भेट असल्याचं म्हटलं होतं.
देवेंद्र फडणवीस यांनी या भेटीचा फोटो ट्वीट करून, माहिती देताना म्हटलं, "माजी केंद्रीयमंत्री आणि ज्येष्ठ नेते शरद पवार यांची आज त्यांच्या मुंबई येथील निवासस्थानी सदिच्छा भेट घेतली."
शरद पवारांवर काही दिवसांपूर्वी शस्त्रक्रिया झाली आहे. यानंतर अनेक राजकीय नेत्यांनी त्यांची भेट घेत प्रकृतीची विचारपूस केली आहे. त्यामुळे आता फडणवीसांनी देखील त्याच कारणासाठी पवारांची भेट घेतली असल्याचं सांगितलं जात आहे.
राज्यात कोरोनाचं संकट, परीक्षांचं आयोजन, मराठा आरक्षण, तौक्ते चक्रीवादळामुळे झालेलं नुकसान अशा अनेक गोष्टी घडत आहेत. यासंदर्भात चर्चा झाली असण्याची शक्यता वर्तवली जात आहे.
दरम्यान, ओबीसींच्या राजकीय आरक्षणासंदर्भात दाखल करण्यात आलेल्या सर्व पुनर्विचार याचिका फेटाळून लावत सर्वोच्च न्यायालयाने आरक्षणाला स्थगिती दिली. न्यायालयाच्या या निकालानंतर विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी ठाकरे सरकारवर जोरदार टीका केली आहे.
महाराष्ट्रात ओबीसीसाठी राजकीय आरक्षण शिल्लक राहिलेलं नाही, असं सांगत फडणवीस यांनी आरक्षण कशाप्रकारे घालवलं हे समोर ठेवायचं असल्याचं सांगितलं. आरक्षण रद्द होण्यास राज्य सरकार कारणीभूत असल्याचंही त्यांनी म्हटलं आहे. ते मुंबईत पत्रकार परिषदेत बोलत होते.
महाविकास आघाडीचं सरकार स्थापन होण्यापूर्वी देवेंद्र फडणवीस यांनी राष्ट्रवादीचे नेते अजित पवार यांच्या बरोबरीने शपथ घेतली होती. मात्र पुरेशा आमदारांच्या संख्याबळाअभावी हे सरकार काही तासांतच कोसळलं.
देवेंद्र यांनी मुख्यमंत्री म्हणून तर अजित पवार यांनी उपमुख्यमंत्री म्हणून शपथ घेतली होती. देवेंद्र आता विरोधी पक्षनेते आहेत तर अजित पवार हे महाविकास आघाडी सरकारमध्येही उपमुख्यमंत्री म्हणून काम करत आहेत.