"माझ्या पक्षाचं नाव गोठवलं, चिन्ह गोठवलं आणि निवडणुकीच्या रिंगणातून पळ काढला. आपल्याला मनस्ताप द्यायचा, त्रास द्यायचा, शिवसेना संपवायची या हेतूने सगळं करण्यात आलं", असा आरोप शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी केला आहे. मंगळवारी बुलडाण्यातील शिवसैनिकांना संबोधित करताना ते बोलत होते.
उद्धव ठाकरे म्हणाले, "शिवसेनेचं धनुष्यबाण चिन्ह गोठवलं तरी मशाल घेऊन आपण पुढे जात आहोत. धनुष्यबाण रामाचा होता, त्या धनुष्यबाणाच्या मदतीनेच रावणाचा वध रामाने केला. आता अन्यायाला जाळणारी आणि अंधारात वाट दाखवणारी मशाल आपल्याकडे आहे ती घेऊन पुढे जात काम करू."
"पहिल्यात निवडणुकीत मशालीची ताकद दिसली. अंधेरीत पराभव दिसला म्हणून भाजपने माघार घेतली. त्यांना शिवसेना संपवायची होती. पण शिवसेना एक अंगार आहे. ती कधीच संपणार नाही. जिथे अंधार असेल तिथे आपली मशाल जाईल," असा विश्वास उद्धव ठाकरे यांनी व्यक्त केला. ही बातमी महाराष्ट्र टाईम्सने दिली.