राजकारणातील मर्यादा आता भाजपने ओलांडली : राऊत

सोमवार, 14 फेब्रुवारी 2022 (15:35 IST)
पुण्यातील कोविड सेंटरच्या भ्रष्टाचार प्रकरणात शिवसेनेकडून मंगळवारी दुपारी पत्रकार परिषद घेण्यात येणार असल्याची माहिती शिवसेना प्रवक्ते आणि खासदार संजय राऊत यांनी दिली. आतापर्यंत खूप सहन केले, पण राजकारणातील मर्यादा आता भाजपने ओलांडली आहे. त्यामुळे अनिल देशमुखांच्या कोठडीत शेजारी दावा करणारे भाजपचे साडेतीन लोक हे येत्या दिवसात त्या कोठडीत दिसतील, अन् अनिल देशमुख बाहेर असतील असा गौप्यस्फोट राऊत यांनी केला आहे. 
 
सगळ्यांना माहितेय मी काय बोलतोय, त्यामुळे सगळ्यांची झोप उडाली आहे. केंद्र सरकारच्या एजन्सीच्या धमक्या आम्हाला देऊ नका. महाराष्ट्रातही शिवसेनेचे सरकार आहे, असा इशारा त्यांनी दिला. जी दादागिरी सध्या केंद्रीय तपास यंत्रणांच्या माध्यमातून सुरू आहे, शिवसेनेवर ठाकरे परिवारावर जो चिखल उडवला जातो आहे, त्या सगळ्यांना उत्तर मिळणार असल्याचे त्यांनी स्पष्ट केले.
 
सर्वात मोठे ऊर्जाकेंद्र शिवसेना आहे, ज्याठिकाणी बाळासाहेब बसायचे त्याठिकाणी पत्रकार परिषद होणार आहे. संपूर्ण पक्षाचे लोक त्य़ाठिकाणी असतील. आम्ही खूप सहन केल आहे, आता बरबादही आम्हीच करणार आहे. उद्या मंगळवारी दुपारी ४ वाजता पदाधिकारी, आमदार, खासदार या पत्रकार परिषदेला असतील. भाजपचे लोक सतत सांगतात हा जेलमध्ये जाईल, तो जेलमध्ये जाईल. येत्या दिवसांमध्ये भारतीय जनता पक्षाचे साडेतीन लोक हे अनिल देशमुखांच्या कोठडीत शेजारी असतील अन् देशमुख बाहेर असतील. महाराष्ट्रातही सरकार आहे, सरकार शिवसेनेच्या नेतृत्वात आहे हेदेखील लक्षात घ्या, बघुयात कोणात किती दम आहे. हमाममे सब नंगे आहेत, असेही ते म्हणाले. राजकारणात प्रत्येक गोष्टीची मर्यादा असते, पण ती राजकारणातील मर्यादा भाजपने आता ओलांडली आहे. जे करायचे आहे ते करा, उखाडा अशा शब्दात त्यांनी भाजपला आव्हान दिले.

वेबदुनिया वर वाचा

संबंधित माहिती