सोमवारी झालेल्या पावसाने ठिकठिकाणी पाणी तुंबलं. अनेक ठिकाणी नागरिकांच्या घर, दुकानांमध्ये पाणी घुसून प्रचंड नुकसान झालं. वाहनांमध्ये पाणी शिरल्याने वाहनांचंही नुकसान झालं. त्यामुळे महानगरपालिकेत सत्ता असणाऱ्या भाजपावर जोरदार टीका होतेय. याबाबत राज्याचे उपमुख्यमंत्री आणि भाजपा नेते देवेंद्र फडणवीस यांना विचारलं असता त्यांनी “पाऊस किती पडावा हे महानगरपालिका ठरवत नाही,” अशी प्रतिक्रिया दिली. ते मंगळवारी दिल्लीत पत्रकारांनी विचारलेल्या प्रश्नांचं उत्तर देताना बोलत होते.
देवेंद्र फडणवीस म्हणाले, “पाऊस किती पडावा हे महापालिका ठरवत नाही, पण जो पाऊस पडला त्यामुळे मोठ्या प्रमाणात पाणी साठलं आहे. काल पुण्यात पडलेल्या पावसाने मागील १० वर्षांचा विक्रम मोडला आहे. मागील २४ तासात पुण्यात पडलेला पाऊस सर्वाधिक आहे. हे प्रमाण १०० वर्षांच्या रेकॉर्डपेक्षा थोडा कमी आहे. इतका पाऊस पडल्यानंतर पाणी तुंबणारच आहे.”