पती-पत्नीच्या भांडणात ही 6 वाक्यं आली तर काय कराल? वाचा

रविवार, 6 ऑगस्ट 2023 (10:54 IST)
पती-पत्नीच्या नात्यात चढउतार येत असतात. त्यांच्यामध्ये कधी भांडणही होण्याची शक्यता असते. परंतु या भांडणांचा सूर जर वेगळ्याच वळणावर गेला तर त्याचा नात्यावर, दोघांच्या मनावर, मुलांच्या मनावर खोल परिणाम होऊ शकतो.
 
या भांडणांसाठी अनेक गोष्टी, व्यक्तीही कारणीभूत असू शकतात. या दोघांवर इतरही व्यक्ती प्रभाव टाकत असू शकतात. त्यामुळे भांडणात चुकीचे शब्द, अयोग्य भावना, राग व्यक्त होतो. मात्र नंतर त्याचा दीर्घकाळ परिणाम भोगावा लागतो. त्यामुळे अशावेळेस कशी भूमिका घ्यायची ते येथे पाहू.
 
गॅसलायटिंग म्हणजे समोरच्या माणसाला आपल्या मनासारखं वाकवण्याचं तंत्र. त्याला आपल्याच मतानुसार वागायला भाग पाडणं.
 
अमेरिकन मेरियम-वेबस्टर डिक्शनरीने 'गॅसलायटिंग' हा 2022 या वर्षातील सर्वात प्रसिद्ध शब्द म्हणून घोषित केला आहे.
 
गॅसलायटिंग म्हणजे एखाद्या व्यक्तीचं केलं जाणारं मानसिक मॅनिप्युलेशन. यात दुसऱ्या व्यक्तीला स्वतःच्या मनाप्रमाणे वागायला भाग पाडलं जातं.
 
मेरियम-वेबस्टरनुसार एखाद्या व्यक्तीवर मानसिक ताबा मिळवण्यासाठी वापरले जाणारे तंत्र म्हणजे गॅसलायटिंग.
 
काहीजण इतरांकडून काहीतरी मिळवण्याच्या उद्देशाने त्याचा वापर करतात.
 
हार्वर्ड विद्यापीठातील मानसशास्त्रज्ञ डॉ. कार्टनी एस वॉरेन यांनी बीबीसी मुंडोशी बोलताना सांगितलं की, "हा मानवी स्वभाव आहे. काहीवेळा आपल्यासोबत हेराफेरी केली जाते आणि आपल्याला ते माहितही नसतं."
 
आणि विशेष म्हणजे हे तंत्र आपल्यावर वापरलं गेलंय याची आपल्याला माहितीच नसते. आणि हाच मोठा धोका आहे.
 
वॉरेन सांगतात, "जेव्हा एखादी व्यक्ती तुम्हाला असं काही बोलते ज्यामुळे तुम्हाला असुरक्षित किंवा अस्वस्थ वाटतं तेव्हा ती व्यक्ती आपल्यावर हे तंत्र वापरते आहे हे आपण ओळखायला हवं."
 
कोणीतरी वाईट म्हटल्यावर किंवा शेरेबाजी केल्यावर आपल्याला अस्वस्थ वाटू शकतं. अशा परिस्थितीला सामोरं जाताना संयम बाळगण्याचा सल्ला वॉरेन देतात.
तुम्हाला सर्वात जास्त त्रास कशामुळे होतो हे शोधा
वॉरन या गोष्टींना तीन भागात विभागतात. जागरूकता (जागरूकता वाढवणे), मूल्यांकन (त्याची तीव्रता समजून घेणे) आणि कृती (काय करावं).
 
त्या सांगतात की, गॅसलायटिंग सारखी परिस्थिती जेव्हा उद्भवते तेव्हा स्वतःला जाणून घेऊन स्वाभिमानाने प्रतिसाद देता आला पाहिजे.
 
वॉरन स्पष्ट करतात की, "तुम्हाला तुमचा दृष्टीकोन, तुमच्या भावना, तुमचे अनुभव, तुमचा भूतकाळ, तुमची पार्श्वभूमी यावर आधारित एखाद्या गोष्टीचा आदर करता आला पाहिजे. परंतु तुम्हाला त्याच गोष्टीच्या मर्यादा देखील जाणून घेता आल्या पाहिजेत."
 
पण हे वाटतं तितकं सोपं नाहीये. वादाच्या वेळी जर काही वाईट शब्द वापरले तर त्याला कसा प्रतिसाद द्यावा याविषयी बीबीसी मुंडोने एका मानसशास्त्रज्ञाशी चर्चा केली.
 
