सचिन वाझेंना चांदीवाल आयोगाचा जबाब बदलण्यास मनाई

सोमवार, 14 फेब्रुवारी 2022 (15:33 IST)
माजी गृहमंत्री अनिल देशमुख यांच्या वकिलांच्या वतीने बडतर्फ पोलीस अधिकारी सचिन वाझे यांच्या केलेल्या उलट तपासणीतील उत्तरे वाझे यांना आता बदलता येणार नाहीत, असे न्या. कैलास चांदीवाल यांनी स्पष्ट केले आहे. त्यामुळे वाझेंना धक्का बसला आहे. देशमुख यांचे वकील गिरीश कुलकर्णी यांनी आयोगासमोर वाझे यांची उलटतपासणी केली होती. त्यावेळी मी दिलेली उत्तरे ही देशमुख यांच्या दबावाखाली दिली होती. त्या दबावामुळे माझे मानसिक संतुलन पूर्णपणे बिघडलेले होते. आता मला ती उत्तरे बदलायची आहेत, असा अर्ज वाझे यांनी आयोगासमोर केला होता. तथापि, वाझे यांच्या उलट तपासणीवेळी त्यांची देहबोली दबावात असल्यासारखी नव्हती. ते शांतपणे, थांबून उत्तरे देत होते, असे निरीक्षण आयोगाने नोंदविले.
 
कोणाच्या तरी बचावासाठी वाझे आता उत्तरे बदलू पाहत असावेत, अशी शंकाही आयोगाने व्यक्त केली. आधीची उत्तरे बदलण्याची वाझे यांना आजच का गरज भासली? आधी दबाव होता आणि आता त्यांच्यावर दबाव नाही, अशी कोणती परिस्थिती उद्भवली, असा सवालही आयोगाने केला. देशमुख यांना पैसे देण्याचा प्रसंग आला होता का, यावर उलट तपासणीत त्यांनी नाही, असे उत्तर दिले होते. आता त्यांना ते बदलायचे होते. खंडणी गोळा करण्यास देशमुखांनी सांगितले होते का? आदी प्रश्नांची उत्तरेही त्यांना बदलायची होती, असेही आयोगाने म्हटले आहे.
 
आधी आपल्यावर देशमुखांचा दबाव होता. आता आपल्याला उत्तरे बदलायची आहेत, हा त्यांनी अर्जात केलेला युक्तिवाद आयोगाने अमान्य केला. असे उत्तर बदलण्यामागे कोणाचा तरी बचाव करण्याची पद्धतशीर खेळी दिसते. कोणाच्या तरी प्रभावाखाली येऊन उत्तर बदलण्याची भूमिका वाझेंकडून घेतली जात आहे, अशा कडक शब्दांत न्या.चांदीवाल यांनी नापसंती व्यक्त केली.

वेबदुनिया वर वाचा

संबंधित माहिती