श्रीकाकुलम : स्टेट बँकेतून 7 किलो सोनं गायब कसं झालं? तारण ठेवलेलं सोन हरवलं तर काय करायचं?

सोमवार, 11 डिसेंबर 2023 (19:59 IST)
आंध्र प्रदेशातल्या श्रीकाकुलममधल्या गारा मंडळ इथल्या स्टेट बँक ऑफ इंडिया (एसबीआय) शाखेतून सात किलो सोनं गायब झालं होतं.हे सोनं बँकेच्या ग्राहकांनी कर्जाच्या बदल्यात तारण ठेवलं होतं.
 
कर्जाचे हफ्ते पूर्ण भरून, तसंच वारंवार विचारणा करूनही सोनं परत मिळत नसल्याने बँकेच्या ग्राहकांनी तक्रार केली आणि त्यातून समोर आला एक नवा फ्रॉड.
या प्रकरणी बँकेच्या उपव्यवस्थापक असलेल्या स्वप्नप्रिया यांनी आत्महत्याही केली. त्यानंतर हे प्रकरण आणखी मोठं झालं. या प्रकरणी सात लोकांना अटक झाली आहे.
 
नक्की काय घडलं?
श्रीकाकुलम जिल्ह्यातल्या गारा गावात असणाऱ्या एसबीआयच्या शाखेत एकूण 2400 ग्राहक आहेत. त्यातल्या अनेकांना आपलं सोनं तारण ठेवून कर्ज घेतलेलं आहे. पण कर्जाचे हफ्ते पूर्ण भरूनही त्यांना आपलं सोनं परत मिळत नसल्याने ग्राहकांना संशय आला.
 
त्यांनी बँकेच्या बाहेर आपलं सोनं परत मिळावं म्हणून आंदोलनही केलं.
 
बँकेच्या अधिकाऱ्यांकडून त्यांना सांगण्यात आलं की काही तांत्रिक कारणांमुळे त्यांना त्यांचं सोनं परत मिळत नाहीये. ग्राहकांनी दुसऱ्यांदा मागणी केली तेव्हा सांगण्यात आलं की बँकेच्या शाखेचं ऑडिट होतंय म्हणून सोनं परत करण्यात विलंब होत आहे.
 
त्यामुळे ग्राहकांनी पोलिसात धाव घेतली.
 
पोलिसांनी तक्रार दाखल केली आणि तपासाअंती झाल्या प्रकरणाचा उलगडा केला. पोलीस अधीक्षक राधिका यांनी याबद्दल खालील माहिती दिली.
 
स्वप्नप्रिया ही महिला गारा शाखेत उपव्यवस्थापक होती. तिचा भाऊ किरण बाबू तिथेच काम करायचा. त्याने जमिनीच्या व्यवहारात, तांदळाच्या व्यापारात तसंच शेअर मार्कटमध्ये पैसा गुंतवला. पण त्याचं नुकसान झालं आणि त्याने गुंतवलेले पैसे गमावले.
 
हे पैसे परत मिळवण्यासाठी त्यांनी बँकेच घोटाळा करायला सुरुवात केली. या एसबीआय शाखेच्या ग्राहकांनी तारण ठेवलेलं सोनं किरण बाबू त्याचा साथीदार तिरूमला राव याच्यासह दुसऱ्या बँकेत तारण ठेवायचा आणि त्यावर कर्ज घ्यायचा.
 
श्रीकाकुलमच्या वेगवेगळ्या शाखांमध्ये वेगवेगवेळ्या लोकांच्या नावांनी सोन तारण ठेवून कर्ज घेतलं गेलं.
 