1. तू अतिसंवेदनशील आहेस...
हे खूप सामान्य आहे.
 
जर कोणी तुम्हाला संवेदनशील आहात असं म्हणत असेल आणि तुम्ही त्यावेळी भावनिक झालात तर तुम्हालाही तसंच वाटू शकतं. आणि यात काही अडचण देखील नाहीये.
 
पण या शब्दांमुळे तुम्हाला मदत मिळत नाही. कारण त्यांना त्यावेळी तुमच्या गरजा आणि भावनांची पर्वा नसते. तुमच्या भावनांमध्ये तथ्य असेल तरी त्या मारल्या जातात. कधीकधी तर त्यांच्याकडे यासाठी वाजवी कारणही नसतं.
 
मग तुम्ही याला उत्तर कसं द्याल?
 
"तू माझ्याविषयी खूप साऱ्या गोष्टींचा विचार करत आहेस, पण हे वास्तव आहे. मलाही तसंच वाटतं. मी तेच पाहिलं. यावर माझाही विश्वास आहे.''
 
"सध्या मला माझ्या भावनांविषयी चर्चा करायची नाहीये. मी तुझं ऐकेन. पण, मला वाटतं तू त्याचा आदर करायला हवास."
 
जर एखाद्या गोष्टीचा खरंच तुम्हाला त्रास होत असेल तर तो वाद तिथेच थांबवणं कधीही चांगलं.
 
तज्ज्ञ सुचवतात, "एक मिनिट थांबा, दीर्घ श्वास घ्या आणि ते बोला ज्यामुळे तुम्हाला त्रास होतोय."
 
2. मी चेष्टा करत होतो किंवा मी चेष्टा करत होते
एखादी मन दुखावणारी गोष्ट बोलल्यानंतर हे वाक्य बऱ्याचदा वापरलं जातं.
 
कधीकधी समोरची व्यक्ती तुम्हाला गृहीत धरून म्हणत असते की तू अशीच आहेस, तशीच आहेस, असाच आहेस, तसाच आहेस.
 
शिवाय यावरून लाजिरवाणे विनोद केले जातात. सुरुवातीला ते जाणीवपूर्वक आणि गंभीर होऊन तुमच्यावर टीका करतात आणि नंतर विनोद केला किंवा मी चेष्टेत बोलतोय/ बोलतेय असं म्हणून मोकळे होतात.
 
अशावेळी काय बोलायचं?
 
सर्वप्रथम हे लक्षात घेतलं पाहिजे की टिप्पण्या चेष्टेने केल्या जात नाहीत.
 
त्यावेळी तुम्ही स्पष्ट म्हटलं पाहिजे की, "तुला ही चेष्टा वाटते का?" पण ती चेष्टा नाहीये. यामुळे मला खूप वाईट वाटलंय."
 
3. तू मला ते करायला लावलंस/ तुझ्यामुळेच झालं
 
काही जण स्वतःच्या चुकांसाठी इतरांना दोष देतात आणि तेव्हा असे शब्द वापरतात.
 
जसं की, "मी तुझ्यावर ओरडलो कारण तू भांडलीस" किंवा "मी तुझ्यावर ओरडले कारण तू उशीरा आलास"
 
पण वॉरन सांगतात त्याप्रमाणे, इतर लोक काय वागतात यासाठी तुम्ही कारणीभूत नसता हे कायम लक्षात ठेवा.
 
हे शब्द खूप गंभीर आहेत. यात कोणत्या ना कोणत्या प्रकारे समोरच्या व्यक्तीला दोषी ठरवलं जाण्याची शक्यता असते.
 
नात्यात नेहमीच चढ-उतार येत असतात. पण या सगळ्यासाठी एकाच व्यक्तीला गृहीत धरणं किंवा दोष देणं योग्य नाही.
 
यावर तुम्ही कसं उत्तर द्याल?
 
जर कोणी तुम्हाला दोष देण्याचा प्रयत्न करत असेल तर त्याला हो म्हणा.
 
"तुला ते वाटतं, पण मला नाही."
 
"मी जे केलं ते तुला चांगलं वाटलं नसेल. पण तू जी प्रतिक्रिया दिलीस त्याला सर्वस्वी तू जबाबदार आहेस, मी नाही. तू काय करावं हे तुझ्यावर अवलंबून आहे, मला काही फरक पडत नाही.''
 
