परभणी-मनमाड रेल्वेमार्गाच्या दुहेरीकरणाला रेल्वे मंत्रालयाचा रेड सिग्नल

शुक्रवार, 10 डिसेंबर 2021 (15:06 IST)
मराठवाड्याला प्रतिक्षेत असलेल्या परभणी-मनमाड या 291 किमी अंतराच्या रेल्वेमार्गाच्या दुहेरीकरणाला रेल्वे मंत्रालयाने रेड सिग्नल दिला आहे. या मार्गाचा पूर्ण क्षमतेने वापर होत नसल्याने सध्या तरी दुहेरीकरणाची आवश्यकता नसल्याची माहिती केंद्रीय रेल्वेमंत्र्यांनी दिली. लोकसभेतील एका प्रश्नाला उत्तर देताना केंद्रीय रेल्वेमंत्री अश्विनी वैष्णव यांनी ही माहिती दिली. मात्र त्याच वेळी अंकई (मनमाड) ते औरंगाबाद या 98 किमी मार्गाच्या दुहेरीकरणाच्या सर्वेक्षणाला मंजुरी देण्यात आल्याचेही त्यांनी सांगितले.
 
रेल्वे मार्गांच्या दुहेरीकरणामुळे रेल्वे गाड्यांची संख्या वाढण्यास मदत होते. तसेच रेल्वेचा वेगही वाढतो. एकेरी मार्गावर एखादे रेल्वेचे इंजिन बंद पडले तर संपूर्ण वाहतूक विस्कळीत होते. हे प्रकार थांबण्यासाठी मार्गांचे दुहेरीकरण आवश्यक आहे. या पार्श्वभूमीवर परभणी ते मनमाड स्थानकांदरम्यानच्या रेल्वेमार्गाच्या दुहेरीकरणाच्या प्रस्तावाविषयी प्रश्न उपस्थित करण्यात आला.दुसरीकडे, दक्षिण मध्य रेल्वे अधिकाऱ्यांच्या नकारात्मक निर्णयामुळे परभणी-मनमाड मार्ग दुहेरीकरणापासून वंचित राहिला आहे. 

वेबदुनिया वर वाचा

संबंधित माहिती