प्रकाश आंबेडकर : 'वंचित'ला 'इंडिया'त घेतल्यास महाविकास आघाडीसाठी 'इकडे आड, तिकडे विहीर' होईल का?

शनिवार, 30 डिसेंबर 2023 (08:08 IST)
वंचित बहुजन आघाडी'चा विरोधी पक्षांच्या देशव्यापी 'इंडिया' आघाडीत प्रवेश कसा आणि कधी होणार, हा सध्याचा सर्वात प्रभावी ठरु शकणारा, पण प्रलंबित राजकीय प्रश्न आहे. याचं स्पष्ट उत्तर, ते प्रत्यक्षात येईपर्यंत, कोणीच देऊ शकत नाही.
 
गुरुवारी एकीकडे कॉंग्रेसच्या 139 व्या 'स्थापना दिना'ची सभा नागपूरला होत होती, तेव्हा प्रकाश आंबेडकरांनी कॉंग्रेस अध्यक्ष मल्लिकार्जुन खर्गे, शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे आणि 'राष्ट्रवादी'चे अध्यक्ष शरद पवार यांना एक पत्र लिहिलं. पुन्हा एकदा 'वंचित बहुजन आघाडी'ची 'इंडिया आघाडी'मध्ये सामील होण्याची आपली इच्छा आहे असं ठासून सांगितलं.
 
मोदींना हरवणं हीच आपलं एकमेव उद्दिष्ट असणं कसं आवश्यक आहे हे सांगून, ते करण्यासाठी आंबेडकरांनी जागावाटपाचा एक फॉर्म्युला त्या पत्रात सुचवला आणि लगेचच तो 'एक्स' (पूर्वीचं ट्विटर) वर जाहीरही करुन टाकला.
 
कोणत्याही आघाडीत जागावाटप हा सगळ्यात कळीचा मुद्दा असतो. त्यावरुन तयार झालेल्या आघाड्या तुटतात. इथे आंबेडकरांनी आघाडीत जाण्याअगोदरच जागांचा फॉर्म्युला जाहीर केला आणि प्रश्न सोपा होण्याऐवजी अधिकच क्लिष्ट झाला.
 
आंबेडकरांनी सुचवलेला फॉर्म्युला आहे 12+12+12+12. म्हणजे जर चार पक्ष महाराष्ट्रात एकत्र निवडणुक लढवणार असतील तर लोकसभेच्या एकूण 48 जागांसाठी समसमान वाटप व्हावे आणि प्रत्येकाच्या पदरात 12 जागा याव्यात.
 
या फॉर्म्युलाकडे बघून महाराष्ट्राच्या एकंदरित राजकीय परिस्थितीची जाण असणा-या कोणालाही प्रश्न पडेल की कसं होऊ शकेल? हे पक्ष, त्यांची प्रत्येक मतदारसंघातली ताकद, त्यांच्याकडे असलेले उमेदवार आणि जिंकण्याची क्षमता, हे सगळं वेगवेगळं आहे.
समसमान वाटप हा आजवरच्या 'इंडिया' अथवा 'महाविकास आघाडी'च्या बैठकांमधलं सूत्र कधीही नव्हतं. एकाच सूत्रावर त्यांचं एकमत आहे, ते म्हणजे, जो उमेदवार जिंकून येण्याची सर्वाधिक क्षमता आहे, तो उमेदवार, सगळ्यांनी मिळून द्यायचा.
 
भाजपा वा त्याच्या मित्रपक्षांविरुद्ध बहुरंगी लढत न करता, एकास एक अशीच लढत करावी आणि विरोधी पक्षाची मत विभागू न देता अधिकाधिक जागा जिंकायच्या.
 
पण यात कुठेच सगळ्यांनी समान जागा असं नाही. शिवाय 'आघाडी'तल्या तीनही पक्षांनी आपापल्या मतदारसंघांचा आढावा घ्यायला सुरुवात केली आहे. उद्धव ठाकरेंच्या शिवसेनेनं 23 जागांवर दावा सांगितला आहे. कॉंग्रेसचाही आकडा 20 च्या पुढेच आहे. त्यामुळे या पक्षांपैकी कोणालाही समान अथवा 12 जागा मान्य होतील याची शक्यताच नाही.
आघाड्यांच्या जागावाटपात सुरुवातील जास्तच जागांवर दावे केले जातात आणि अंतिम यादीशी पोहोचेपर्यंत ते बरेच कमी-जास्त झालेले असतात, ही राजकीय व्यावहारिकतेची प्रकाश आंबेडकरांच्या 'वंचित बहुजन आघाडी'लाही जाणीव असणार. पण तरीही अशा मागणीचा त्यांच्या 'इंडिया'तल्या प्रवेशावर परिणाम होईल का?
 