जर कोणी ग्राहक आपलं सोनं घ्यायला आला तर ते त्याला तांत्रिक कारणांनी सोनं देता येत नाही, असं सांगून परत पाठवायचे. हा प्रकार सुमारे वर्षभर सुरू होता.
अखेरीस ग्राहकांची तक्रार केल्यानंतर ही चोरी उघडकीस आली. यानंतर स्वप्नप्रिया यांनी आत्महत्या केली. पण तिरूमला राव, किरण बाबूसह सात आरोपींना पोलिसांनी अटक केली. त्यांच्याकडून 7 किलो 195 ग्राम सोनं हस्तगत करण्यात आलं.
 
पोलीस अधिकारी राधिका यांनी सांगितलं की, “कायदेशीर कारवाई पूर्ण झाली की हे सोनं बँकेच्या ताब्यात देण्यात येईल. त्यानंतर ग्राहक आपली कागदपत्रं दाखवून तसंच आपलं कर्ज चुकवून सोनं घेऊन जाऊ शकतात.”
 
बँकेकडून सोनं हरवलं तर जबाबदारी कोणाची?
जर बँकेत तारण ठेवलेलं सोन चोरी झालं किंवा हरवलं तर जबाबदारी कोणाची असते? ग्राहकांचे काय अधिकार आहेत याबद्दल आंध्र प्रदेश ग्रामीण विकास बँकेचे निवृत्त व्यवस्थापक केव्ही जगन्नाथ राव यांनी बीबीसी तेलुगूशी चर्चा केली.
 
तारण ठेवलेलं सोनं बँकेकडून गहाळ झालं तर बँक त्या सोन्याच्या किंमतीएवढे पैसे देऊ करते. पण अनेकदा ग्राहक याला विरोध करतात आणि आपले दागिनेच परत मागतात कारण त्यात त्यांच्या भावना गुंतलेल्या असतात.
 
अशा परिस्थितीबदद्ल बोलताना जगन्नाथ राव म्हणतात, “बँकेची जबाबदारी आहे की गहाण ठेवलेले दागिने किंवा सोनंच परत दिलं पाहिजे. बँकेच्या रेकॉर्डमध्ये याची नोंद असते. त्याचं वजन लिहिलेलं असतं. त्या दागिन्यंच वर्णन असतं. तेच दागिने बँकेने परत दिले पाहिजेत. त्या बदल्यात बँक पैसे देऊ करत असेल तर त्यांच्यावर गुन्हा दाखल झाला पाहिजे. ते दागिने हरवले जरी तरी ते शोधून ग्राहकांना परत करण्याची जबाबदारी बँकेची आहे.”
 
बँकांचा सरसकट इन्शुरन्स असतो. तो ठेवी, दागिने आणि इतर मौल्यवान गोष्टींना लागू असतो त्यामुळे बँकेच्या ग्राहकांना काळजी करण्याचं कारण नाही असं जगन्नाथ राव म्हणतात.
 
जर बँकेत ठेवलेले दागिने किंवा सोनं चोरीला गेलं असेल आणि ग्राहकाने बँकेचं कर्ज फेडलं तर त्यांनी त्याची ताबडतोब पावती घ्यायला हवी. बँकेचे कर्मचारी कर्ज फेडलं गेल्याचं पत्र देतात. ती पावती आणि ते पत्र सांभाळून ठेवा.
 
जर तुम्ही कर्ज फेडल्यानंतर तुम्हाला लगेचच तुमचे दागिने किंवा सोनं मिळालं नाही, तर ते जेवढ्या काळाने मिळेल तेवढ्या कालावधीचं व्याज तुम्हाला मिळतं.
 
बँक फ्रॉड कसा ओळखावा ?
याबद्दलही जगन्नाथ राव मार्गदर्शन करतात. ते म्हणतात, एखाद्या बँकेत घोटाळा होतोय की नाही हे ओळखण्याची काही मार्ग आहेत. ते असे
 
1) जर बँकेतले कर्मचारी कधीच सुट्टी घेत नसतील तर त्यांच्यावर संशय घ्यायला हवा, सरकारी सुट्टीच्या दिवशी बँक सुरू असेल संशयास्पद आहे. कारण जेव्हा बँकेचे कर्मचारी सुट्टीवर जातात तेव्हा त्यांच्याकडचा कार्यभार दुसऱ्या व्यक्तीकडे जातो.
 
