व्हॅलेंटाईन डे म्हणजे तरुण तरुणींसाठी खास दिवस असतो. मागच्या दोन वर्षात कोरोनामुळे तरुण मंडळींना मनासारखा व्हॅलेंटाईन डे साजरा करता आला नव्हता. मात्र यंदा सगळ्या निर्बंधनांमध्ये शिथिलता देण्यात आली आहे. केवळ मास्क वापरण्याची सक्ती अद्याप कायम आहे. व्हॅलेंटाईन डेचं औचित्यसाधून मास्कबाबत जनजागृती करण्यासाठी मुंबई पोलिसांनी नेहमी प्रमाणे त्यांच्या हटके स्टाईलमध्ये एक भन्नाट ट्विट केले आहे.
आजारांपासून वाचण्यासाठी ओठांजवळचा पहिला व्हॅलेंटाऊन – मास्क. बाकी सगळं नंतर…, असे मजेशीर ट्विट मुंबई पोलिसांनी केले आहे. तरुणांच्या भाषेत त्यांना सल्ला देत जनजागृतीचा पोलीशी खाक्या देखील मुंबई पोलिसांनी यावेळी दाखवून दिला आहे.
यंदाच्या ”व्हॅलेंटाईन डे”च्या निमित्ताने संकल्प करा; प्रियजनांच्या सुरक्षिततेसह स्वतःची देखील काळजी घेण्याचा आणि इतरांनाही काळजी घेण्याचे आवाहन करा, असे म्हणत मुंबई पोलिसांनी जनजागृती करत मास्क घालण्याचे आवाहन केले आहे. सोबत एक व्हिडीओ देखील शेअर केला आहे. जर तुम्ही आमचे व्हॅलेंटाईन असाल तर काय काय कराल ? हे सांगणारा तो व्हिडीओ आहे.