दुसरीकडे, एकही आमदार-खासदार नसलेल्या 'वंचित'चं राजकीय मूल्य आणि उपद्रवमूल्य हे 'महाविकास आघाडी'च्या नेत्यांना माहीत आहे. 2019 च्या निवडणुकांमध्ये त्याचा प्रत्यक त्यांना आलेला आहे. म्हणूनच 'वंचित'ला टाळूनही चालणार नाही.
 
निवडणूक तोंडावर आलेली असतांना, आंबेडकरांचा प्रलंबित आघाडीप्रवेश, हा 'इंडिया' साठी इकडे आड आणि तिकडे विहीर, अशी स्थिती बनला आहे.
 
'वंचित'च्या प्रवेशाची अनेक महिन्यांपासून सुरु असलेली चर्चा
प्रकाश आंबेडकर 'इंडिया' अथवा 'महाविकास आघाडी'त येतील ही चर्चा उद्धव ठाकरेंचं सरकार गेल्यानंतर अधिक सुरु झाली. कारण शिवसेना आणि 'वंचित' मुंबईत अधिक जवळ येऊ लागले.
 
विधानसभा निवडणुकीनंतर जे राजकारण महाराष्ट्रात घडलं, त्यामुळे लांब गेलेलं 'वंचित'चं राजकारण आणि आता एकनाथ शिंदे बाहेर पडल्यानं कमकुवत झालेली उद्धव ठाकरेंची शिवसेना यांना तसेही नवे मित्र हवेच होते.
 
ठाकरे आणि आंबेडकर अल्पावधीतच जवळ आले. प्रबोधनकार ठाकरे यांचं साहित्य असलेल्या 'प्रबोधनकार डॉट कॉम' या वेबसाईटच्या उद्घाटनाच्या निमित्तानं दोघेही प्रथमच एकत्र आले.
 
डॉ.बाबासाहेब आंबेडकर आणि प्रबोधनकार ठाकरे यांच्या संबंधांच्या इतिहासाची उजळणीही झाली आणि ठाकरेंचं 'हिंदुत्व' हे कसं बहुजनवादी आहे हे सांगत प्रकाश आंबेडकरांनी वैचारिक जवळीकीची मांडणीही केली.
जानेवारी 2023 मध्ये उद्धव ठाकरे आणि प्रकाश आंबेडकरांनी शिवसेना आणि 'वंचित'ची अधिकृत आघाडी जाहीर केली. तेव्हा जरी 'महाविकास आघाडी'तला आंबेडकरांचा मार्ग प्रशस्त झाला असं म्हटलं गेलं, तरीही ते आजवर प्रत्यक्षात आलं नाही.
 
याचं मुख्य कारण कॉंग्रेस आणि राष्ट्रवादी हे होतं. प्रकाश आंबेडकर यांनी अनेकदा शरद पवार आणि त्यांच्या 'राष्ट्रवादी'वर टीका केली आहे. त्यांचं एकमेकांशी पटणार नाही असं कायम म्हटलं गेलं.
 
आंबेडकरांनी अनेकदा जाहीर वक्तव्यं केली, पण पवारांनी त्यांच्यावर काहीही बोलणं टाळलं. याचा महाराष्ट्रातल्या राजकारणात एक मोठा इतिहास आहे. त्यामुळे 'राष्ट्रवादी' कायम आंबेडकरांबाबत साशंक राहिलेली आहे.
 
इकडे कॉंग्रेसमध्येही त्यांच्याविषयी पूर्ण विश्वास नाही. असं सांगितलं जातं की 2019 च्या निवडणुकीअगोदर 'वंचित'ला 'आघाडी'मध्ये सहभागी करुन घेण्याची बोलणी अंतिम टप्प्यात आली होती. कॉंग्रेसचा त्यात पुढाकार होता. पण काही मागण्यांवर एकमत न झाल्यानं शेवटी बोलणी फिसकटली.
 
