संजय राऊत यांचा इशारा: 'आम्ही खूप सहन केलं, आता बरबाद करणार'

सोमवार, 14 फेब्रुवारी 2022 (16:00 IST)
शिवसेनेची मंगळवारी महत्त्वाची पत्रकार परिषद होणार असून पक्षाचे मंत्री, आमदार, खासदार आणि सर्व पदाधिकारी उपस्थित असतील अशी माहिती खासदार संजय राऊत यांनी दिली.
 
गेल्या काही दिवसांपासून भाजपचे माजी खासदार किरीट सोमय्या आणि शिवसेनेचे खासदार संजय राऊत यांच्यात राजकीय वाद सुरू असल्याचं दिसून येत आहे.
 
"डोक्यावरुन पाणी गेलं असून आम्हीही आता सहन करणार नाही. आता आम्ही बरबाद करणार,"असा इशारा संजय राऊत यांनी माध्यमांशी बोलताना दिला.
उद्याच्या पत्रकार परिषदेत तुम्हाला सगळी उत्तरं मिळतील असंही राऊत म्हणाले.
 
"भाजपचे साडेतीन लोक हे सुद्धा कोठडीत असतील. महाराष्ट्रात देखील सरकार आहे, शिवसेनेच्या नेतृत्वातलं सरकार आहे. आणि हमाम मे सब नंगे होते है,"असं संजय राऊत आज पुन्हा एकदा म्हणाले आहेत. ते पुढे म्हणाले, "नींद उड गई है उनकी, जो करना है उखाड लिजिए, मै डरनेवाला नहीं हूं"
भाजप आणि शिवसेनेतला हा संघर्ष नवीन नसला तरी संजय राऊतांनी आता आक्रमक इशारा दिलेला आहे. त्यामुळे उद्याच्या पत्रकार परिषदेत शिवसेना शक्तीप्रदर्शन करणार का? आणि काय भूमिका मांडणार? हे पहावं लागेल.
 
किरीट सोमय्या काय म्हणाले?
गेल्या काही दिवसांपासून किरीट सोमय्या आणि संजय राऊत यांच्यात आरोप-प्रत्यारोप सुरू आहेत. किरीट सोमय्या यांनी संजय राऊत यांच्या मुलींची वाईन व्यवसायात मोठी गुंतवणूक असून संजय राऊत यांनी ही बाब लपवल्याचा आरोप केला आहे.
 
एका बड्या उद्योजकासोबतही त्यांच्या मुलींची व्यवसायिक भागीदारी असल्याचा दावा सोमय्या यांनी केला आहे.
 
सुजीत पाटकर हे संजय राऊत यांचे निकटवर्तीय असून त्यांचा कोव्हिड सेंटर घोटाळ्यात सहभाग असल्यातही आरोप किरीट सोमय्या यांनी केला होता. या प्रकरणी त्यांनी पुण्याची शिवाजी नगर पोलीस स्टेशनमध्ये तक्रारही दाखल केली होती.
 
या प्रकरणात किरीट सोमय्या आणि शिवसैनिकांमध्ये धक्काबुक्की झाल्याची घटना घडली आणि नंतर आठ शिवसैनिकांवर गुन्हे सुद्धा दाखल झाले.
 

वेबदुनिया वर वाचा

संबंधित माहिती