नाशिकमधील इगतपुरीच्या जिंदाल कंपनीतील स्फोटाच्या घटनेनंतर तेथील प्लॉन्ट बंद करण्याचे आदेश महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण महामंडळाने (एमपीसीबी) कंपनीला दिले आहेत. प्लांटमध्ये सुरक्षेच्या उपाययोजनांसह अन्य सुविधांची पुन्हा उभारणी केल्यानंतर हा प्लांट सुरू करण्यास परवानगी दिली जाईल, अशी माहिती जिल्हाधिकारी गंगाथरन डी. यांनी दिली. त्यामुळे हा प्लांट काहीकाळ बंद राहणार आहे. कंपनीने घटनेचा अहवाल सादर केला असून त्याची पडताळणी करण्यात येईल, असे जिल्हाधिकार्यांकडून सांगण्यात आले.
आगीच्या घटनेनंतर एमपीसीबीच्या पथकाने घटनास्थळी जाऊन पाहणी करत कंपनी प्रशासनाला पत्र दिले आहे. त्यात प्रकल्प बंद ठेवण्याचे आदेश देण्यात आले आहे. तसेच, भविष्यात प्रकल्प सुरू करताना प्रदुषणासह अन्य सर्व परवानगी घेतल्यानंतरच तो कार्यान्वित होऊ शकेल, असे जिल्हाधिकार्यांनी स्पष्ट केले.
दरम्यान,1992 च्या दरम्यान जिंदाल पॉलिफिल्म कंपनीची प्रकल्प सुरू करण्यात आला. या कंपनीत पॉलिफिल्म्स तयार केल्या जातात. बोपेट व बोप असे पॉलिफिल्मचे दोन प्रकार असून दोन्ही प्रकारच्या पॉलिफिल्म्स जिंदाल कंपनीत तयार केल्या जातात.पॅकेजिंग, लेबलिंग व लॅमिनेशन इ. कामांसाठी या पॉलिफिल्म वापरल्या जातात. जिंदालमध्ये सुरवातीपासून बहुतांश परप्रांतीय कामगारच काम करत आहेत.
कारखान्यातील ८३ कामगार संपर्कात नाही
जिंदाल पॉलीफिल्म्स कारखान्यातील ८३ कामगारांशी संपर्क होत नसल्याची तक्रार कुटुंबिय करीत असून संबंधितांचा प्रशासनाने शोध घ्यावा, अशी मागणी बाळासाहेबांशी शिवसेना पक्षाच्या इगतपुरी गटाने जिल्हा प्रशासनाकडे केली आहे. कारखान्यातील दुर्घटनेत मोठ्या प्रमाणात जिवितहानी झाली आहे. कंपनी व्यवस्थापन जाणीवपूर्वक आकडेवारी लपवून ठेवत असल्याचा आरोपही या गटाने केला.
पक्षाचे सहसंपर्कप्रमुख माजी आमदार काशिनाथ मेंगाळ यांच्या नेतृत्वाखाली शिष्टमंडळाने जिल्हा प्रशासनाची भेट घेऊन निवेदन दिले. जिंदाल कंपनीतील दुर्घटनेत मोठ्या प्रमाणात जिवितहानी झाल्याचा संशय शिष्टमंडळाने व्यक्त केला. कारखान्यात तीन सत्रात काम चालते. एका सत्रात २२०० कामगार कामावर असतात. त्यातील चार हजार कामगार कारखान्याच्या आवारात राहतात.
उर्वरित कामगार आसपासच्या गावात वास्तव्यास होते, अशी माहिती शिष्टमंडळाने दिली. जिंदाल कारखान्यातील ७०० कामगार घोटीत वास्तव्यास आहेत. त्यापैकी ८३ कामगारांशी संपर्क होत नसल्याचे कुटुंबिय आम्हाला सांगत आहेत. त्यामुळे या बेपत्ता कामगारांचा शोध घ्यावा अशी मागणी करण्यात आली. कंपनी प्रशासनाला दिशाभूल करीत असून व्यवस्थानाची चौकशी करून संबंधितांवर कारवाई करण्याची मागणी करण्यात आली.