त्यामुळे आजही कॉंग्रेसमधले अनेक नेते आंबेडकरांच्या सहभागीविषयी आजही साशंकतेनंच बोलतात. प्रकाश आंबेडकर काय मागण्या करतील याचा अंदाज त्यांना बांधता येत नाही. शिवाय त्यांच्याशी बोलणी करुन मग आघाडी झाली नाही तर उलटा फटका बसू शकतो, हेही कॉंग्रेस जाणते. त्यामुळे अजूनही निर्णयाविना जपून पावलं टाकली जात आहेत.
 
अर्थात गेल्या काही दिवसांत या आघाडीवर काही हालचाली झाल्या आहेत. शिवसेनेशी त्यांची युती झालीच, पण दोनदा शरद पवारांशीही त्यांची भेट झाली आहे. शिवाय कॉंग्रेसतर्फेही काही नेते दिल्लीतून आंबेडकरांच्या संपर्कात आहेत असं समजतं.
 
मुंबई आणि दिल्ली इथं झालेल्या 'इंडिया'च्या बैठकीमध्ये 'वंचित' विषयी चर्चा करण्यात आली. नुकतंच शरद पवारांना याबद्दल विचारलं असता 'कॉंग्रेसचे अध्यक्ष मल्लिकार्जुन खर्गे प्रकाश आंबेडकरांशी बोलणार आहेत' असं त्यांनी अमरावती इथे पत्रकार परिषदेत सांगितलं.
 
पण त्याअगोदर 'वंचित'ला किती आणि कोणाच्या वाट्याच्या जागा द्यायच्या यावर 'महाविकास आघाडी'तल्या पक्षांचं एकमत व्हावं लागेल. ते झाल्यावर ही बोलणी पुढे सरकू शकतील. 'आघाडी' ते गांभीर्यानं घेते आहे असं दिसतंय कारण गेल्या निवडणुकीपासून त्यांनी 'वंचित'तचा घेतलेला धसका.
 
'वंचित'चा धसका
'वंचित'ला 'इंडिया' म्हणजेच 'महाविकास आघाडी' मध्ये सहभागी करुन घ्यावं म्हणून आघाडीअंतर्गतही आग्रह वाढतो आहे याचं मुख्य कारण २०१९ च्या निवडणुका आहेत.
 
त्या वर्षीच्या दोन्ही निवडणुकांमध्ये, लोकसभा आणि त्यानंतर विधानसभा निवडणुकांमध्ये, कॉंग्रेस आणि राष्ट्रवादीला 'वंचित' चा मोठा फटका बसला होता आणि त्यांना अनेक जागा हातच्या गमवाव्या लागल्या होत्या.
2019 च्या लोकसभा निवडणुकीत, जेव्हा 'वंचित' आणि एमआयएम अशी आघाडी होती, तेव्हा अशोक चव्हाण,विशाल पाटील,राजेंद्र शिंगणे, राजू शेट्टी, माणिकराव ठाकरे अशा आघाडीच्या अनेकांना धक्के बसले होते.
 
तेव्हाच्या आकडेवारीकडे पाहिलं, जर जेवढ्या मतांच्या फरकानं या जागा 'आघाडी'च्या पडल्या, जवळपास तेवढीच मतं त्या मतदारसंघात 'वंचित'च्या उमेदवाराला मिळाली होती.
 
उदाहरणादाखल:
 
नांदेड
 
प्रताप चिखलीकर पाटील (भाजप) - 4,08,977 मते,
अशोक चव्हाण (काँग्रेस) - 3,67,694
यशपाल भिंगे (वंचित आघाडी) - 1,44,586
मताधिक्य - 41,483
सांगली
 
संजयकाका पाटील (भाजप) - 3,49,621
विशाल पाटील (स्वाभिमानी) - 2,38,395
गोपीचंद पडळकर (वंचित आघाडी) - 1,86,752
मताधिक्य - 1,11,226
या दोन मतदारसंघाशिवाय बुलढाणा, हातकणंगले, परभणी, यवतमाळ या मतदारसंघांमध्येही भाजपा-शिवसेना युतीच्या उमेदवारांना फायदा झाला होता. स्वत: प्रकाश आंबेडकर अकोला आणि सोलापूरमधून उभे होते. सोलापूरमधून अनेकदा निवडून आलेल्या सुशीलकुमार शिंदेंनाही पराभवाला सामोरं जावं लागलं होतं.
 
