श्वास देऊन पत्नीने वाचवले पतीचे प्राण, दोघेही ट्रेनमध्ये प्रवास करत होते

रविवार, 2 ऑक्टोबर 2022 (17:52 IST)
पूर्वीच्या काळी सावित्रीने यमाशी झगडून सत्यवानाचे प्राण वाचवल्याची कथा आपल्याला सर्वांनाच माहिती आहे. कलियुगात देखील एका सावित्रीने आपल्या सत्यवानाचे प्राण वाचवल्याची घटना मथुरा स्थानकात घडली आहे. ट्रेनमधील प्रवासादरम्यान पतीच्या श्वासाची तार तुटू लागल्याने पत्नीने क्षणाचाही विलंब न लावता तोंडाने श्वास देऊन पतीचा जीव वाचवला.यावेळी आरपीएसएफचे जवानही त्यांच्या मदतीसाठी पोहोचले.महिला आणि आरपीएफ जवानांच्या अथक परिश्रमामुळे प्रवाशाचे प्राण वाचले.त्यांच्यावर खासगी रुग्णालयात उपचार सुरू आहेत. 
 
22634 क्रमांकाची गाडी शुक्रवारी रात्री 12.05 वाजता फलाट क्रमांक दोनवर थांबली.त्यानंतर ट्रेनच्या कोच क्रमांक बी-4 मधून आरडाओरडा सुरू झाला.आवाज ऐकून प्लॅटफॉर्मवर कर्तव्य बजावत असलेले आरपीएसएफचे कॉन्स्टेबल अशोक कुमार आणि निरंजन सिंग तेथे पोहोचले.कोचच्या सीटवर एक प्रवासी बेशुद्ध अवस्थेत पडलेला आणि त्याच्या बाजूला उभी असलेली त्याची पत्नी मदतीसाठी आरडाओरड करताना आरपीएफ जवानला दिसली.प्रवाशाला हृदयविकाराचा झटका आल्याचे डब्यातील प्रवाशांनी आरपीएफ जवानांना सांगितले. 
 
हे पाहून जवानांनी तातडीने वृद्ध प्रवाशाला डब्यातून खाली उतरवले.रुग्णाला ऑक्सिजनची नितांत गरज होती.नवऱ्याच्या जीवावर आलेले संकट पाहून पत्नीने लगेचच त्याला तोंडातून श्वास देण्यास सुरुवात केली.आरपीएसएफच्या जवानांनी त्याच्या हात-पायांना चोळण्यास सुरुवात केली.पत्नीने सतत श्वास घेतल्याचा परिणाम असा झाला की त्याच्या शरीरात उष्णता आली आणि पतीची हालचाल सुरु झाली . तोपर्यंत रेल्वे रुग्णवाहिकाही तेथे पोहोचली. 
 
आरपीएफ जवानांनी प्रवाशाला उपचारासाठी खासगी रुग्णालयात दाखल केले. त्यांच्यासोबत आरपीएसएफचे कॉन्स्टेबल निरंजन सिंगही रुग्णालयात गेले. रुग्णालयात पोहोचल्यावर महिलेने तिचे नाव दया आणि पतीचे नाव केशवन सांगितले. तिने  सांगितले की ते मूळचे  केरळचे  असून दिल्लीत राहणाऱ्या आपल्या मुलाला भेटायला जात होते .आरपीएफचे प्रभारी निरीक्षक अवधेश गोस्वामी यांनी सांगितले की, 67 वर्षीय केशवन यांना प्रवासादरम्यान हृदयविकाराचा झटका आला. 
 
आरपीएसएफच्या जवानांनी प्रवाशाला खाली उतरवून त्याचा जीव वाचवण्याचा प्रयत्न केला.यावेळी प्रवाशाची पत्नी त्याला श्वास देत राहिली.यामुळे पतीच्या  शरीरात हालचाल सुरू झाली.प्रवाशाची पत्नी आणि आरपीएसएफ जवानांच्या मेहनतीमुळे प्रवाशाचे प्राण वाचले.त्यांच्यावर खासगी रुग्णालयात उपचार सुरू असून त्यांच्या प्रकृतीत सुधारणा होत आहे.आरपीएसएफ जवानांच्या या उत्कृष्ट कार्याची माहिती वरिष्ठ अधिकाऱ्यांनाही देण्यात आली आहे. 

Edited By- Priya Dixit

वेबदुनिया वर वाचा

संबंधित माहिती