'मोदींनी माफी मागावी,' पटोलेंच्या या मागणीनंतर काँग्रेस-भाजपची परस्परविरोधी आंदोलनं

सोमवार, 14 फेब्रुवारी 2022 (17:13 IST)
मुंबईत मालाबार हिल्स परिसरात काँग्रेसचं नियोजित आंदोलन आणि त्याविरोधात भाजपचं आंदोलन यामुळं तणावाचं वातावरण निर्माण झालंय.
 
देवेंद्र फडणवीस यांच्या सागर बंगल्यासमोर आंदोलन करण्याची घोषणा काँग्रेसनं केली होती. त्यावर भाजपनं त्यांना जशास तसं प्रत्युत्तर देण्याचा इशारा दिला होता.
 
या पार्श्वभूमीवर कायदा व सुव्यवस्थेला धोका निर्माण होऊ नये म्हणून पोलिसांनी सकाळपासूनच मोठ्या प्रमाणावर पोलिस बंदोबस्त तैनात केला होता.
देवेंद्र फडणवीस यांच्या सागर बंगल्याकडे जाणाऱ्या काँग्रेस आणि भाजप कार्यकर्त्यांनाही पोलिसांनी ताब्यात घेतल्याचं पाहायला मिळालं.
 
मोदींच्या वक्तव्याविरोधातील काँग्रेसच्या या आंदोलनाला विरोध करण्यासाठी भाजप नेते समोर आल्याचं पाहायला मिळालं. प्रतिआंदोलन करताना भाजप कार्यकर्ते आक्रमक होत घोषणाबाजी करत असल्याचं पाहायला मिळालं.
 
नाना पटोलेंना घराबाहेर अडवलं
नाना पटोलेंनी कोणत्याही परिस्थितीत सागर बंगल्यावर जाणार असं म्हटलं होतं. त्यांच्याबरोबर आंदोलनात सहभागी होण्यासाठी वारकरी आल्याचंही पाहायला मिळालं.
 
नाना पटोले जेव्हा आंदोलनासाठी निघाले तेव्हा कार्यकर्त्यांसह त्यांच्या घराबाहेर पोलिसांनी त्यांना अडवलं आणि कायदा आणि सुव्यवस्थेसाठी पुढं जाऊ नये अशी विनंती केली.
 
पोलिसांनी नाना पटोले यांना आंदोलनासाठी आझाद मैदानावर जाण्याची विनंती केली. मात्र नाना पटोलेंनी नकार देत निवासस्थानाच्या परिसरातच आंदोलन करणार असल्याचं म्हटलं.
आमचे कार्यकर्ते सागर बंगल्याकडं पोहोचले आहेत मी इथूनच माझा संदेश देत आंदोलन सुरू ठेवणार असल्याचं नाना पटोले यांनी म्हटलं.
 
मुंबईकरांच्या अडचणी पाहून आंदोलन थांबवत असल्याची घोषणा नाना पटोले यांनी एबीपी माझाबरोबर बोलताना केली. नागरिकांना त्रास देण्याचा आमचा काहीही विचार नसल्याचं पटोले म्हणाले.
 
आरोप-प्रत्यारोप
पंतप्रधान नरेंद्र मोदींनी महाराष्ट्राचा अपमान केला त्याच्या पाठिशी उभं राहणारी जी भाजपची संस्कृती आहे त्याचा आम्ही विरोध करतो. भाजपनंच लोकांना रस्त्यावर उतरवलं आणि रस्त्यांवर वाहतुकीची कोंडी केली. त्यांच्यामुळंच मुंबईकरांचे हाल झाले,असा आरोप पटोलेंनी केला.
 
त्यामुळंच तात्पुरचं हे आंदोलन मागं घेत आहोत. पण खासदारांच्या घरासमोर आंदोलन सुरुच राहणार असल्याचं नाना पटोले म्हणाले.
दरम्यान, देवेंद्र फडणवीस यांनी सागर या निवासस्थानी त्यांना भेटायला आलेल्या कार्यकर्त्यांची भेट घेतली. यावेळी त्यांनी काँग्रेसवर हल्लाबोल केला.
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी माफी मागण्याचा प्रश्नच येत नाही. उलट काँग्रेसनं देशाची माफी मागावी कारण त्यांनी देशाचा बट्ट्याबोळ केला आहे, असं फडणवीस आहे.
 