कॉंग्रेसनं याच्या घेतलेल्या धसक्याचा परिणाम अजूनही आहे. म्हणून महाराष्ट्रातले कॉंग्रेसचे काही नेते आजही आंबेडकर आणि 'वंचित'वर पूर्ण विश्वास ठेवायला तयार नाहीत.
 
"प्रकाश आंबेडकरांबद्दलचा आजवरचा अनुभव काही चांगला नाही. त्यांची अंतिम पावलं ही भाजपाच्या फायद्याचीच ठरतात. त्यांच्या 'वंचित' मुळे गेल्या निवडणुकीत भाजपाचे 9 अतिरिक्त खासदार निवडून आले. त्यामुळे त्यांनी आपली विश्वासार्हता ही सिद्ध केली पाहिजे," असं कॉंग्रेस नेते आणि माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण नुकत्याच 'मुंबई तक'ला दिलेल्या मुलाखतीत म्हणाले होते.
2019 च्या लोकसभा निवडणुकीत 'वंचित बहुजन आघाडी'च्या एकूण मतांची टक्केवारी ही 14 टक्के होती. कोणत्याही निवडणुकीत ही टक्केवारी कमालीची निर्णायक आहे.
 
लोकसभेला त्यांच्यासोबत 'एमआयएम' होती, पण विधानसभेच्या वेळेस 'वंचित' एकटीच लढली. तेव्हा त्यांचा एकही आमदार निवडून आला नाही, पण त्यांनी जवळपास 5 टक्के मतं राज्यभरात घेतली आणि असं म्हटलं गेली की किमान 23 जागांवर त्यांच्यामुळे 'आघाडी'चा उमेदवार पराभूत झाला.
 
'वंचित'ला मिळालेल्या या मतांच्या टक्केवारीचा धसकाच 'आघाडी'नं घेतला आहे आणि म्हणून या मतांची विभागणी त्यांना 2024 च्या निवडणुकीत नको आहे. म्हणून त्यांनी 'इंडिया' यावं याचे प्रयत्न सुरु आहे.
 
पण आंबेडकरांच्या मागण्या, त्यांची समजूत घालणं हे एका बाजूला आणि दुस-या बाजूला ते जमलं नाही तर मतांची विभागणी, अशा 'इकडं आड तिकडं विहीर' अशा स्थितीत 'इंडिया' आहे.
 
पण अजून एक प्रश्नही आहे की जसं 2019 मध्ये जे मतदार 'वंचित'च्या मागे राहिले, विशेषत: दलित आणि मुस्लिम, तेच या वेळेसही पुन्हा त्यांच्याकडे जातील. मधल्या काळात राज्यातली जातिसमीकरणं बदलली आहेत. त्यामुळे 'वंचित' आणि 'इंडिया' या दोघांनाही मागण्या करतांना आजच्या स्थितीचा विचार केलाच पाहिजे.
 
'वंचित'च्या रणनीतिकडे सांशकतेनं पाहणा-या कॉंग्रेसच्या काही नेत्यांना वाटतं की मतदार आता बदलला आहे.
 
"सगळ्या दलित आणि मुस्लिम बांधवांना 'वंचित बहुजन आघाडी'चा खरा चेहरा समजला आहे. 'वंचित' असेल वा 'एमआयएम' असेल, हे भाजपाला निवडून आणण्याकरता विरोधकांची मतं विभागण्याचं काम करतात. त्यामुळे त्यांच्यासोबत आता कोणी जाणार नाही. म्हणून ते 'इंडिया' आघाडीत यायचं म्हणतात."
 
"त्यांनी जर जागांची व्यावहारिक मागणी केली तर नक्की विचार करता येईल आणि आम्ही त्याचं स्वागतच करु. पण अव्यवहारिक मागणी करायची आणि नंतर आम्हाला घेतलं नाही त्यामुळे आम्ही वेगळे उमेदवार उभे केले म्हणायचं आणि त्यातून भाजपाला फायदा मिळवून द्यायचा, अशी जर त्यांची रणनीति असेल तर आम्हाला सावध रहावं लागेल," असं पृथ्वीराज चव्हाण त्यांच्या मुलाखतीत म्हणाले होते.
 
'वंचित' आणि आंबेडकरांना सोबत घेण्याचा फायदा
'वंचित बहुजन आघाडी' आणि प्रकाश आंबेडकर सोबत आले तर समविचारी मतदारांमध्ये विभागणी टळेल आणि त्यामुळे विज सोपा होईल, हे गणित प्रामुख्यानं असलं तरीही यापेक्षाही अन्य फायदेही 'इंडिया' आघाडीला होऊ शकेल.
 
