वसुबारसला गाई-वासराचे पूजन का केले जाते? कथा आणि महत्त्व जाणून घ्या
मंगळवार, 7 ऑक्टोबर 2025 (20:33 IST)
सर्वांचा आवडता असा सण दिवाळी काही दिवसातच सुरु होणार आहे. प्रत्येक जण दिवाळीची आतुरतेने वाट पाहत असतो. तसेच दिवाळीची सुरवात कराष्टमी पासून होते. व कराष्टमी नंतर येते वसुबारस. वसुबारस हे व्रत मुख्यतः महिला ठेवत असतात. आश्विन कृष्ण पक्षाच्या द्वादशीला गोवत्स द्वादशी साजरी करण्याची पद्धत आहे. वसुबारस या दिवशी गाई-वासराची पूजा केली जाते.
पुराणात गाईच्या प्रत्येक अंगात देवी-देवतांच्या स्थानाचे विस्तृत वर्णन आहे. पद्मपुराणानुसार चारही वेद गाईच्या मुखात वास करतात. त्याच्या शिंगांमध्ये भगवान शिव आणि विष्णू नेहमी वास करतात. गाईच्या पोटात कार्तिकेय, मस्तकात ब्रह्मा, कपाळात रुद्र, शिंगाच्या टोकावर इंद्र, दोन्ही कानात अश्विनीकुमार, डोळ्यात सूर्य आणि चंद्र, दातांमध्ये गरुड, जिभेत सरस्वती, सर्व गुद्द्वारात सर्व तीर्थक्षेत्रे, मूत्र स्थानात गंगाजी, रोम कूपांमध्ये ऋषी गण, पाठीमागे यमराज, दक्षिण पार्श्वमध्ये वरुण आणि कुबेर, वाम पार्श्वमध्ये पराक्रमी यक्ष, मुखात गंधर्व, नासिकेच्या अग्रभागी नाग, खुरांच्या मागच्या बाजूला अप्सरा स्थित आहे.
आटपाट नगर होतं. तिथं एक कुणब्याची म्हातारी होती. तिला एक सून होती. गाईगुरं होतीं. ढोरं म्हशी होत्या. गव्हाळीं, मुगाळीं वासरं होतीं.
एके दिवशीं काय झालं ? आश्विनमास आला. पहिल्या द्वादशीच्या दिवशीं म्हातारी सकाळीं उठली, शेतावर जाऊं लागली. सुनेला हांक मारली, मुली मुली इकडे ये ! सून आली, काय म्हणून म्हणाली. तशी म्हातारी म्हणाली, मी शेतावर जातें. दुपारीं येईन. तूं माडीवर जा, गव्हाचे, मुगांचे दाणे काढ, गव्हाळे-मुगाळे शिजवून ठेव असं सांगितलं.
आपण शेतावर निघून गेली. सून माडीवर गेली. गहूं मूग काढून ठेवले. खालीं आली, गोठ्यांत गेली. गव्हाळीं मुगाळीं वसरं उड्या मारीत होती. त्यांना ठार मारलीं, चिरलीं व शिजवून ठेवून सासूची वाट पहात बसलीं. दुपार झाली तशी सासू घरी आली. सुनेनं पान वाढलं. सासूनं देखलं. तांबडं मांस दृष्टीस पडलं. तिनं हे काय म्हणुन सुनेला पुशिलं. सुनेनं सर्व हकीकत सांगितली. सासू घाबरली. न समजतां चुकी घडली म्हणून तशीच उठली. देवापाशीं जाऊन बसली. प्रार्थना केली. देवा, हा सुनेच्या हातून अपराध घडला. तिला ह्याची क्षमा कर ! गाईवासरं जिवंत कर ! असं न होईल तर संध्याकाळीं मीं आपला प्राण देईन ! असा निश्चय केला.
देवापाशीं बसून राहिली. देवानं तिचा एकनिश्चय पाहिला. निष्कपट अंतकरण देखिलं. पुढं संध्याकाळीं गाई आल्या. हंबरडा फोडू लागल्या तशी देवाला चिंता पडली. हिचा निश्चय ढळणार नाहीं असं देवास वाटलं. मग देवान काय केलं ? गाईचीं वासरं जिवंत केलीं. तीं उड्या मारीत मारीत प्यायला गेलीं. गाईंचे हंबरडे बंद झाले. म्हातारीला आनंद झाला. सुनेला आश्चर्य वाटलं. तसा सर्वांना आनंद झाला. नंतर म्हातारीनं गाईगोर्ह्यांची पूजा केली. स्वयंपाक करून नैवेद्य दाखविला. देवाचे आभार मानले. नंतर आपण जेवली. आनंदी झाली. तसे तुम्ही आम्ही होऊं. ही साठां उत्तरांची कहाणी पांचां उत्तरीं, देवाब्राह्मणाचे दारीं, पिंपळाच्या पारीं, गाईंच्या गोठी सुफळ संपूर्ण.
अस्वीकरण (Disclaimer) : या लेखात दिलेली माहिती आणि उपाय सामान्य माहितीवर आधारित आहे. या माहितीची पूर्णता, विश्वासार्हता आणि अचूकता याबाबत वेबदुनिया कोणतीही हमी देत नाही. अधिक माहितीसाठी संबंधित तज्ज्ञांचा सल्ला घ्यावा.