उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाचे आमदार अनिल परब व अन्य नेत्यांची दापोली येथील साई रिसाॅर्ट संबंधी सुमारे दहा कोटी २० लाख रुपयांची मालमत्ता ईडीने (सक्तवसुली संचलनालय) जप्त केली. त्या साई रिसाॅर्ट बेकायदा असल्याचा आरोप करत भाजप नेते किरीट सोम्मया यांनी याची पोलिसांत तक्रार केली. बनावट कागदपत्रांच्या आधारे हे रिसाॅर्ट बांधण्यात आल्याचा आरोप सोम्मया यांनी केला आहे. २०१७ मध्ये अनिल परब यांनी या रिसॉर्टसाठी भूखंड विकत घेतला आणि कोरोनादरम्यान लॉकडाऊनच्या काळात या शेतीच्या भूखंडावर रिसॉर्ट बांधण्याचे काम केले, असा आरोप आहे.
जमीन खरेदी केल्यानंतर दोन वर्षांनी २०१९ मध्ये याची नोंदणी झाली. २०२० मध्ये मुंबईतील केबल ऑपरेटर आणि शिवसेनेचे माजी खासदार रामदास कदम यांचे बंधू सदानंद कदम यांना ही जमीन १.१० कोटींना विकण्यात आली. हे रिसाॅर्ट बेकायदा आहे. पर्यावरण नियमांचे उल्लंघन करुन या रिसाॅर्टचे बांधकाम करण्यात आले आहे. राज्य शासनाचा महसुलही बुडाला आहे. त्यामुळे अनिल परब यांच्यावर कारवाई करावी, अशी मागणी सोम्मया यांनी केली होती. या प्रकरणी अनिल परब यांच्यासह तिघांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला. या गुन्ह्यत खेड न्यायालयाकडून परब यांना अंतरिम जामीनही मंजूर झाला आहे.