आता राज्यात 'सीतरंग ' चक्रीवादळाचा धोका

बुधवार, 19 ऑक्टोबर 2022 (09:41 IST)
सध्या सर्वत्र परतीचा पाऊस सुरु असून राज्यात पावसाने हाहाकार माजला आहे. पावसामुळे पिकाचे मोठे नुकसान झाले आहे. यंदा ऐन दिवाळीत पूर्व महाराष्ट्रात मुसळधार पावसाची शक्यता हवामान खात्यानं वर्तवली आहे. राज्यातील काही भागात ऑरेंज अलर्ट जारी केला असून ऐन सणासुदीला 20  ते 21 ऑक्टोबर रोजी बंगालच्या उपसागरात सीतरंग नावाचा चक्रीवादळ  निर्माण होण्याची शक्यता हवामान खात्याकडून वर्तवण्यात आली आहे. येत्या 27 ऑक्टोबर पर्यंत मुसळधार पावसाची शक्यता हवामान खात्यानं वर्तवली आहे. 
 
हवामान विभागाकडून मिळालेल्या माहितीनुसार, मान्सूनचा कालावधी 10 दिवसांसाठी वाढवण्यात आला आहे. राज्यात बंगाल आणि अरबी समुद्रात कमी दाबाचा पट्टा निर्माण झाल्याने पावसाची स्थिती निर्माण झाली असून हा पाऊस 27 ऑक्टोबर पर्यंत कोसळणार असून ऑरेंज अलर्ट सांगण्यात आले आहे. तर काही भागात वादळी वाऱ्यांसह ढगांचा गडगडाटासह मुसळधार पावसाची शक्यता हवामान खात्याकडून वर्तवण्यात आली आहे. तर सिंधुदुर्ग जिल्ह्यात ऑरेंज अलर्टसह नागरिकांना सतर्कता बाळगण्यास सांगितले आहे. यंदा दिवाळीचा सण पावसाच्या सावटाखाली जाणार असल्याची शक्यता वर्तवली आहे. 
 
पुणे, नगर, सोलापूर, ठाणे, कोल्हापूर, बीड उस्मानाबाद या ठिकाणी मुसळधार पावसाची शक्यता वर्तवली आहे. परतीचा पाऊस यंदा लांबणीवर गेला असून राज्यात पावसामुळे पिकांचे नुकसान होत आहे. 
 
मुसळधार पावसामुळे अकोल्यातही मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे. बारामतीत पाऊस सुरू आहे. गोंदियात मुसळधार पावसामुळे भातशेतीचे मोठे नुकसान झाले आहे. उस्मानाबादच्या खेरमाळा येथे सोयाबीन पिकाचे नुकसान झाले आहे. त्याचप्रमाणे सोलापूरच्या परभणी, यवतमाळ आणि करमाळा येथेही मुसळधार पावसामुळे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे. 
 
Edited By- Priya Dixit 
 

वेबदुनिया वर वाचा

संबंधित माहिती