नाना पटोलेंसारख्या नौटंकीबात लोकांनी कितीही नौटंकी केली तरी त्याचा काहीही परिणाम होत नाही. याठिकाणी येऊन निदर्शनं करतील एवढी त्यांची हिम्मत नाही, असं फडणवीस म्हणाले.
 
गोपाळ शेट्टींचं रस्त्यावर धरणं
काँग्रेसच्या आंदोलनाला विरोध करण्यासाठी भाजपचे खासदार गोपाळ शेट्टी फडणवीस यांच्या सागर बंगल्याकडं निघाले होते. पण पोलिसांनी त्यांना अडवलं आणि पुढं जाण्यापासून रोखलं.
 
पोलिसांनी अडवल्यामुळं गोपाळ शेट्टी यांनी कार्यकर्त्यांसह सागर बंगल्याकडे जाणाऱ्या मार्गावरच आंदोलन सुरू केलं. त्याचठिकाणी त्यांनी धरणे द्यायला सुरुवात केली.
 
भाजप कार्यकर्ते काँग्रेस विरोधात रस्त्यावर उतरले. गोपाळ शेट्टींनी रस्त्यावर धरणं देत आंदोलन सुरू केलं आहे. पोलिस पक्षपाती असल्याचा आरोप गोपाळ शेट्टी यांनी केला.
काँग्रेसचे कार्यकर्ते फडणवीस यांच्या बंगल्याकडं गेले तर आम्हीही नक्की जाणार अशी भूमिका गोपाळ शेट्टींनी घेतली. पोलिस पक्षपातीपणा करत असल्याचं गोपाळ शेट्टी म्हणाले.
 
फक्त काँग्रेसच्या नेत्यांना अडवून चालणार नाही. तर, पोलिसांनी काँग्रेसच्या नेत्यांना अटक करायला पाहिजे असं गोपाळ शेट्टी म्हणाले. दरम्यान परिस्थिती नियंत्रणात आणण्यासाठी पोलिसांनी खासदार गोपाळ शेट्टी यांच्यासह कार्यकर्त्यांना ताब्यात घेतलं.
 
तर गिरगाव चौपाटी परिसरात काँग्रेसच्या आंदोलनाला विरोध करणाऱ्या भाजपच्या महिला आघाडीचं आंदोलनातील सदस्यांनाही पोलिसांनी ताब्यात घेतलं.
 
अतुल लोंढेही पोलिसांच्या ताब्यात
दरम्यान, याआधी काँग्रेसचे प्रवक्ते अतुल लोंढे यांनाही आंदोलन करताना पोलिसांनी ताब्यात घेतलं. आंदोलन करताना पोलिसांनी लोंढे यांना घोषणाबाजी करण्यापासूनही रोखलं.
 
दुसरीकडं मुंबई काँग्रेसच अध्यक्ष भाई जगताप यांनी पोलिसांना फडणवीस यांच्या बंगल्यावर 200 लोक कसे गेले आणि रस्ते का बंद केले असा सवाल विचारला.
 
शांतीपूर्ण आंदोलन असेल तर त्याला हरकत काय? यापूर्वी वर्षा बंगल्यावरही आंदोलन करण्यात आलं आहे. छत्रपतींच्या महाराष्ट्राचा अपमान होत असताना फडणवीस मूग गिळून गप्प का? असा सवालही जगताप यांनी केला.
 
पोलिसांनी पोलिसांचं काम करायचं, काँग्रेसचे कार्यकर्ते म्हणून आम्ही आमचं काम करत राहणार अशी भूमिका भाई जगताप यांनी मांडली.
 
मात्र पटोले यांनी मुंबईकरांना होणारा त्रास टाळण्यासाठी तात्पुरत्या स्वरुपात आंदोलन स्थगित करण्याची घोषणा केली. त्यानंतर आता परिस्थिती नेमकी काय होणार याकडं सगळ्यांचं लक्ष असेल.
 

वेबदुनिया वर वाचा

संबंधित माहिती