ज्याला वाईन घ्यायची आहे तो कुठेही जाऊन घेणारच आहे : भुजबळ

सोमवार, 31 जानेवारी 2022 (08:28 IST)
महाविकास आघाडी सरकारने राज्यात सुपरमार्केटमध्ये वाईन विकण्याची परवानगी देण्याचा निर्णय घेतला आहे.  महाविकास आघाडी सरकारविरोधात विरोधी पक्षांकडून टीका करण्यात येत असताना महाविकास आघाडीमधील मंत्री आणि राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते छगन भुजबळ यांनी राज्य सरकारच्या वाईन विक्री करण्याच्या निर्णयाचे समर्थन केल आहे. ज्याला घ्यायची आहे तो कुठेही जाऊन घेणारच आहे असे विधान अन्न व नागरी पुरवठा मंत्री छगन भुजबळ यांनी केलं आहे.
 
राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते आणि अन्न व नागरी पुरवठा मंत्री छगन भुजबळ यांनी नाशिकमध्ये माध्यमांशी संवाद साधताना वाईन विक्रीचे समर्थन केलं आहे. भुजबळांनी भाजपवर निशाणा साधत असताना म्हटलं आहे की, मध्य प्रदेशात भाजप सरकारने मोठ्या प्रमाणावर मद्य साठवण्याची परवानगी दिली आहे. तसेच बारसुद्धा उघडण्याची परवानगी दिली असल्याचे भुजबळांनी सांगितले आहे.
 
दरम्यान छगन भुजबळ पुढे म्हणाले की, अख्ख्या जगाने वाईनला हेल्थ फूड म्हणून मंजुरी दिली आहे. या निर्णयामुळे शेतकऱ्यांना फायदा होईल. ज्याला घ्यायची आहे, तो कुठेही जाऊन घेणारच आहे. उगीच साप साप म्हणून भुई थोपटण्याचे काम आहे. उगच काहीतरी विषय काढून त्यांच्यावर आंदोलन करायचे हे बरोबर नाही असे छगन भुजबळ म्हणाले आहेत.
 

वेबदुनिया वर वाचा

संबंधित माहिती