जर कोणी तुमच्यावर आरोप करत असेल की हे सगळं तुझ्यामुळे झालं आहे. तर तुम्ही त्याला मध्येच थांबवून म्हणू शकता की, "माझ्यामुळे हे लाजिरवाणं झालं ही असेल, मी त्याला जबाबदार असेन. पण या संपूर्ण घटनेत मी एकटीच जबाबदार नाही. यात तू ही तितकाच जबाबदार आहेस."
 
4. तुझं माझ्यावर खरंच प्रेम असेल तर तू हे करशील / तू मला हे करू देशील
आपल्या जोडीदाराने एखाद्या बरोबर बोलू नये यासाठी असे शब्द वापरले जातात. बऱ्याचदा ओपन रिलेशनशिपमध्ये हे जास्त ऐकायला मिळतं.
 
वॉरन सांगतात, "आपल्या जोडीदाराने इतर कोणासोबतही शारीरिक संबंध प्रस्थापित करू नये यासाठी असं म्हटलं जातं. ही एक गॅसलायटिंग परिस्थिती आहे. यातून तुम्हाला तुमच्या मर्यादा घालून देण्याचा प्रयत्न केला जातो."
 
यामुळे आपण जे करतोय ते कसं चुकीचं आहे ही भावना तुमच्या मनात येते. काहीवेळा तुम्हाला असं वाटू शकतं की तुम्ही तुमच्या जोडीदारासोबत खूप वाईट वागताय.
 
वॉरन स्पष्ट करतात की, "नात्यात देण्याची भावना असणं आवश्यक आहे. आपल्या सर्वांच्या गरजा वेगवेगळ्या असतात. यामुळे नातं निरोगी राहतं. पण जेव्हा तुम्ही तुमच्या जोडीदाराला 'तुझं माझ्यावर खरंच प्रेम असेल तर तू हे करशील' असं सांगण्याचा प्रयत्न करता तेव्हा तुम्ही त्याला बांधण्याचा प्रयत्न करता."
 
अशा वेळी काय म्हणाल?
 
"मी असं करण्याचा आणि तुझ्यावरच्या प्रेमाचा काहीच संबंध नाही. मला हे आवडणार नाही. मला माझ्या पद्धतीने जगायचं आहे."
 
"हे करणं माझ्यासाठी कठीण आहे. मी तुझ्यावर प्रेम करते/करतो, तू मला काहीही सांगू शकतोस/शकतेस. पण तू माझ्या वागण्यावर निर्बंध आणू शकत नाहीस. हे मला योग्य वाटत नाही, म्हणून मी ते करणार नाही."
 
5. तू सोडून सर्वजण सहमत आहेत
काहीजण स्वतःच्या मताचं समर्थन करण्यासाठी, दुसऱ्याला त्रासदायक व्यक्ती असल्याचं किंवा त्याच्यामुळे वाद होत असल्याचं म्हणतात.
 
अशावेळी ते सर्वांना एकत्र बोलवून तुमची दिशाभूल करण्याचा प्रयत्न करतात. अशांना गॅसलायटर म्हटलं जातं.
 
यात तुम्हाला इतरांपासून वेगळं करण्याचा, तोडण्याचा प्रयत्न केला जातो. तुम्हाला इतरांच्या मदतीची गरज आहे असं वाटण्यासाठी हे केलं जातं. पण हे खरं नाहीये.
 
या परिस्थितीत तुम्ही काय म्हणाल?
 
"तू इतरांबद्दल बोलण्याऐवजी स्वतःबद्दल बोललास/बोललीस तर मला आनंद होईल"
 
यात मूळ मुद्द्यावरून तुमचं लक्ष हटवून तुम्हाला दुसऱ्याच मुद्द्यावर बोलायला भाग पाडलं जातं.
 
6. खरी समस्या इथंच आहे
ही खरं तर एक क्लृप्ती आहे. यात असं म्हटलं जातं की, "मला माहित होतं तू याबद्दल बोलशील. पण, तो मुद्दा नाहीये. त्यामागे आणखी एक कारण आहे.''
 
यावर असं उत्तर द्या
 
आपण खरं तर मूळ मुद्द्याला हात घातला पाहिजे. आपण दुसऱ्या विषयावर न बोलता आहे मूळ विषयावर बोलूयात.
 
"मी कोणत्याही विषयावर बोलायला तयार आहे. पण सध्या जे समोर आहे त्यावर बोलूया."
 
किंवा "तो मुद्दा वेगळा आहे. तुला हवं असेल तर आपण त्यावरही बोलू. पण आता जी अडचण आहे त्यावर आधी बोलू."
 



Published By- Priya Dixit
 
 

वेबदुनिया वर वाचा

संबंधित माहिती