लोकांनी साथ दिली तर काहीही होऊ शकतं. अशीच साथ गृहनिर्माण मंत्री जितेंद्र आव्हाड यांना द्या, असं आवाहन राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते शरद पवार यांनी केलं. यावेळी त्यांनी तुमचा हा प्रतिनिधी महाराष्ट्राचा चेहार बदलेल, अशी मला खात्री आहे, असंही सांगितलं. ते ठाण्यात जितेंद्र आव्हाड आणि त्यांची पत्नी ऋता आव्हाड यांच्या जाहीर नागरी सत्काराच्या कार्यक्रमात बोलत होते .
शरद पवार म्हणाले, “जिथं कर्तुत्व असतं, त्या कर्तुत्वाला प्रोत्साहित करण्याची भूमिका घेतली, तर समाजातील प्रश्नाची सोडवणूक करणारं नेतृत्व उभं राहू शकतं. जितेंद्र आव्हाड यांनी संपूर्ण महाराष्ट्राला हे दाखवून दिलं आहे. मागील अनेक वर्षे ठाण्याच्याच नव्हे, तर महाराष्ट्राच्या सामाजिक जीवनात जे योग्य असेल त्याचा आव्हाड यांनी नेहमीच पुरस्कार केला. यातून स्वतःचं एक स्थानही त्यांनी प्रस्थापित केलं.”