पुन्हा एकदा पावसाने संपूर्ण राज्यभरात जोरदार आगमन केले आहे. हवामान विभागानं पुढच्या पाच दिवसांसाठी देशातील विविध राज्यांसाठी पावसाचा रेड आणि ऑरेंज अलर्ट जारी केला आहे. हवामान विभागानं म्हणल्यानुसार, कोकण आणि मध्य महाराष्ट्रातील अनेक भागांत मुसळधार पावसाची शक्यता आहे. पावसामुळे अनेक भागांत पूरजन्य परिस्थिती निर्माण होऊ शकते. त्यामुळे नदीच्या किनाऱ्यावर राहणाऱ्या लोकांना सतर्कतेचा इशाराही देण्यात आला आहे.
बंगालच्या उपसागरातील कमी दाबाचं क्षेत्र पुढील ४८ तासांत अधिक तीव्र होणार आहे. हेच कमी दाबाच्या क्षेत्राचे रुपांतर चक्रीवादळात होण्याची चिन्हे आहेत. त्याचा परिणाम, राज्याच्या हवामानावर होणार आहे. परिणामी, हवामान विभागाने मुसळधार पावसाचा अंदाज वर्तवण्यात आला आहे. मान्सून देशाच्या बहुतांश भागात सक्रिय झाला आहे. उत्तर-पश्चिम बंगालच्या उपसागरावर कमी दाबाचे क्षेत्र कायम आहे. तसेच पूर्व-मध्य आणि लगतच्या ईशान्य अरबी समुद्राच्या मध्यभागी समुद्रसपाटीपासून ३.१ किमी आणि ५.८ किमी दरम्यान आहे. म्हणूनच या हवामान हालचालींमुळे देशातील अनेक राज्यांमध्ये मुसळधार पाऊस पडू शकतो, असा अंदाज हवामान विभागाकडून जारी करण्यात आला आहे.
राज्यातील जिल्ह्यांसोबतच मुंबईसाठीही ८, ९ आणि १० ऑगस्टला ऑरेंज अलर्ट जारी करण्यात आला आहे. तिनही दिवस १०० मिमीहून अधिक पावसाचा अंदाज वर्तवण्यात आहे. दरम्यान, सध्या कोकणात देखील मुसळधार पाऊस कोसळत आहे. विविध ठिकाणी पावसामुळे जनजीवन विस्कळीत झाले आहे. अनेक ठिकाणी नदी नाल्यांना पूर आला आहे. रत्नागिरी जिल्ह्यात कोसळणाऱ्या मुसळधार पावसामुळं वाहतुकीवर मोठा परिणाम झाला आहे. गुहागर तालुक्यात मोठा पाऊस झाल्यामुळं अनेक ठिकाणी घरांमध्ये पाणी शिरलं आहे.