ठेवींची मोजदाद होते, सोन्याची मोजदाद होते, त्याची पडताळणी होते. दुसरा व्यक्ती सगळं तपासतो. जर एखाद्या कर्मचारी दुसऱ्या कर्मचाऱ्याला ही माहिती देत नसेल किंवा कधीच सुटी घेत नसेल तर काहीतरी गौडबंगाल असू शकतं.
 
2) दुसरं म्हणजे कर्मचारी काही संशयास्पद व्यवहार करताना दिसून आले तर त्याची नोंद व्हायला हवी. ही जबाबदारी बँकेचे व्यवस्थापक आणि प्रादेशिक व्यवस्थापक यांची आहे. कोण कर्मचाऱ्याच्या आर्थिक परिस्थितीत एकदम फरक पडला तर त्यांच्यावर लक्ष ठेवायला हवे. तसंच कर्मचारी त्यांच्या पगारापेक्षा किंवा ऐपतीपेक्षा महागड्या वस्तू घेत असतील तर त्यांनी बँक मॅनेजरची परवानगी घ्यायला हवी. जर ते असं करत नसतील तर संशयाला जागा आहे असं समजावे.
 
3) बँकेच्या इतर शाखेतल्या अधिकाऱ्यांनी येऊन बँकेचं वारंवार ऑडिट करायला हवं. यामुळे चुका निदर्शनास येतात आणि जर काही घोटाळा होत असेल तर लगेचच लक्षात येतो.
 
4) बँकेच्या कर्मचाऱ्यांच्या जबाबदाऱ्या सतत बदलत राहिल्या पाहिजेत. उदाहरणार्थ - फिल्ड ऑफिसरला काही काळ अकाऊंटटचं काम दिलं पाहिजे, आणि अकाउंटटला फिल्ड ऑफिसरचं. यामुळे कर्मचाऱ्यांना सगळी कामं करण्याचा अनुभव येईल आणि कोणी कुठे चुकत असेल तर ते दुरुस्त करता येईल.
 
तारण ठेवलेल्या दागिन्यांबद्दल RBI चे काय नियम आहेत?
जगन्नाथ राव म्हणतात की, प्रत्येक बँकेचे रिझर्व्ह बँकेचे नियम पाळले पाहिजेत. रिझर्व्ह बँक इतर बँका आणि त्यांचे ग्राहक दोघांचंही नुकसान होऊ नये यासाठी कार्यरत असते.
 
तारण ठेवलेले दागिने बँकेतच ठेवायला हवेत. ते कधीच बँकेच्या परिघाबाहेर जायला नको. दागिने बँकेत असेपर्यंतच त्यांनास इन्शुरन्सचं कव्हर असतं. जर ते बँकेच्या बाहेर असतील तर इन्शुरन्स भरपाई मिळणार नाही.
 
मणप्पुरम गोल्ड लोन आणि मुथुट फायनान्स यांच्या नावाखाली घोटाळे होत आहेत. त्यामुळे ग्राहकांनी सतर्क राहायला हवं.
 
बँकांनी तसंच सोन्यावर कर्ज देणाऱ्या खाजगी कंपन्यांनी आपल्या कर्मचाऱ्यावर लक्ष ठेवलं पाहिजे. तसंच आपल्याकडे येणाऱ्या ग्राहकांवरही लक्ष ठेवलं पाहिजे.
 
जर एखादी व्यक्ती सतत सोनं तारण ठेवण्यासाठी येत असेल तर ते संशयास्पद आहे. त्या व्यक्तीची चौकशी झाली पाहिजे.
 
Published By- Priya Dixit 
 
 
 
 
 

वेबदुनिया वर वाचा

संबंधित माहिती