मुख्य म्हणजे, त्यांना महाराष्ट्राबाहेरही प्रकाश आंबेडकर सोबत असल्याचा फायदा होईल. विशेषत: उत्तर भारतात उत्तर प्रदेश आणि बिहारमध्ये, जिथं दलित मतं निर्णायक संख्येनं आहेत आणि डॉ बाबासाहेब आंबेडकरांचा प्रभाव मोठा आहे, तिथे बाबासाहेबांचे नातू सोबत असल्याचा परिणाम होईल.
 
उत्तर प्रदेशात मायावतींचा प्रभाव कमी होणं, त्या 'इंडिया' पासून अंतर राखून असणं, याची कमतरता कॉंग्रेससाठी प्रकाश आंबेडकर भरुन काढू शकतील. देशभरात त्यांचा प्रचारासाठी उपयोग 'इंडिया'ला करुन घेता येईल
 
राहुल गांधी सातत्यानं 2024 ची निवडणूक ही विचारधारेची लढाई आहे असं म्हणतात. एका बाजूला कॉंग्रेसची सर्व जातिसमुदायांना सोबत घेण्याची कॉंग्रेसची विचारधारा विरुद्ध संघ-भाजपाची हिंदुत्वाची विचारधारा, अशी त्यांची मांडणी आहे.
 
अशाच प्रकारची मांडणी प्रकाश आंबेडकर कायम करत आले आहेत. हिंदुत्व, संघ, जातिसंघर्ष या विषयांवर ते सैद्धांतिक मांडणीही करतात आणि जमिनीवरचं राजकारणही करतात. त्यांच्या मांडणीचा 'इंडिया' मांडू पाहणा-या नरेटिव्हसाठी फायदा ठरु शकतो.
 
याशिवाय गांधी, आंबेडकर, महाराष्ट्रात ठाकरे आणि पवार या घराण्यांना मोठा राजकीय इतिहास आहे. त्याच्या इथल्या मानसिकतेवरही परिणाम होतो. हे सगळे एका आघाडीत एकत्र येणं हाही एक परिणामात्मक मुद्दा ठरु शकतो. त्याचाही विचार 'इंडिया' आघाडीला करावा लागेल.
 
पण अर्थात दुस-या बाजूला व्यावहारिकता सर्वात महत्वाची ठरेल. जशी जागांचा आपल्याला हवा असलेला मागतांना प्रकाश आंबेडकरांना आपल्या पक्षाचा विस्तार, त्याची मतदारसंघनिहाय ताकद, त्यांच्याकडे असलेले चेहरे याचा वास्तववादी विचार करावा लागेल.
तसाच 'इंडिया' आघाडीलाही विधानसभा निवडणुकांनंतर कॉंग्रेसचा राहिलेला प्रभाव, पक्षफुटीनंतर शिवसेना आणि राष्ट्रवादीची प्रत्यक्षात उरलेली ताकद याचाही प्रामाणिकपणे विचार करावा लागेलच. जर याबाबतीत हे सगळे 'सेम पेज'वर नसतील आणि केवळ दबावाचं राजकारण सुरु राहिलं, तर सगळ्यांची एकत्र मोट बांधणं अवघड असेल.
 
"एकंदरीत आताची परिस्थिती पाहता 'वंचित'सह महाविकास आघाडी होईल किंवा नाही याबद्दल शंकाच आहे. एकदम 12 जागांची मागणी ही 'आघाडी'साठी खूपच अडचणीची आहे. पण तरीही एकदम बोलणी बंद न करता कॉंग्रेसला आंबेडकरांशी चर्चा सुरु ठेवावी लागेल. दुसरीकडे आता जागांवर शिवसेना आणि कॉंग्रेसमध्येच जुंपलेली असतांना त्यांच्यापैकी कोणी 'वंचित'साथी सहज जागा सोडतील असं दिसत नाही," राजकीय पत्रकार मृणालिनी नानिवडेकर म्हणतात.
 
प्रकाश आंबेडकर सोबत आले किंवा नाही आले, तरीही 'इंडिया' आघाडीला काही कमवावं लागणार आहे आणि काही गमावावं लागणार आहे. हा रस्ता त्यांच्यासाठी सहज सोपा नाही.

Published By- Priya Dixit
 

वेबदुनिया वर वाचा

संबंधित माहिती