देशातील अनेक राज्यांमध्ये दसऱ्याच्या सणाच्या दिवशी देखील हलका पाऊस पडला. त्यामुळे अनेक ठिकाणी दुर्गापूजा विसर्जन आणि रावण दहन कार्यक्रम विस्कळीत झाले. खरं तर चीन समुद्रातील नोरू वादळामुळे बंगालच्या उपसागरात कमी दाबाचे क्षेत्र आणि चक्री वारे वाहत आहेत आणि त्यामुळे आर्द्रता वाढल्याने पाऊस पडत आहे. हा ट्रेंड ऑक्टोबरच्या मध्यापर्यंत कायम राहण्याची शक्यता आहे.
हवामान खात्यानुसार पुढील काही दिवस उत्तर प्रदेश आणि उत्तराखंडच्या काही भागात पाऊस पडेल तर विभागाने यासाठी ऑरेंज अलर्ट जारी केला आहे. पुढील दोन दिवस उत्तराखंडमधील कुमाऊं आणि गढवाल भागात अतिमुसळधार पावसाची शक्यता व्यक्त करत रेड अलर्ट जारी करण्यात आला आहे. तर उत्तर प्रदेशात पुढील दोन ते तीन दिवसांसाठी ऑरेंज अलर्ट जारी करण्यात आला आहे.
यासोबतच मध्य प्रदेश, छत्तीसगड, ओडिशा, आंध्र प्रदेशमध्ये काही भागात मुसळधार पावसाची शक्यता आहे. तर सुमारे एक आठवडा दिल्ली एनसीआरमध्ये ढगाळ आकाश आणि हलका पाऊस पडण्याची शक्यता आहे. दुसरीकडे पश्चिम बंगाल, बिहार, झारखंड, सिक्कीमसह देशाच्या पूर्वेकडील राज्यांमध्ये येत्या काही दिवसांत मुसळधार पाऊस पडण्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे.
हवामान खात्याने देशातील 20 राज्यांमध्ये पावसाबाबत यलो अलर्ट जारी केला आहे. यात उत्तर प्रदेश, बिहार, मध्य प्रदेश, झारखंड, पश्चिम बंगाल, ओडिशा, छत्तीसगड, महाराष्ट्र, तेलंगणा, पुद्दुचेरी, आंध्र प्रदेश, तामिळनाडू, केरळ, सिक्कीम, आसाम, मेघालय, नागालँड, मणिपूर, मिझोराम आणि त्रिपुरा या राज्यांचा समावेश आहे.
महाराष्ट्रात हवामान खात्याने संपूर्ण मराठवाडा आणि विदर्भात पावसाचा येलो अलर्ट दिले आहे. तसेच पश्चिम महाराष्ट्रात पुण्याला वगळता इतर जिल्ह्यांमध्ये पाऊस होण्याची शक्यता वर्तवली गेली आहे. भंडारा, गोंदिया, नागपूर, चंद्रपूर, गडचिरोली या जिल्ह्यांना येलो अलर्ट देण्यात आले आहे तर मराठवाड्यातील नांदेड, हिंगोली, परभणी या जिल्ह्यांमध्येही मुसळधार पाऊस होईल अशी शक्यता वर्तवली गेली आहे.